26/06/2022
इंग्रज अंगरक्षकाच्या मारहाणीत नजरकैदेत असलेल्या चौथ्या शिवाजी महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन् यशवंतराव उर्फ बाबासाहेब म्हणजेच शाहू महाराज कोल्हापूर गादीचे छत्रपती बनले !
कोल्हापूर संस्थानचे छत्रपती असलेले चौथे शिवाजी महाराज यांना वेडे ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. महाराजांचे अंगरक्षक असलेल्या ग्रीन नावाच्या इंग्रजाने केलेल्या मारहाणीत २५ डिसेंबर १८८३ साली छत्रपतींचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिंवतपणी वेडा ठरविण्यात आलेल्या चौथ्या शिवाजी महाराजांची नगरच्या किल्ल्यातून मृत्यूनेच सुटका केली. ज्या गोऱ्या अंगरक्षकाच्या मारहाणीमुळे राजांचा मृत्यू झाला होता त्याला इंग्रज सरकारनं निर्दोष सोडून दिलं. एवढंच नाही तर मुंबई सरकारनं 'महाराजास ठार मारण्याचा कोणाचाच हेतू नव्हता ते अपघातानेच मेले' असा निष्कर्षही काढला.
यावेळी कोल्हापूरच्या राजघराण्यात चार विधवा राण्या होत्या. शहाजी उर्फ बुवासाहेब यांच्या पत्नी ताईसाहेब, तिसऱ्या शिवाजी महराजांच्या पत्नी अहिल्याबाई, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी सकवराबाई आणि दुर्दैवी चौथ्या शिवाजी राजांच्या अवघ्या पंधरा-सोळा वर्ष वयाच्या आनंदीबाई. पुणे आणि सातारा येथील कट करस्थांनाना पायबंद घालण्यासाठी आबासाहेब घाटगे कागलकरांचे ज्येष्ठ चिरंजीव यशवंतराव उर्फ बाबासाहेब यांनाच आनंदीबाई राणीसाहेबांनी दत्तक घ्यावे अशी शिफारस करण्यात आली. आणि आशा तऱ्हेने १७ मार्च १८८४ रोजी वयाच्या १० व्या वर्षी यशवंराव उर्फ बाबासाहेब कोल्हापूर गादीचे छत्रपती बनले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज.
कोल्हापूरच्या गादीचा इतिहास मोठा रंजक आहे.
संदर्भ
शाहू छत्रपती आणि लोकमान्य
लेखक : य. दी. फडके