शब्द..!!
मी बघितलेय शब्दांना फुलताना
मी बघितलेय शब्द कोमेजताना
मी बघितलेत
शब्दांचे दिवे पेटताना
शब्दांशी मी खेळत असतो
शब्दांचे फुगे फुगवत बसतो
मी बघितलेत
शब्द फटकन
फुग्यासारखे फुटताना
शब्दात शक्ती असते
अनु-रेणूची
शब्द मने पेटवून जातात
स्फोट घडवितात
त्यांच्या सामर्थ्याने
सात मावळे दौडत जातात
ही शब्दांचीच किमया असते
शब्द ओथंबून येताना मी बघितले आहे
शब्दांची प्रार्थना मी अनुभवली आहे
तुमच्या ओंजळीतील
शब्दांचा दिवा
देवाजवळ तेवताना बघितला आहे
शब्द रडतात
शब्द रडवतात
डोळ्यातून चक्क पाणी काढतात
काढायला लावतात
बाबा गेले नि भिजून गेले आईचे शब्द
शब्दांनीच सावरले आईला
आणि शब्दाना बघितलेय
तिला सावरताना
त्या दिवशी
मी बघितलेय शब्दाना
तिच्या डोळ्यातील आसवे पुसताना
आणि बघितलेय
आम्हालाही धीर देताना
आमच्या पाठीशी ठाम
उभे रहाताना । "शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले." व्यक्त आणिअव्यक्त भावनांना मूर्त स्वरुप देतात ते शब्द... कधी शस्त्रापेक्षा जास्त जखम करु शकते.. तर कधी जखमेवर हळूवार फुंकर घालते...कधी टचकन डोळयात पाणी आणते.. तर कधी सुंदर हासू देऊन जाते... या पानावरील शब्द माझे नाहीत.. हे सर्व त्या महान लेखकांचे शब्द जे माझ्या मनाला भावले.. तुम्हा सर्वांबरोबर या शब्दांचा आनंद घ्यावा.. म्हणून हा प्रयत्न... हे शब्द तुम्हालाही नक्कीच भुरळ पाडतील.. त्या सगळ्याचे श्रेय त्याशब्दांना जन्म घालणारे लेखक...त्यांचे मन:पूर्वक आभार.