08/01/2023
“मराठी राज्याचे संस्थापक "श्री छत्रपती शिवाजी" महाराज यांच्यासंबंधी डॉ. बाळकृष्ण यांच्या ठिकाणी परम आदर वसत होता आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या चरित्रपर मोठे अभूतपूर्व असे इंग्रजी ग्रंथ अहोरात्र परिश्रम करून निर्माण केले. इतकेच नव्हे तर कोल्हापूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरकाल स्मारक व्हावे म्हणून शिवाजी विद्यापीठ कै. छत्रपती राजाराम महाराज, कोल्हापूर यांच्या साहाय्याने स्थापन करण्याची त्यांची अत्यंत महत्वाकांक्षा होती. हे विद्यापीठ स्थापन झाले असते तर डॉ. बाळकृष्ण यांची शैक्षणिक कामगिरी परमोच्च कळसास जाऊन पोहोचली असती! पण ईश्वरी संकेत निराळा असल्याने डॉक्टर साहेबांची ती महत्वाकांक्षा कै. छत्रपती राजाराम महाराज आणि स्वत: त्यांच्यावर निर्घृण काळाने अकाली झडप घातल्याने दुर्दैवाने अपूर्णच राहिली..!!
" महाराष्ट्रामध्ये डाँ. बाळकृष्ण यांचा शिष्यगण अफाट आहे. त्याचप्रमाणे त्यांचे चाहतेही सर्वत्र विखूरलेले आहेत. तेव्हा या सर्वांनी त्यांची ही अपूर्ण महत्वाकांक्षा पूर्ण केल्यासच
त्यांचे खरोखर स्मारक होणार आहे."
सन १९४२ मध्ये काढलेले वरील उद्गार आहेत शिक्षण महर्षि आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ यांचे...!! या उद्गारांवरून डॉ. बाळकृष्ण ही व्यक्ती किती महान असेल याची आपणास थोडीफार कल्पना आलीच असेल.
सन १९४० मध्ये इंग्रजीमध्ये लिहून पूर्ण केलेले चार खंडातील व साधारण १८०० पृष्ठांचे "Shivaji - The Great"
हे डॉ. बाळकृष्ण यांचे शिवचरित्र त्याकाळी प्रकाशित होणारे इंग्रजीमधील सर्वोत्तम शिवचरित्र होते आणि आता हेच चरित्र " " पार्श्व पब्लिकेशन्स , कोल्हापूर " यांच्या मार्फत मराठीमध्ये अनुवादित होऊन लवकरच प्रकाशितही होत आहे... ही अतिशय आनंदाची बाब आहे. यानिमित्ताने मराठी भाषिक इतिहासप्रेमी व्यक्तींना एक महत्वाचे शिवचरित्र वाचावयास मिळणार आहे. त्याचप्रमाणे *डाॅ. बाळकृष्ण* या काळाच्या ओघात पूर्णपणे विस्मृतीत गेलेल्या एका आर्यसमाजी वैदिक विद्वानाच्या कार्याची माहिती महाराष्ट्रातील जनतेला होत आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे.
डॉ. बाळकृष्ण हे मूळचे, उत्तरेकडील एक प्रमुख राज्य, पंजाबचे रहिवासी. त्यांची मातृभाषा ही पंजाबी. पंजाबची एक विद्वान व्यक्तीमहाराष्ट्रात येते काय आणि आपल्या महाराष्ट्रालाच आपली कर्मभूमी मानून तब्बल १८ वर्षे येथेच राहून , *कै. छत्रपती राजाराम* महाराजयांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषेतील प्रचंड मोठे शिवचरित्र *“Shivaji The Great “* पूर्ण करते काय ....हीच मुळी एक अतिशय विस्मयचकित करणारी घटना आहे. शिवचरित्राबरोबरच त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी राहूनही कार्य केलेआणि कोल्हापूर येथे *श्री छत्रपती शिवाजी विद्यापीठ* निर्माण होण्यासाठी अहोरात्र प्रयत्नही केले.
आता आपण डॉ. बाळकृष्ण यांचा थोडक्यात जीवन वृत्तांत पाहुयात.
डॉ. बाळकृष्ण यांचा जन्म २२ डिसेंबर , सन १८८२ रोजी पंजाबमधील मुलतान ( आता हे ठिकाण पाकिस्तानात आहे) येथे झाला. मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर लाहोर च्या सुप्रसिद्ध ‘दयानंदॲंग्लो वैदिक’ काँलेज अर्थात DAV लाहोर येथे त्यांनी उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला.
आर्य समाजाचे संस्थापक आणि समग्र क्रांतीचे अग्रदूत ‘महर्षि दयानंद सरस्वती’ यांच्या विचारांवर चालणाऱ्या DAV लाहोर या काँलेज मध्ये बाळकृष्ण यांना महान क्रांतिकारक भाई परमानंद , प्रा. गोकुळचंद, महात्मा हंसराज अशा थोर व्यक्तींचा सहवास लाभल्याने त्यांनी अभ्यासामध्ये मोठे नाव प्राप्त केले. अभ्यासाबरोबरच त्यांनी अश्वारोहण , नौकाविहार , फुटबॉल अशा क्रीडाप्रकारांमध्येही त्यांनी प्राविण्य मिळवले.
पंजाबकेसरी लाला लाजपत राय, नामदार गोखले यांनी देशभरात दौरे काढून आपल्या ओजस्वी भाषण, अपूर्व देशभक्ती, स्वार्थत्यागआणि उज्वल चारित्र्य यामुळे शेकडो विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची जी स्फूर्ती उत्पन्न केली त्याचा बाळकृष्ण यांच्या मनावर दूरगामी परिणाम झाला. नामदार गोखले यांना ते आपला राजकीय गुरू मानत. त्यांचे मोठे बंधूही राजकीय क्षेत्रात असल्याने त्यांनी सन १९०७ नंतर राजकीय चळवळीतून अंग काढून स्वत:ला धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले.
DAV लाहोर BA आणि पुढे लाहोर गव्हर्न्मेंट काँलेज मधून MA पूर्ण केल्यावनंतर त्यांनी महर्षी दयानंद सरस्वती यांचे शिष्य , महान स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक ‘स्वामी श्रद्धानंद’ यांनी हरिद्वार येथे स्थापन केलेल्या ‘गुरुकुल कांगडी’ येथे इतिहास आणिअर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य सुरू केले. पाश्चात्य शिक्षणपद्धतीपेक्षा आर्य शिक्षण पद्धतीवर चालणारे गुरुकुल कांगडी हे त्यांनाअधिक उपयुक्त वाटले कारण गुरुकुलात दिले जाणारे मातृभाषेतील शिक्षण, प्राचीन आर्य वैदिक ग्रंथ आणि वैदिक संस्कृतीच्याअभ्यासाला दिले जाणारे प्राधान्य , गुरुकुलातील स्नातकांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक वाढीकडे आणि त्यांच्या ब्रह्मचर्याकडे दिलेजाणारे विशेष लक्ष तसेच शास्त्रांच्या आणि उद्योगधंद्यांना उत्तेजन हे होते.
हरिद्वारच्या गुरूकुल कांगडी येथील आपल्या १२ वर्षांच्या वास्तव्यात आर्य समाजाच्या कार्यासाठी त्यांनी भारतातील अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी शेकडो व्याख्याने दिली. यामध्ये कराची, क्वेट्टा, श्रीनगर , अजमेर, पाटणा, कोलकाता आणि प्रयागराज अशी प्रमुख शहरे आहेत. सन १९१६ मध्ये लखनौ येथे भरलेल्या काँग्रेस च्या अधिवेशनात आर्य समाजी तरूणांच्या ‘अखिल भारतीय आर्यकुमार सभेचे अध्यक्षपदही डॉ.बाळकृष्ण यांनी भूषविले होते.
गुरूकुल कांगडी मधील वास्तव्यात त्यांनी अर्थशास्त्र, भारत वर्ष का संक्षिप्त इतिहास , स्वराज्य , भारत के सौ राजराजेश्वर , आर्यसंध्या , Industrial decline in India , ईश्वरीय ज्ञान - वेद असे ग्रंथही लिहिले.
सन १९१९ मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षापर्यंत गुरुकुल कांगडी या आर्य वैदिक गुरुकुलामध्ये अध्यापनाचे कार्य करून त्यांनी इंग्लंड येथे जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. लंडन मध्येही गेल्यावरही त्यांचे आर्यसमाजाचे कार्य चालूच होते. तिथेही त्यांना अनेक ठिकाणांहून व्याख्यानांसाठी आमंत्रणे येत. या व्याख्यांनांतून त्यांना वैदिक संस्कृतिचा प्रसार करण्याची संधी मिळे. लंडन, आँक्सफर्ड, केंब्रिज, लिव्हरपूल, मॅंचेस्टर, एडिंबरो, ब्लॅकबर्न, पॅडिहॅम अशा ठिकाणी त्यांनी आर्थिक आणि धार्मिक विषयांवर व्याख्याने दिली. पीएचडी च्या परीक्षेसाठी त्यांनी सादर केलेला प्रबंध ‘ Commercial Relations between India and England’ हा तयार करण्याच्या कामी त्यांना या दौऱ्यांचा लाभ झाला. त्यांचा हा प्रबंध Routledge & Sons, London या कंपनीने प्रकाशित केला. London school of economics च्या पाठ्य पुस्तकात हा प्रबंध समाविष्ट करण्यात आला.
सन १९२० च्या आँक्टोबर महिन्यात त्यांनी आर्य समाजाचे संस्थापक महर्षि दयानंद सरस्वती यांचा स्मृतिदिन लंडन येथीन लाँर्ड मेस्टन यांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला आणि ‘सत्यार्थ प्रकाश’ या महर्षी दयानंद सरस्वती लिखीत कालजयी ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तींचे मोफत वाटप करून आर्यसमाजाचे प्रचार कार्यही केले.
सन १९२२ च्या फेब्रुवारी महिन्यात लंडन विद्यापीठाची पीएचडी मिळवूनच ते मायभूमीस परतले.
मायभूमीस परतल्यावर त्यांना कोल्हापूर येथील राजाराम काँलेजचे प्राचार्यपद मिळाले आणि दिनांक १५ मे, १९२२ रोजी ते कोल्हापूर येथेआले.
डॉ.बाळकृष्ण यांच्या कल्पकतेमुळेच अल्पावधीत राजाराम काँलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटिने वाढली.
कायद्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे तसेच अध्यापनशास्त्राचेही शिक्षण घेतां यावे यासाठी त्यांनी विधी कॉलेजआणि टीचर्स कॉलेजची संकल्पना मांडली आणि अल्पावधीतच ही दोन कॉलेजीस कोल्हापूर येथे सुरू झाली.
बनारस हिंदू विद्यापीठाप्रमाणेच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी डॉ. बाळकृष्ण यांचे अहोरात्र प्रयत्न चालू होते. 'शिवाजी विद्यापीठ' हे त्यांचे गोड स्वप्न होते.
“मी स्वत: हृदयाने आर्य समाजी आहे. आर्य समाज हे धर्मोपदेशक बनलेल्या जातीचे जुलूम झुगारून देण्यासाठी निर्माण झाले आहे. आपले संघ बनवून भांडवलदारांचा जुलूम नाहिसा करणे जितके महत्वाचे आहे, त्यापेक्षाही हा बनावटी धार्मिक जूलूम काढून टाकणे जास्त महत्वाचे आहे. यासाठी मी आर्य समाजास चाहतो. “ - हे उद्गार आहेत करवीर नरेश राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे!!! राजर्षि शाहूमहाराजांनी महर्षि दयानंद सरस्वती स्थापित धर्म आणि समाज सुधारक संस्था आर्य समाज यांचा हृदयापासून स्वीकार केला असल्याने कोल्हापूर येथे आर्य समाजाचे कार्य वाढत गेले. कोल्हापूर येथील मंगळवार पेठेत सन १९१८ रोजी महाराजांनी ‘शाहू दयानंद हायस्कूल’ या शाळेचीही स्थापना केली.
डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर आर्य समाजाबद्दल केलेल्या कार्यास तर तोडच नाही. १९२२ ते १९४० अशी तब्बल १८ वर्षे त्यांनी कोल्हापूर आर्य समाजाचे कार्य केले. कोल्हापूर आर्य समाजासाठी स्वतंत्र मंदिर असावे यासाठी लक्ष्मीपूरी येथे जागा ही मिळाली आणि अवघ्या २ वर्षात भवन निर्माण झाले. महर्षि दयानंद सरस्वती यांचे परमशिष्य आणिमहान स्वातंत्र्यसेनानी आणि गुरुकुल कांगडीचे संस्थापक स्वामी श्रद्धानंद यांची दिल्ली येथे २३ डिसेंबर १९२६ रोजी निर्घृण हत्या झाली. स्वामी श्रद्धानंद यांच्या बद्द्ल वाटत असलेला पूज्यभाव व्यक्त करण्याकरिता त्यांना या मंदिरास ‘श्री स्वामी श्रद्धानंद स्मारक मंदिर’ असेनाव दिले. हे मंदिर म्हणजे कोल्हापूर आर्य समाजाचे प्रमुख केंद्रच.
डॉ. बाळकृष्ण यांना महाराष्ट्राबद्दलचा आणि वैदिक धर्माबद्द्लचा अभिमान अत्यंत जाज्वल्य असा होता. पंजाब ही जरी त्यांची जन्मभूमीअसली तरी महाराष्ट्र हीच खरी कर्मभूमी होती.
शिकागो परिषद आणि अमेरिकेतील कार्य
सन १८९३ मध्ये अमेरिकेतील 'पार्लमेंट ॲाफ रिलीजन' या नावाने सर्वधर्मपरिषदेचे जे पहिले अधिवेशन भरले होते,
त्यानंतर ४० वर्षांनी१९३३ साली शिकागो येथे दुसरे अधिवेशन भरले. या परिषदेस दिल्ली येथील सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेने डॉ. बाळकृष्ण यांना आर्यसमाजाचा प्रतिनिधी म्हणून पाठवले. या परिषदेत डॉ. बाळकृष्ण यांनी तीन व्याख्याने दिली.
१) Hindu Theories of cosmic evolution
२)India’s contribution to civilisation
३)The cultural contact between India and America.
याखेरीज त्यांनी आर्यधर्म प्रचारासाठी मिशिगन , कोलंबिया, हाँगवर्ड , न्यूयाँर्क युनिवरसिटी, नाँर्थ वेस्टर्न युनिवरसिटी अशा ठिकाणीव्याख्याने दिली. एका व्याख्यानात मिस मेयोने हिंदू स्त्रियांविषयी काढलेल्या अनुद्गारांचा फोलपणा दाखवून त्याचा खरपूस समाचारही घेतला. अमेरिकेस जाण्याचा त्यांचा मुख्य हेतू हिंदु संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञान यांवर व्याख्याने देऊन एकंदर अमेरिकेत भारतीयांविषयी असलेला गैरसमज दूर करावा , आर्य समाजाची माहिती, वेद, उपनिषदे यांचे महत्व सांगणे हाही होता. अमेरिकेचा दौरा आटोपून ते युरोपात गेले . छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहित असलेल्या चरित्रानंतर छत्रपती शिवाजीमहाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांचे चरित्राचे कार्य हाती घेण्यासाठी त्यांची माहिती लंडनच्या इंडिया आँफिसमधून घेतली. त्यानंतर हाँलंड येथे जाऊन डच भाषेतील महाराष्ट्राच्या पूर्वीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी माहिती त्यांनी गोळा केली.तसेच त्यांनी लिहिलेले शिवचरित्र हे २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एकमेव ससंदर्भ असे शिवचरित्र म्हटले तर वावगे ठरणार नाही आणि हे शिवचरित्र वाचकांनी वाचल्यावर त्यांना याचा प्रत्यय येईलच.
अशा या महाराष्ट्रालाच आपली कर्मभूमी मानणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपार श्रद्धा आणि भक्ती बाळगणाऱा थोर व्यासंगी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेला वैदिक विद्वान २१ आँक्टोबर १९४० रोजी अनंतात विलीन झाला.
रणजित चांदवले,
पुणे
संदर्भ - १) स्व. मो रा वाळंबे संपादित डाँ. बाळकृष्ण , चरित्र, कार्य व आठवणी.
———
थोर मराठी कवी गिरीष ( शंकर केशव कानेटकर) यांनी डाँ . बाळकृष्ण यांना वाहिलिली काव्यात्मक श्रद्धांजली:
स्मृतिपूजा
( जाति: प्रणयप्रभा)
तुजवरी वाहतो भावफुले,
वर्षुनी स्मृतीची मंत्रजले ॥ ध्रु. ॥
प्रेरक होती वैदिक वाणी,
आर्यत्वाची गाऊनी गाणी,
कृतिची रचिली थोर कहाणी,
भाव जियेतून नव उमले ॥ १ ॥
मानवतेला अवचित मुकली
जनता असली हृदयी धरिली,
शुद्धी असली हृदयी धरिली,
माणुसकीते जागविले ॥ २ ॥
दूर सोडुनी देश आपुला
मराठियांशी जिव समरसला,
नवसंशोधनकार्यी रमला,
तेज तुझे त्यातून खुले ॥ ३ ॥
सम्यक दर्शन शिवरायांचे
तुवा घडवुनी स्वातंत्र्याचे,
पोषण केले तरूण मनांचे,
भविष्य त्या मधुनीच फुले! ॥ ४ ॥
दिनांक : १६-१०-१९४१ , सांगली
“कवि गिरीश “