13/02/2024
*रासेयो स्वयंसेवकांना सामाजिक मुल्यांची जाणीव – प्राचार्य डॉ.आर. डी.दरेकर*
*मोहाडीत के.टी.एच.एम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप*
राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना सामाजिक मुल्यांची जाणीव असते. शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती होत असल्याचे मत प्राचार्य डॉ. आर. डी.दरेकर यांनी मांडले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व मराठा विद्या प्रसारक समाज संचलित के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवकांचा ध्यास व ग्राम शहर विकास’ अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती शिबिराच्या समारोप प्रसंगी मत मांडले. विशेष शिबिराचा समारोप समारंभाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आय. टी. आय.चे प्राचार्य डॉ. दिनेश उफाडे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच भाग्यश्री जाधव, संस्थेचे सभासद उत्तम जाधव, चेतन लोखंडे, सतिश जाधव, दैनिक लोकमतचे पत्रकार उत्तम जाधव, सकाळ चे पत्रकार धनंजय वानले, कैलास कळमकर, उमेश जाधव, उपप्राचार्य डॉ. पी.व्ही. कोटमे, डॉ. श्रीमती कल्पना आहिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र गुंजाळ, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, प्रा. प्रतिक शिंदे, प्रा. श्रीमती छाया लभडे आदी उपस्थित होते.
डॉ. आर. डी. दरेकर यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार विकसित होऊन श्रमप्रतिष्ठेचे मूल्ये वाढीस लागते. श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी होऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक पाऊले उचलेले जात आहेत. याप्रसंगी धनंजय वानले, कैलास कळमकर, यानी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. दिनेश उफाडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकास, व्यक्तिमत्व विकास, व्यवस्थापन कौशल्य, नियोजन कौशल्य, वक्तशीरपणा इ. मुल्यांची रुजावत होत असल्याचे मत मांडले. कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र गुंजाळ यांनी शिबिराच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मोहाडी येथील श्रमसंस्कार शिबिरात स्वयंसेवकांनी मोहाडी येथील सह्याद्री देवराई गोपालकृष्ण येथे रस्त्यांची निर्मिती, तलावाची दुरुस्ती व पिचिंग, या सोबतच स्वच्छता अभियान, मतदार जनजागृती, अन्नसुरक्षा, महिला सबलीकरण, पर्यावरण जनजागृती, नदी जल स्त्रोत स्वच्छता, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, लिंगभाव जनजागृती, , प्रधानमंत्री जनधन आणि विमा योजना, मृदा व जलसंवर्धन जनजागृती, बालविवाह प्रतिबंध जनजागृती, महिला सबलीकरण जनजागृती इ. उपक्रम प्रभात फेरी व पथनाट्याच्या माध्यमातून राबविले गेले. त्याचप्रमाणे शिबिरादरम्यान मा. श्री. सुनिल मौले यांचे आधुनिक शेती आणि भारत, डॉ. गणेश मोगल यांचे शेती आणि मातीच्या कविता, डॉ. विलास देशमुख यांचे व्यक्तिमत्व विकासातून राष्ट्रविकास, प्रा. सोपान देशमुख यांचे अभिनय क्षेत्रातील करिअरच्या संधी, प्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे यांचे लोकशाही आणि मतदार जनजागृती, डॉ. राजेंद्र गुंजाळ याचे युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांचे लोकसंख्या नियंत्रण आणि भारतीय अर्थव्यवस्था आदी विषयांवर स्वयंसेवकांचे प्रबोधन केले गेले. सदर शिबिरात २०० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी होणार आहेत. शिबिरा दरम्यान स्वयंसेवकांनी सह्याद्री देवराई येथे केलेल्या कामाचे कौतुक सयाजी शिंदे यांनी केले. तसेच या कालावधीत स्वयंसेवकांनी सह्याद्री फार्म व सुनील मौले यांच्या फुलशेतीला भेट देऊन आधुनिक शेतीचे महत्व लक्षात घेतले.
शिबिरातील विविध स्वयंसेवकांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राज्यस्थान, कर्नाटक, गोवा, केरळ, पंजाब गट पाडण्यात आलेले होते. या माध्यमातून स्वयंसेवकांनी राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडविले. संतोष चोथे हा शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक ठरला.
आश्विनी कानकाटे, महेश्वर सिंग, सिद्धार्थ मोते, यश निसाळ, अस्मिता पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. श्रीमती छाया लभडे यांनी केले. स्वागत व परिचय डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रतिक शिंदे यांनी केले.