28/11/2024
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दारास प्रारंभ!
पुजारी, भाविकांच्या कामाबाबत सूचनांना प्राधान्य.
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तिर्थक्षेत्राचा संपुर्ण कायापालट करण्यासाठी २,००० कोटींची आराखडा अंतिम करण्यात आला आहे. हा विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळेल आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
दरम्यान मंदिर समितीच्या स्वनिधीतून ६० कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. यातून तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. पुजारी वर्ग आणि भाविकांच्या या कामाबाबतच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यानुसार जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले जाणार आहे..
पुरातत्व खात्याच्या निगराणीाखाली कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिराच्या सभामंडपचा काही भाग पूर्ण उकलून पुन्हा नव्याने मजबूत केला जाणार आहे. मंदिरासह आसपासचा भागही मोकळा करून घेतला जाणार आहे. त्यासाठी मंदिरातील ओवऱ्या थोड्या मागे घेण्यात येणार आहेत. मंदिर आणि परिसरातील कामाची प्रत्यक्ष सुरुवात लवकरच केली जात आहे.
यापूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान भाविक, पुजारी बांधव आणि व्यापारी वर्गाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि भाविकांच्या सोयी-सुविधांमध्ये यामुळे मोठी गुणात्मक वाढ होणार आहे..
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्य आणि देशभरातून येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, काम सुरू असताना भाविकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येईल, याकडे विचारपूर्वक लक्ष देण्यात येत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्या ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांच्या सुविधेसाठी पुढील काळात लिफ्ट आणि रॅम्पची व्यवस्थाही केली जाणार आहे.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर अत्यंत उत्साहामध्ये आणि समाधानाने प्रत्येक भाविक आपल्या घरी जावा, असेही नियोजन आम्ही करीत आहोत. मंदिरात नव्याने केलेले बांधकाम काढणे, भुयारी मार्ग, यज्ञमंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदिराचे जतन व दुरूस्ती केली जाणार आहे. त्याचबरोबर कार्यालयीन प्रशासकीय इमारती, पोलीस चौकी, खुला प्रेक्षा मंच आदी नव्याने केलेली बांधकाम काढली जाणार आहेत. गोमुख तीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळ तीर्थ, निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, टोळ भैरव मंदिर, दीपमाळ, शिवाजी महाद्वार व खंडोबा मंदिर, यमाई मंदिराच्या जतन आणि दुरूस्तीचे कामही केले जाणार आहे.
तिसर्या टप्प्यात तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशा, आवश्यकते नुसार दगडी पायर्या, महावस्त्र अर्पण केंद्राचेही जतन आणि दुरूस्तीचे काम नियोजित आहे. तुकोजीबुवा मठावरील ओव्हर्या, आराध्य खोली, दगडी फरशी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुळजाभवानी देवीचे मुख्य प्रवेशद्वार, त्याचबरोबर जिजामाता महाद्वाराची देखील दुरूस्ती आणि जतन केले जाणार आहे.
नागरिक, पुजारी, भाविकांनी बैठकीस उपस्थित राहावे
वरील सर्व कामांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांना सर्व संबंधितांची बैठक घेऊन कामाचा कालबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना काल देण्यात आल्या होत्या. त्या प्रमाणे गुरुवारी नागरिक, पुजारी बांधव आणि भाविकांची त्यानुसार बैठक बोलावण्यात आली आहे. सर्वांच्या सूचनांची आदरपूर्वक दखल घेऊन कामाचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल.
सर्व माहिती जनतेसमोर मांडण्यात येईल. जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही. त्यामुळे संबंधितांनी श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासकीय इमारत, तुळजापूर येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे. या बैठकीला मी ऑनलाइन उपस्थित असणार आहे. बैठकीत संबंधितांनी आपली मते, सूचना नमूद कराव्यात. त्याचा योग्य विचार करून लवकरात लवकर आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले जाणार आहे.
#तुळजापूर #मंदिर #आराखडा