27/09/2023
भारतातील लोक मोठ्या संख्येने आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाडीला टायर घेण्यासाठी MRF टायरला प्राधान्य देतात. MRF देखील त्याच्या शेअरच्या किमतीमुळे चर्चेत आहे. एमआरएफचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. एमआरएफची सुरुवात फारशी चमकदार नव्हती. ही कंपनी अस्तित्वात येण्याची कहाणी खूप मनोरंजक आहे. एका फुगे विक्रेत्याने ही कंपनी स्थापन केली आहे.
१९४६ मध्ये केरळमध्ये जन्मलेले के.एम. मम्मन मॅप्पिलाई चेन्नईच्या रस्त्यावर फुगे विकायचे. मम्मन यांना १० भाऊ आणि बहिणी होत्या. मम्मन फुगे घेऊन गल्लीबोळात जाऊन विकायचे. त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की एके दिवशी ते ४६,३४१ कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली कंपनी उभारतील. १९५२ हे वर्ष त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. एक विदेशी कंपनी टायर रिट्रेडिंग प्लांटला ट्रेड रबर पुरवत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा एक गोष्ट त्यांना खटकली. आपल्या देशातच ट्रेड रबर बनवण्यासाठी कारखाना का उभारता येत नाही, असा विचार त्यांच्या मनात आला.
मम्मन यांना ही एक चांगली संधी वाटली. त्यांनी आपल्या सर्व बचतीतून रबर बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच एमआरएफचा जन्म झाला. ट्रेड रबर बनवणारी ही भारतातील पहिली कंपनी होती. उच्च गुणवत्तेमुळे काही वेळातच त्यांचा व्यवसाय लोकप्रिय झाला.
१९६० मध्ये मम्मन यांच्या व्यवसायात आणखी एक टर्निंग पॉइंट आला. त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता. पण त्यांना फक्त रबरच्या व्यापारापुरते मर्यादित राहायचे नव्हते. मम्मन यांची नजर टायरच्या मार्केटवर होती. MRF हा एक चांगला ब्रँड बनला होता आणि कंपनीला आता टायर मार्केटमध्ये उतरायचे होते. MRF कंपनीने अमेरिकेच्या मॅन्सफिल्ड टायर आणि रबर कंपनीकडून तांत्रिक मदत घेतली आणि टायर उत्पादन युनिट स्थापन केले. १९६१ मध्ये एमआरएफ कारखान्यातून पहिले टायर तयार होऊन बाहेर आले.
MRF कंपनीने ग्राहकाचा विश्वास संपादन करून टायर मार्केटमध्ये वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. १९६७ मध्ये अमेरिकेत टायर निर्यात करणारी ही भारतातील पहिली कंपनी ठरली. यानंतर, १९७३ मध्ये, MRF ही भारतातील पहिली कंपनी बनली जी व्यावसायिकरित्या नायलॉन ट्रॅव्हल कार टायरचे उत्पादन आणि मार्केटिंग करते.
MRF ने १९७३ मध्ये पहिले रेडियल टायर तयार केले. २००७ मध्ये प्रथमच MRF ने एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल करून विक्रम केला होता. पुढील ४ वर्षात व्यवसाय चारपट वाढला. एमआरएफ कंपनी सध्या दुचाकी पासून ते विमान तसेच लढाऊ विमान सुखोईसाठी टायर बनवत आहे. एकेकाळी मद्रासच्या रस्त्यांवर फुगे विकून,काळाची गरज ओळखून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मम्मन यांनी मोठं उद्योग साम्राज्य तयार केले आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला..🙏