08/06/2021
भेट तुझी माझी स्मरते..
या ओळी प्रेम,भावगीताशी निगडित आहेत,याचा राजकीय भेटीशी संबंध नाही,असे असले तरी आज सारख्या याच ओळी ओठांवर खेळताहेत.
का बरे येत असतील? उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांची भेट झाली म्हणून..
लोकांना क्रिकेट, राजकारण आणि मनोरंजन हे विषय अतिशय आवडतात.अशीच आवड जोपासणारा मी एक.
जेवढा विव्हीयन रिचर्ड्सचा शैलीदार फटका, हेडलीच्या भरधाव वेगाने फलंदाजांच्या अंगावर येणारा चेंडू,सुनिल गावस्करचा स्ट्रेट,कव्हर ड्राइव्ह,वेंगसरकर,चेतन चौहानची चिवट खेळी,सचिन,सेहवाग,विराट चा आक्रमक खेळ आवडतो तेवढाच गुरुदत्तच्या चेहऱ्यावरील अनाकलनीय भाव,राज कपूरचा भोळेपणा,मिश्कीलपणा,शम्मी कपूरचा धसमुसळेपणा,जॉय,आणि विश्वजित यांचे खलनायकांकडून मार खाणे आणि पुन्हा गोड, सुंदर नायिकांसमोर मिरविणे,जितेंद्रचे नाचणे देखील आवडते आणि राजकारणात म्हणाल तर पंडित नेहरूंच्या व लाल बहादूर शास्त्रीच्या कामगिरीचा पुस्तकी आढावा घेतला असला तरी अटलजी,मोरारजी,यशवंतराव, चंद्रशेखर, ज्योती बसू, सोमनाथ चटर्जी, विश्वनाथप्रतापसिंह, राजीव गांधी पी.ए.संगमा, लालू प्रसाद, मनोहर जोशी, जॉर्ज फर्नांडिस,शरद पवार,सुधाकरराव नाईक, आणि अर्थात बाळासाहेब ठाकरे देखील कायम आवडत आलेत.
आज या रांगेत नरेंद्र मोदी, गंमत म्हणून राहुल गांधी,जे.पी.नड्डा,ओम बिर्ला, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ,अजित पवार, चंद्रशेखर राव, राजशेखर रेड्डी, स्टॅलिन, उद्धव ठाकरे, चंद्रकांत दादा,प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर, नारायण राणे, रावसाहेब जानवे,अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले,जयंत पाटील, आणि (सर्वांना आवडत असतील हे गृहीत धरून ) रामदास आठवले हे देखील येऊन बसलेत.
यांच्यातील मतभेद , त्याची वैचारिक उंची,एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप याकडे केवळ शुद्ध याच हेतूने बघावे.
आजकाल भेटी खूप चर्चेत आल्या आहेत.तसा त्याला इतिहास जुना नाही यापूर्वीही त्या हेडलाईन, ब्रेकिंग न्यूज बनत.अटलजी,अडवणीजी बाळासाहेब भेट कोणीही विसरू शकणार नाही.
दीड-दोन महिन्यांपूर्वी अमित शाह-शरद पवार यांची (झालेली,न झालेली भेट) चर्चेत आली आणि त्यानंतर हा भेटींचा सिलसिला सुरू झाला.
कधी फडणवीस- शरद पवार भेट तर कधी फडणवीस- एकनाथ खडसे यांचे घरी जाऊन त्यांचेशी बोलणे, मग नाथाभाऊ आणि शरद पवार, बाळासाहेब थोरात- शरद पवार भेट असा सिलसिला सुरू झाला अर्थात शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस हे सुर्यप्रकाशाईतके स्पष्ट असताना पवार- फडणवीस आणि उद्धव- मोदी भेटीने अनेक राजकीय सुरस कथांना जन्माला घातले आजकाल त्या वृत्त वाहिन्यांवर बघतांना, ऐकतांना अगदी विराटच्या आक्रमक फटक्यासारखे, अमिताभ,धर्मेंद्रच्या दमदार डॉयलॉग सारखे मनोरंजन होते.
या सुरस कथातील हवा निघून जाते तेव्हा मात्र भरमसाठ मार खालेले, प्रेम चोपडा, अमरीश पुरी सारखी या वाहिन्यांची अवस्था झालेली असते..
अतुल क. तांदळीकर