02/09/2024
'चित्रपट: मी व मला दिसलेलें जग' या श्रीपाद महादेव माटे यांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५७ मध्ये प्रसिद्ध झाली. प्रथम प्रसिद्धीनंतर पन्नास वर्षांनी दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार सुरू झाल्यावर मनात सहजच प्रश्न उभा राहिला की इतक्या वर्षांनंतर या पुस्तकाला कोणी वाचक लाभतील का? आजच्या सुबुद्ध पिढीला, त्यातल्या त्यात तरुण वर्गाला त्यात स्वारस्य वाटेल का? हे पुस्तक मी बऱ्याच वेळा यापूर्वीही वाचलेले होते, पण या प्रश्नांचा विचार करू लागल्यावर ते आणखी एकदा वाचून पहावे, त्यातून काही उत्तर सापडते का हे पहावे असे ठरविले आणि त्यात उत्तर मिळाले ते ग्रंथाच्या शेवटी शेवटी आलेल्या एका वाक्याने. 'नव्या पिढीतील तरुणांना गेल्या अर्धशतकाची ओळख या चित्रपट - दर्शनाने बऱ्या प्रकारची होईल असा माझा अंदाज आहे.
पुस्तकाचा प्रारंभ 'मी' या अक्षराने झाला असला तरी आत्मकथन हा मुख्य उद्देश नसून विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धकातील की मराठी समाजाचे आणि हा समाज ज्या जगात वावरला त्या जगाचे दर्शन घडविणे हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता हे स्पष्ट होते. हाच धागा थोडा पुढे ताणून आपल्या आजोबांच्या बालपणातील मराठी समाज कसा होता हे जाणून घेण्याची जिज्ञासा आणि रसिकता आजच्या तरुण पिढीत निश्चितच आहे या विश्वासाने 'मला का दिसलेले जग' त्यांच्यासमोर ठेवावे असे वाटले.
विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात एकूण जगताच्या, त्यातही भारताच्या आणि त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या जीवनात फार मोठाल्या उलथापालथी झाल्या. दोन जागतिक महायुद्धे झाली, ज्यांचा साम्राज्यावर 'सूर्य कधीही मावळत नाही' अशी प्रौढी सांगणाऱ्या इंग्रजांच्या राज्याचे पूर्ण विघटन झाले, रशियात साम्यवादी विचाराच्या पुढाकाराने राज्यक्रांती झाली आणि त्या तत्त्वज्ञानाचा प्रसार झपाट्याने जगभर होत गेला, भारतात एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ फलद्रूप होऊन स्वातंत्र्यप्राप्ती झाली, पण त्याबरोबरच देशाच्या फाळणीचे दुःखद वास्तव पत्करावे लागले- या सगळ्या घटनांचे पडसाद महाराष्ट्रातील समाज, समाजकारण, राजकारण, अर्थकारण यावर उमटणे अपरिहार्य होते.
१९०० ते १९५० या अर्धशतकात महाराष्ट्र अत्यंत 'श्रीमंत' होता- ही श्रीमंती होती नररत्नांची. महाराष्ट्राचा देव्हारा अनेक कर्तबगार 'श्रेष्ठ' पुरुषांनी गजबजलेला होता. जीवनाची अशी कोणतीही शाखा राहिली नाही की ज्यात कोणीना कोणी माणूस पराक्रम करून गेला नाही. राजकारणामधे लोकमान्य टिळकांसारखा लढवय्या, गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारखा संसदपटू, सावरकरांसारखा सशस्त्र क्रांतीचा उपासक, हेडगेवारांसारखा दूरदर्शी आणि कुशल संघटक; पत्रकारितेत तात्यासाहेब केळकर, शिवराम महादेव परांजपे, अच्युतराव कोल्हटकर; नाट्यक्षेत्रात कृ.प्र.खाडिलकर, किर्लोस्कर, गडकरी हे नाट्यलेखक तर केशवराव भोसले, बालगंधर्व, गणपतराव जोशी असे नटवर्य होते. साहित्याच्या क्षेत्रात केतकर, केळकर, खांडेकर, फडके, अत्रे तर सामाजिक क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलराव शिंदे, अण्णासाहेब कर्वे हे नव्या परंपरांची, सुधारणांची दालने उघडीत होते. शिक्षणक्षेत्रही मागे राहिले नाही, रँग्लर परांजपे, राजवाडे, भाटे हे फर्ग्युसनचे धुरीण तर इतिहास- संशोधनाच्या क्षेत्रात विसुभाऊ राजवाडे, चिंतामणराव वैद्य, सरदेसाई, शं. ना. जोशी- ही यादी कितीही लांबविली तरी अपुरीच पडेल अशी स्थिती होती! ह्यांच्या पुण्याईवरच आजचा मराठी समाज उभा आहे, पोसला जात आहे.
देव्हाऱ्यातील या दैवतांसमोर तमाम जनता उभी होती. क्वचित कोणीतरी त्यांच्याबरोबर जाऊ पहात पण काही पावले गेल्यावर परत फिरत, माघारी येत. बाकी सर्व माणसे आश्चर्य पावत होती, आनंदी होत होती, क्वचित् दुःखीही होत होती. 'दैवते' अवतार घेत तशी गुप्तही होत, परंतु त्यांच्यासमोरचा भक्तगण, प्रेक्षकवृंद हा अनंत होता.
अशा सर्व दैवतांचे आणि त्यांच्यासमोरच्या अनंत समाजाचे, त्याच्या आकांक्षा, त्याचे हर्षामर्ष, हौसमौज, रागलोभ या सर्वांचे प्रत्ययकारी शब्दचित्र माटे यांनी घडविले आहे. यात दृष्टीस पडणाऱ्या, अगदी सहज आपल्या ओळखीच्या वाटतील अशा कितीतरी साध्यासाध्या गोष्टीही आहेत. ‘तासभर बडाबडा बोलून निघून जाणारे प्राध्यापक', 'काम नेमून न दिल्याने मोकाट सुटलेले विद्यार्थी', ‘बालगंधर्वांची वेषभूषा, केशभूषा यांची नक्कल करणाऱ्या स्त्रिया' आणि 'एका अंधाऱ्या कोपऱ्यात बिभिस्तपणे उभे राहिलेले दलित' त्यावेळच्या समाजात दिसत असत. आजही ‘तासभर बडाबडा बोलून निघून जाणारे प्राध्यापक’, 'काम नेमून न दिल्याने मोकाट सुटलेले विद्यार्थी' आहेत! बालगंधर्वांच्या केशभूषेची जागा 'साधना' कटने घेतली आहे, पण नक्कल करण्याचा हव्यास तोच आहे. एका बाबतीत मात्र फरक झाला आहे. आताचे दलित बिचकून कोठेतरी कोपऱ्यात उभे राहत नाहीत, तर हातात बाबासाहेबांचा फोटो आणि खांद्यावर निळे झेंडे घेऊन लख्ख उजेडात उभे आहेत, आत्मविश्वासाने पावले पुढे टाकून प्रगत होत आहेत- झाले आहेत.
या सर्वांचे दर्शन घडविणारा हा माणूस, समाजापासून लांब, दूर कोठेतरी उंचावर उभे राहून खालच्या रस्त्याने जा-ये करणाऱ्या माणसांकडे तटस्थपणे, त्रयस्थपणे, तुच्छतेने बघणारा नाही. ‘समाजाच्या पोटी’ राहूनच, भोवतालचे आबालवृद्ध, स्त्री-पुरुष यांची रोजची सुख-दुःखे पाहणारा, त्यांच्या सुख-दुःखात सहानुभूतीने सहभागी होणारा, त्यांच्या भल्यासाठी, समाजात बदल घडवून आणण्याच्या ईर्षेने वर्षानुवर्षे तनमनधन सर्वांनिशी झगडणारा होता, म्हणूनच त्याने घडविलेले हे दर्शन जिवंत, प्रत्ययकारी झाले आहे.
- म. श्री. माटे
आज २ सप्टेंबर - श्री. म. माटे यांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
पुस्तक - चित्रपट : मी व मला दिसलेलें जग
पहिली आवृत्ती - १९५७ (व्हीनस प्रकाशन)
दुसरी आवृत्ती - २०१० (देशमुख आणि कंपनी)
किंमत - रु ४५०
सवलतीत (३० सप्टेंबर पर्यंत) - रु २२५ (अधिक पार्सल खर्च)
#देशमुखआणिकंपनी
#जन्मदिवस
#श्रीममाटे