24/12/2023
साहित्य संमेलन, वाचन प्रेरणेचा मंत्र
सीमाभागात मराठी साहित्य संस्कृती जपण्यासाठी मराठी माणूस प्रयत्न करतो तसे प्रयत्न इतरत्र कोठेही दिसून येत नाहीत.
ग्रामीण, विद्रोही, बाल साहित्य, विज्ञान साहित्य,अश्या प्रकारची बरीच संमेलने भरतात. त्या मध्ये खानापूर विभागामध्ये एकमेव साहित्य संमेलन म्हणजे 'माचीगड साहित्य संमेलन '
विद्यार्थी, वाचक, व मराठी माणसामध्ये वाचन संस्कृती रुजावी, वाचकांनी विज्ञानवादी विचार जोपासावेत. त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा. यासाठी विविध विषयावरील विचारवंत, साहित्यिक यांचे विचार विद्यार्थी व जनतेपर्यन्त पोहोचवण्याचे काम आयोजक करत असतात. साहित्य संमेलन भरवण्यासाठी रात्रंदिवस काम करून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
पूर्वी साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांचे स्टॉल लागत होते. पण आत्ता पुस्तकांचे स्टॉल दुर्मिळ होत चालले आहेत.त्यांचीही चूक म्हणता येणार नाही कारण वाचकांची वानवा दिसून येते.
जर वाचनाची ओढ वाचकांमध्ये व विद्यार्थी यांच्यामध्ये लावायची असेल तर जीवनामध्ये वाचन किती महत्वाचे आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी मुलांच्या मनावर बिंबवणे फार गरजेचे आहे.
आपण रोज थोडे तरी वाचन केलेच पाहिजे ही गोष्ट मनावर बिंबवून ती कृतीतून दाखवली पाहिजे.
त्यामध्ये रोजची दैनिके, साप्ताहिके, शब्दकोडी, संपादकीय लेख, तसेच शालेय अभ्यासाचे वाचन, कादंबरी, कथा, चरित्र यांचे वाचन होय .
मराठी साहित्य संपदा म्हणजे अथांग समुद्र आहे.मनोरंजन ते मनाला अंजन घालायचे काम ही साहित्य संपदा करत असते.
पु. ल. देशपांडे निखळ हसण्याचे सामर्थ्य देतात. तर प्र. के. अत्रे आपले परखड व्यक्तिमत्व बनवतात, शिवाजी सावंत कर्ण व कृष्ण यांच्या चरित्राचे अमृत पाजतात, अण्णाभाऊ साठे जीवन जगण्याची उभारी देतात. तर बाबासाहेब व महात्मा जोतिबा फुले गुलामगिरीच्या शृंखाला तोडतात.
पण आमचे दुर्दैव असे की आम्हाला ही साहित्य संपदा वाचायला वेळ नाही.
"वाचाल तर वाचाल"ही म्हण आहे पण मोबाईलच्या युगात आम्हाला ना वाचनाची इच्छा आहे. ना साहित्य संपदेची ओढ आहे.
मोबाईल, गेम, सिनेमे पाहणे हे युवकांचे दैनंदिन जीवन झाले आहे.
मनोरंजन अवश्य हवे पण त्यासाठी मर्यादा पण हव्या.
त्यासाठी पालकांनी आपण सुद्धा वाचन करावे व मुलांनासुद्धा वाचन करण्यासाठी प्रवृत्त करावे.
त्यांना पुस्तकांचे स्टॉल, साहित्य संमेलन अश्या ठिकाणी घेऊन जावे. साहित्यिक व विचारवंतांचे चांगले विचार आत्मसात करावे.
मुलांना वेळ देणे म्हणजे त्यांचे हट्ट पुरवणे नाही. आई वडिलांनी कमवलेला पैसा, मुलांचे फाजील लाड पुरवण्यासाठी होत असेल तर मुलांचे भविष्य निश्चितच खराब होईल
त्यासाठी मुलांना पुस्तकांची ओढ लावणे व पालकांनी स्वतः वाचणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, आगरकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहास वाचनातून मुलांना कळू द्या. तेव्हाच त्यांची मस्तके महापुरुष्यांच्या मिरवणुकीत नतमस्तक होतील.
अजून कितीतरी बाबी आहेत त्या सर्व वाचन केल्यानंतरच कळतील.जीवन म्हणजे पार्ट्या, राजकारणाच्या केलेल्या कोपऱ्यावरील गप्पा, मोबाइलवर केलेला टाईमपास, यासाठी नाही तर.
जीवन म्हणजे केलेले वाचन, आव्हान, घेतलेली जबाबदारी, एकमेकांविषयी आदर, आपले चांगले संस्कार, यांचा मिलाफ आहे. हे सर्व तुम्हाला वाचनातून मिळेल.
त्यासाठी तुम्ही वाचन करा, साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हा, विचारवंतांचे चांगले विचार आत्मसात करा. त्या विचारांच्या वाटेवर चला. व आपले जीवन वाचनातून सुखमय करा.
कारण
वाचाल तर वाचाल
माचीगड साहित्य संमेलन व सुब्रमण्य साहित्य अकादमी यांच्या अप्रतिम शैक्षणिक व ज्ञान प्रबोधन कार्याला मनपूर्वक शुभेच्छा 🙏🏼🙏🏼