
18/08/2024
आपुलकी प्रेम अन् जिव्हाळा
आज दिनांक १८/०८/२०२४ रोजी भांडुप येथील मुंबई महानगर पालिका, मुंबई पब्लिक स्कूलच्या सभागृहात पाटण तालुका विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचा आठवा वर्धापन दिन, संस्थेच्या वतीने तालुक्यातील खडतर परिस्थितीचा सामना करून यशाला गवसणी घातलेल्या रत्नांचा पाटण रत्न पुरस्काराने गौरव तसेच आपल्या 'शौर्यम्' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते, संस्थेचे संचालक, सदस्य आणि संस्थेवर प्रेम करणाऱ्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी २:३० वाजता पार पडणार आहे.
गेली आठ वर्षे पाटण तालुका विकास प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था तालुक्यात सामाजिक कार्यात सक्रिय असून संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा मांडताना भविष्यातील वाटचालीवर विचारमंथन करणे हा उद्देश असला तरी संस्थेचे संचालक मंडळ, सर्व सदस्य यांचे हे स्नेहसंमेलन आहे. अनेक मान्यवरांना या सोहळ्याला विशेष निमंत्रित करण्यात आले असून तालुक्यातील आपल्या माणसांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशन सोहळा ही संस्थेने लेखकाला दिलेली अनोखी भेट आहे.
जवळपास सुरूवातीपासून संस्थेचा एक संचालक या नात्याने कार्यरत असताना संस्थेच्या अनेक आदर्श उपक्रमात सहभागी होऊन तालुक्यात आलेल्या अनेक आपत्कालीन परिस्थितीत फुल ना फुलाची पाकळी योगदान देण्याची संधी मला संस्थेमुळे मिळाली आहे. मुळातच पाटण तालुका हा अत्यंत दुर्गम, डोंगराळ असल्यामुळे सामाजिक संस्था हा इथल्या जनतेचा जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे.
संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक लेखक म्हणून तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची संधी संस्थेने दिली आहे. एका अर्थाने हा दुग्धशर्करा योग आहे.
संस्थेवर प्रेम करणाऱ्या, माझ्या पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळी यांनी उपस्थित राहून हा दुग्धशर्करा योग द्विगुणित करावा ही स्नेह पूर्वक विनंती.
विनायक देशमुख
संचालक
पाटण तालुका विकास प्रतिष्ठान