30/07/2023
ज्ञानपथ पब्लिकेशन प्रकाशित चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे.
प्रस्तावना
डॉ.श्रीपाल सबनीस
८९ व्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,पुणे
सर्वच क्षेत्रात आपल्या गुणांची नाममुद्रा ठळकपणे उमटविणारी 'संस्कृती नायिका'
डॉ. वीणा राऊत नारनवरे
सेवानिवृत्ती ही नोकरी संबंधाने अस्वस्थ देणारी वाटत असली तरी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉ. वीणा राऊत यांच्या ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाला निवृत्ती मानवणार नाही. सतत टवटवीत व ताजेपणा निसर्गतः ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असते. त्यांना निवृत्ती स्पर्शही करीत नसते.
या ग्रंथात आप्तवाईकांचे नव्हे तर इतर अनेकांनी भरभरून अकृत्रीम लेखन विणाताईच्या कार्याबद्दल लिहिले आहे हे भाग्य दुर्मिळच. डॉ. वीणा यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाला अनेक साक्षीने स्वप्रमाण इथे नोंद घेतल्या आहेत.
स्वतः वीणाला सुद्धा आपल्या सामर्थ्याचा साक्षात्कार त्यामुळेच घडला असावा. या लेखनात ज्यांनी हजेरी लावली त्यांच्या मनाचा सच्चेपणा व मोठेपणा गौरवास्पदच म्हटला पाहिजे. विशेषतः महिलांच्या लेखनातील वीणाताईच्या कौतुकाची वास्तवता नोंद घेण्यासारखीच आहे. वीणाताईच्या तुलनेत गुणांची विविधता स्वतःमध्ये नसताना त्याचा न्यूनगंड न बाळगता मुक्तकंठाने या भगिणींनी कौतुकाचा पाऊस
पाडलाय.
डॉ.ज्ञानेश्वर पोहाणे यांच्या 'कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व' या शीर्षकातच वीणा ताईच्या कार्याचा सत्तावीस वर्षांचा आलेख कसा उंच उंच शिखर गाठणारा ठरला हे लक्षात येते. आपल्या संस्थेतील एखाद्या प्राध्यापकाचा 'गौरवग्रंथ' सेवानिवृत्तीच्या दिवशी आमच्याच संस्थेत प्रकाशित व्हावा यासारखा आनंद विरळाच! असे म्हणणाऱ्या पोहाणे सरांच्या लेखणीतूंंन वीणाताईच्या प्रेरक प्रवासाचा कर्तृत्वपट शिक्षकांना आणि वाचकांना निश्चितच बोध घेण्यासारखा आहे. डॉ प्रदीप आगलावे या आंबेडकरवादी विद्वानाने पीएच. डी.चे संशोधन पूर्ण करणारी विद्यार्थिनी डॉ. वीणा राऊत यांच्या अभ्यासू वृत्तीचे तोंड भरून कौतुक केले आहे.
कुलगुरूंनी फोन करून विद्यापीठाच्या कार्यक्रमात सूत्रसंचालनाचे निमंत्रण दिलेल्या प्रसंगाची आठवण सांगितली. प्रबोधनाच्या विद्यापीठातील शिक्षिका असा यथार्थ गौरव गुरूच्या लेखणीतून वीणाताईच्या वाट्याला आलाय. 'वीणा ताई हे उदाहरण ठरावे जगण्याचे व जगणे सांगण्याचे' या अर्थगर्भित वाक्यातच 'वीणा राऊत: संधीचे सोने' या ज्येष्ठ पत्रकार रणजीत मेश्राम यांच्या लेखात वीणाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधागी पैलू सांगून जातात. अंगभूत गुणांच्या वितरणातून वीणा कशी निवृत्त होणार? या वाक्यातील ऊर्जा वीणाताईंच्या पुढील प्रवासाची शिदोरी आहे.
पहिल्या बाळाच्या जन्मापासून ते आज नातवंडांनाही तपासणारे डॉ. सुरेश निनावे यांचा स्टेथास्कोप व्यवहाराचा गंध नसलेल्या कौटुंबिक नात्यात दिसतो. वीणाताईंच्या गौरवग्रंथाच्या सन्मानाचा मानकरी अमरही आहे हा स्नेहाचा ओलावा 'दोन शब्द अपुरे....' या लेखाची गाथा अधोरेखित करतो.
आचार्य विजया मारोतकर या
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या समृद्ध नेतृत्वाने, वीणाताईच्या सूत्रसंचालनासह एकूणच कर्तृत्वाचा मुक्तपणे गौरव केलाय. पान्हा न चोरता एखादी लेखणी किती व कशी पाझरते याची साक्ष विजयाताईंच्या लेखनात दिसते. 'कार्यमग्न आणि कार्यनिष्ठा.. कायमच जपताना
सारे सूर जुळवत नेते ..
ही वीणा जगताना..' वीणाताईंच्या जीवनाचे संचित सूत्र काव्यात्मक पातळीवर अभिव्यक्त करताना विजयाताईच्या जीवन - जाणिवा प्रगल्भ असल्याचे जाणवते.
प्रा.डॉ.रोहिदास जाधव या भोरच्या प्रामाणिक कार्यकर्त्याने वीणाताईच्या प्रेमळ स्वभावाची आणि खळखळत्या झऱ्यासारख्या वृत्तीची साक्ष नोंदवली. 'शब्दाचा जादूगार' असणाऱ्या वीणाताईंनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषदांमधून सहभाग दिल्याचे सत्य डॉ.रोहिदासने सांगितले आहे. तसेच मॉरिशसमध्ये नाटकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीजींची भूमिका वठवून अव्वल अभिनयाचे दर्शन घडविणाऱ्या वीणाताईंच्या आंतरिक गुणांचा गौरव केलाय.
सांस्कृतिक स्त्रोत प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली येथील नामवंत दिग्दर्शक, नाट्यकलाकार डॉ. विनोद इंदुरकर यांनी 'एक गहन जीवनधारा' या लेखात उच्च विद्याविभूषित, आकर्षक देहबोलीने सर्वांचे मन जिंकणारे आणि आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व... प्राप्त परिस्थितीशी जुळवून सोबत्यांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडून अभिनंदनीय कार्य करून घेण्याचे सामर्थ्य असलेले एक दुर्मिळ उदाहरण असा डॉ. वीणाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना, पुढे जाऊन म्हणतात कमी वयात वैवाहिक जीवनाची धुरा सांभाळून डॉ. बाबासाहेबांचा आदर्श ठेवून एक स्त्री शिक्षणात कुठपर्यंत मजल मारू शकते .हे बोलके उदाहरण देऊन त्या किती विद्यार्थीप्रिय आहे.. याचा सुंदर परामर्श इंदुरकर यांच्या लेखणीतून व्यक्त झाला. हा लेख समस्त महिलांना प्रेरणा देणारा आहे.
'संविधान जागर' या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. वीणा राऊत यांनी केले. त्यांचा उत्कृष्ट अभिनय नाटकाची उंची वाढवतो असा त्यांचा वृत्तांत सांगताना एम. एस.जांभुळे यांनी इतर नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी त्यांच्या एकूण कर्तृत्वाची प्रेरणा घ्यावी, असे सुचविले आहे. डॉ. बिदन आबा यांनी त्यांच्या प्रदीर्घ अशा इंग्रजी लेखांमध्ये डॉ. वीणाताईंच्या सामाजिक सांस्कृतिक, योगदानाची आणि शैक्षणिक कामगिरीची सप्रमाण नोंद केलीय.
प्राचार्य संध्या राजूरकरानी ओबीसी महिला संमेलनातील संचालनातील डॉ. वीणाच्या सक्षम साथीचा गौरव केलाय. शैलीदार संचालनाची नोंद घेऊन सामाजिक संवेदना जपणारी डॉ. वीणाताईंची भूमिका गौरविली आहे. विचारांनी जवळपास उजवी असली तरी व्यक्ती म्हणून अत्यंत लाघवी असण्याचा प्राचार्य संध्या राजूरकरांचा अभिप्राय बोलका आणि अर्थपूर्ण आहे. फुले आंबेडकरी प्रवाहात वावरणाऱ्या डॉ. वीणा राऊत यांना विचाराने उजवी म्हणण्याचे धाडस संध्या ताईनी केलय. कारण अस्सल कलावंत उजवाही नसतो आणि डावाही नसतो. वीणाताईंचे कर्तृत्व नृत्य, गायन, अभिनय, नाट्य, निवेदन अशा विविध कलामाध्यमांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अभिजात कलावंताला अभिनय बहुजन उजवे-डावे अशी विभागणी मान्य नसते. कारण उजव्या प्रवाहात डावी प्रवृत्तीची माणसं आणि डाव्या प्रवाहात उजव्या प्रवृत्तीचा जन्म शक्य आहे. त्यामुळे सर्वच द्वंद्वापलीकडील सत्याचे व सौंदर्याचे दर्शन घेण्यासाठी अव्वल प्रतिभा प्रतिबद्ध असतात.
परिवर्तन विचारमंचच्या कार्यातील वीणा राऊत यांचा अर्थपूर्ण सहभाग विलास गजभिये यांनी कथन केलाय. 'आईसाहेब ते माईसाहेब' या सूत्रावरील परिवर्तन विचारमंचच्या कार्यक्रमातील डॉ. वीणा राऊत यांची भूमिका महत्त्वाची ठरली. परिषदेचे मिळालेले अध्यक्ष व त्यागपूर्वक सन्मानाने दुसऱ्या भगिनीस देणे यातील डॉ. वीणा यांच्या मनाचा मोठेपणा प्रेरणादायी ठरतो. विशेष म्हणजे 'माता रमाई आणि सविताताई आंबेडकर' या दोन्ही बाबासाहेबांच्या आदर्श पत्नींना समान मानणाऱ्या जागरणाचा प्रयोग जातीव्यवस्था विरोधाच्या संबंधाने निर्णायक महत्त्वाचा ठरतो. या प्रयोगातून डॉ.
आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नीला आरोपमुक्त करून शुद्ध प्रबोधनाचे पुण्य पेरले गेले आहे. डॉ. वीणा राऊत यांच्या वलयातील ही वास्तवता विलास गजभिये यांनी प्रांजळपणे कथन केली.
सौंदर्याची खाण, लेखनाची जाण, निवेदनाचा बाण अशा काव्यात्मक शब्दात माजी विद्यार्थिनी मृणाल रामटेके यांनी वीणाताईंच्या कार्याचे वर्णन केले. 'तथागतांना शरण आणि फुले शाहू आंबेडकरांचे स्मरण' या संदर्भाने वीणाताई नागपूरचे भूषण असल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय. म. फुले सावित्रीमाई आणि बाबासाहेबांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्त्व जाणून नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे जाणाऱ्या, वीणाताईंच्या अंधश्रद्धेला थारा न देणाऱ्या चपखल वृत्तीचे वर्णन करताना डॉ. लीना निकम यांनी मैत्रीच्या 'हृदयाचे नाते जपणारी वीणा' या लेखात संकटात सापडलेल्यांना मदत करण्याचा आपला हक्क कोणीही हिरावू शकत नाही, हे कोविड काळात लीनाताईंच्या अनुभवातून निघालेले वाक्य मानवतेच्या कोंदणात रोवून ठेवण्यासारखे आहे. मुक्त कंठाने आणि सिध्दहस्त लेखणीने केलेले वीणा ताईचे वर्णन हृदयातून मैत्री जपणारेच आहे.
शिक्षक साहित्य संघाच्या संदर्भाने वीणा राऊत या 'प्रेरणादायी रसायन' असण्याची भावना शि.सा.संघाचे अध्यक्ष जयदीप सोनखासकरांनी व्यक्त केली. अविनाश तेलंग यांनी 'कोविड'मध्ये गरजूंना केलेल्या मदतीच सामाजिक कार्य असा गौरव केला आहे.
"कोविड काळात माझी मुलाखत घेऊन मला तांत्रिक ज्ञानाची भरभरून शिकवणी देणाऱ्या वीणाताईनी यूट्यूब चैनलच्या माध्यमातून माझ्या औषधाने हजारो रुग्ण वाचविण्याचे समाधान माझ्या पदरात टाकले. पण या रुग्णांना वाचविण्याच्या मागे एक खंबीर नेतृत्त्व उभं होतं, ती म्हणजे वीणाताई" अशा शब्दांत डॉ. प्रज्ञा मेश्राम कृतज्ञभाव व्यक्त करतात.
'काळजात लपलेलं वीणा तत्व' जगदीश राऊत या वीणाताईंच्या भावानी काव्यातून अभिव्यक्त केले. फुले, आंबेडकर ज्येष्ठ नागरिक संघाचा आणि डॉ. वीणा राऊत यांचा अनुभव एल. टी. लावात्रे यांनी सविस्तर वर्णनात्मक उलगडला आहे. तसेच 'निर्धार क्रांती', 'संविधान जागर', 'सपनो की उडान -स्त्री मुक्ती की जुबान' या नाटकातील वीणा ताईंच्या भूमिकांचा सुंदर परामर्श घेतलाय. अखिल भारतीय महिला क्रांती परिषदेचा लौकिक अनेक मान्यवरांच्या कर्तृत्वाने गाजला. त्यात विणाताईचे योगदान निर्णायक असल्याचे एल. टी. लवात्रे सांगू पाहतात.
कुशल शिल्पकारांनी कोरलेले सुरेख शिल्प अशा ललितरम्य भाषेत प्रा. मधुकर बागडे यांनी डॉ वीणा राऊत यांच्या अंतर्बाह्य सुंदरता घेऊन जन्माला आलेल्या व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ गौरव करताना त्यांच्या भावनेला आणि भाषेला उधाण आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रिद विद्यार्थ्यांना घडविण्यापुरतेच मर्यादित न ठेवता आपण कोविड काळातही समाजाला समर्पित केले.प्रत्येक क्षेत्रात अपडेट असून नोकरी करताना महाविद्यालयावर निस्सींम प्रेम करणाऱ्या त्यांच्या निवेदनाचा गौरव देखिल केला.आपण 'आसमा की नही, धरतीकी चांदणी हो' असा वीणा ताईंच्या लखलखणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा परामर्श घेतला. ज्ञानेश्वर रक्षक यांनी वीणा राऊत यांच्या शैक्षणिक पदव्यांची यादी समोर ठेवून वीणा अमरच्या कौटुंबिक, शैक्षणिक जीवनाच्या आणि त्यांच्या कूटुंबाशी असलेल्या स्नेहबंधाचे करुणरम्य दर्शन घडविले आहे. वसंत खंकाळ यांनी उत्कृष्ट निवेदन करणाऱ्या डॉ. वीणा यांच्या पुरस्काराची यादीच दिलीय. शिवाय 'संविधान जागर' आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीजीच्या भूमिकेचे 'भूतान' मध्ये घडलेले दर्शन याचा वृत्तांत सांगितला आहे.
वीणाताईंच्या वावरण्याचे क्षेत्र इतके विशाल आहे की, अनेकांच्या मनात घर करून बसलेल्या या बाईसाठी म्या पामराने काय बोलावे? इतके सहजपणे सहृदयातून 'मैत्रीचा दरवळ' या लेखात अधोरेखित करणाऱ्या प्रा. मीनल येवले यांचे वाक्य प्रांजळपणे मैत्रीचा दरवळ पसरविणारेच आहे. 'मनाला इजा पोहोचवणाऱ्या प्रसंगातून धीर देणाऱ्या मैत्रिणींपैकी वीणाताई एक आहे', हे उद्गार म्हणजे मीनलताईच्या हृदयात वसलेलं वीणाताईवरचं निस्सींम प्रेम म्हणावं.
विणेचे तार जसे एकमेकात गुंतून राहतात..तशी तू सर्वांमध्ये गुंतून, जोडून राहणारी माझी बहीण, मैत्रीण आहेस. क्वचित लाभणाऱ्या कल्याण मैत्रीची आभा तुझ्यात आहे. तू सुसंस्काराचा मळा आमच्यात पेरलास. प्रसंगी आर्थिक, शारीरिक, मानसिक मदत करणारी निर्भेद जगणारी आम्हाला सांभाळणारी वीणाताई आहेस. 'कल्याण मैत्रीची आभा' या लेखात ममता बोदेले सांगतात. दुर्बलांच्या वंचनाची केवढी तुला जाण सखे असे 'मर्मबंधातील ठेवा' या गझलेत चित्रा कहाते यांनी वीणाताईच्या संवेदनशील मनाचा भाव स्पर्शीला आहे.
डॉ. सुनंदा बोरकर जुलमे यांनी, 'महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन, सावित्रीबाई फुले जयंती, शिक्षक दिन अशा सर्व कार्यक्रमाची जबाबदारी डॉ. वीणा राऊत यशस्वीरित्या पार पाडत असायच्या', असे म्हटले आहे. त्यांच्या आवाजातील जन्मजात
गोडव्याचे कौतुक केले आहे. डॉ जुलमे लेखातून देखणेपणाचा वारसा मिळालेला राजबिंड्या रूपाच्या भावाचे निधन झाल्याची खंत काळजाला चटका लावते. मुख्य म्हणजे वीणाताईंच्या प्रत्येक कृतीला आंबेडकरी निष्ठेचे अधिष्ठान असल्याचे सत्य डॉ. सुनंदा बोरकर जुलमे सांगू पाहतात. तसेच उत्तम ड्रेस सेन्स आणि नीटनेटका मेकअप या स्त्रीसुलभ गुणाचा गौरव येथे अधोरेखित झालाय. या संपूर्ण लेखनात डॉ. वीणाताईचे पतीराज अमर नारनवरे यांचे मनोगत अत्यंत प्रांजळपणे व्यक्त झाले. वीणा ताईंच्या लाघवी सौंदर्याची भुरळ पडली आणि आपण विवाहबद्ध झाल्याची कबुली त्यांनी दिली. वयाच्या पंधराव्या वर्षी झालेले लग्न, वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि वीणाताईंचे पूर्णत: शाकाहारी असणे, अंधश्रद्धेला असणारा विरोध, स्वयंपाक न येणे, त्यामुळे नवनव्या रेसिपी शिकण्याचा प्रयत्न, शिक्षणाची जिद्द, जीवनातील चढउतार आणि वादळे स्वतःसोबत मुलांचे शिक्षणं, सूनेशी संवाद संपूर्ण नारनवरे कुटुंबाला जिंकणारे वीणाताईचे प्रेम, सुखी संसाराचा तपशील, मुलामुलींचे यशस्वी जीवन, नातवंडांचे सुख... अशा अनेक घटना प्रसंगांमधून आलेले पती अमर नारनवरे यांचे प्रांजळ मनोगत भावणारे आहे. पत्नीच्या अंतर्बाह्य सौंदर्याचे सत्य इमानदारीने पचवणाऱ्या दुर्मिळ नवऱ्यापैकी अमर नारनवरे एक आहेत.
न्यू अपॉसटोलिक इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका पदावर रुजू झालेल्या वीणाताई, 'रिस्तो का अटूट धागा' या लेखात वंदना बेंजामीन आणि विनिता बावर यांच्या हृदयात बहिणीच्या नात्याची जागा घेतात. हा विणाताईच्या कर्तृत्वाचा आणि निर्मळ स्वभावाचा घट्ट धागा आहे. आनंदाने जीवन जगण्याची शिकवण देणाऱ्या आणि जिच्या मार्गदर्शनाने जीवनाचे भले झाले अशी वीणाताईंच्या अनुबंधाची भावकथा भाऊ प्रकाश राऊत यांनी मांडली आहे. स्वतःचे दागिने गहाण ठेवून भावाला मदत करणारी वीणाताई भावाच्या ओल्याचिंब शब्दातून वाचताना
वाचकांच्याही काळजाला पाझर फुटेल. प्रणोती कळमकर यांनी वीणाताईच्या गायन, लेखन, निवेदन, नृत्य, नाटक व अभिनय या सर्वच कलागुणांची नोंद करून त्यांचे कार्य चौफेर असल्याचे भाव व्यक्त केले. रमा सोनवणे यांनी वीणा ताईंच्या संघटन कौशल्याचा सन्मान करून वागण्या बोलण्यातील आपलेपणा अधोरेखित केलाय. विशेषतः भूतान टूर दरम्यान वसंत खंकाळ यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस असल्याने नास्त्याच्या टेबलवर त्यांनी सगळ्यांना चाॅकलेट दिले, तेव्हा प्रसंगावधान ठेवत वीणाताईंनी सर्वांना मंगलगाथा म्हणायला सांगितली. सर्वांसमक्ष मिळणाऱ्या या मंगलकामनांनी खंकाळ सरांना वाढदिवसाचा अपूर्व आनंद मिळाला, हा सुंदर प्रसंग कथन रमाताईंनी कथन केला आहे.
रजनी यशवंत कांबळे यांनी संवादाचा फुलोरा फुलवणाऱ्या डॉ. वीणा यांच्या ध्येयवादी आयुष्याची 'निश्चयी' वाटचाल अधोरेखित केली. गरीब-श्रीमंतीचा भेद न करणारी, आम्हाला स्वाभिमानाने कसे जगायचे हे शिकविणारी, परिवर्तनाच्या दिशेने कुटुंबातील काही प्रथा मोडीत काढणारी अशी वीणाताईंची भाची इंजिनिअर श्वेता अमोल शेंडे यांनी 'सौंदर्यात अन स्वभावातही अप्सराच ! या संपूर्ण लेखात मनमोहक आत्या उभी केली आहे. 'सदाफुली' सारख्या प्रसन्न असणाऱ्या व्यक्तीमत्वाला प्रा. माधुरी गायधनी दुपटे यांनी समर्पक शीर्षक दिले. एकाच महाविद्यालयात असल्यामुळे महाविद्यालयीन आणि सामाजिक कार्य आम्ही एकमेकींच्या हिंमतीवर मिळूनच केले असे सांगतात.अनेकांना मदतीचा हात देणाऱ्या डॉ. वीणाताई सकाळी मुंबई वरून नागपूर गाठतात आणि संध्याकाळी आपल्या मैत्रिणीच्या कार्यक्रमाची उंची वाढविण्यासाठी उत्कृष्ट संचालन करतात. ही बाब जवळच्या मैत्रिणीसाठीच होऊ शकते. म्हणून डॉ.वीणा मॅडम आम्ही मैत्रिणी आहोत की नाही माहित नाही. या माधुरी गायधनी हयांच्या वाक्याचा आणि साशंकतेचा इथे काडीमोड होतो. प्रा. विशाखा कासारे यांनी साईनाथ प्रायमरी विभागापासून कॉलेज पर्यंतच्या सर्व विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करून प्रत्येकाबद्दल स्नेह आणि जिव्हाळा वीणाताईंनी जपल्याचे वास्तव नोंदवले आहे. तुम्ही आमचा आधार, प्रेरणा आहात असे लिहिताना त्यांच्या मनाची अस्वस्थता जाणवते. माधुरी, वीणा आणि मी आमची मैत्री ही समाजाचा आदर्श आहे. याला दृष्ट लागू नये, असे सांगून या त्रिवेणी संगमाचा त्या गौरव करतात.
विविध गुणांनी बहरलेल्या वीणाताईंच्या निवेदनावर विद्वानही स्तुतीसुमनांचा वर्षाव करतात हे 'विविध गुणांची खाण' या कवितेत मंगला जांभुळे यांनी गौरवीत केले.
बालपणीच पितृछत्र हरवल्याने माझ्या मम्मीला आणि आम्हा तीनही बहीण भावंडांना आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्वतोपरी सांभाळणारी माझी मावशी मायेची सावली आहे. लहानपणी मावशीच्या मागे राहणारी रोहिणी रामटेके, 'मी आजही माझ्या मावशीच्याच मागे राहते.माझी मावशी मायेची सावली देणारा जणू काय वटवृक्षच आहे', असे म्हणते तेव्हा आपलेही मन गदगदून येते.
'सुंदर गोष्टीचा छंद जोपासला की एकटेपणाची जाणीव कधीही मनात घर करत नाही, असे तुझे सुंदर व्यक्तिमत्त्व आणि सकारात्मक विचार आनंदी जीवनाची शिदोरी आहे', असे नमूद करणाऱ्या प्रणिता खडतकर 'हृदयाचा झंकार : माझी वीणा' या लेखात प्रत्येक प्रश्नाचे सोल्युशन असणाऱ्या डॉ. वीणा यांचा सर्वांना मदत करण्याचा स्वभाव प्रांजळपणे समोर आणला. वीणाताईच्या सर्व मनोकामना ईश्वराने पूर्ण कराव्यात. अशी प्रार्थना एका मैत्रिणीने करावी यातच वीणाताईंच्या सेक्युलर जगण्याची पावती मिळते.
नणंद नसून मैत्रीण आहे असा उल्लेख करणाऱ्या कांचन वहिनीं वीणाच्या स्वभावाचा, कर्तृत्वाचा गौरव करतात.'मलाच नव्हे तर सर्व कुटुंबाला आर्थिक, शारीरिक मानसिक मदत करणारी पती सुरेशची बहीण वीणा ही सुसंस्काराचा मृदगंध पेरणारी आहे', असे त्या लेखात नोंदवितात. लाडक्या भावालाच नव्हे तर वहिणीला कोविड काळात वाचविण्यासाठी धडपडणारी वीणा 'मला पैसे नको भावाचा जीव पाहिजे' ही प्रासंगिक लिखाणाची लकीर हृदयाला पाझर फोडते. मायेच्या प्रांजळ ओलाव्याच्या काळजातून आलेले कांचन वहिणीचे शब्द नात्याचा भावबंध कथन करणारे आहे. 'तू लाखो मे एक तू सबसे अलग, सबसे प्यारी बहन, मुझे खूश नसीब से मिली है बल्की तू मेरी एक दोस्त भी है, असे 'दया का सागर' या लेखात प्रतिभा राऊत बहिणीच्या कार्याचा, स्वभावाचा , मददगारीचा गौरव करतात.
जे व्यक्तिमत्त्व माझी वाट बघत आहे असे सांगणारे डॉ. पोहाणे सरांच्या वक्तव्यावरून शाळेत तेवीस वर्षे त्या व्यक्तीमत्त्वाच्या सहवासात घालविले, तिने नृत्याच्या वेळी केलेली राजेश खन्नाची भूमिका, 'सपनो की उडान, स्त्रीमुक्ती की जुबान' या नाटकात जोतीबाची सावित्री झाली, रौप्य महोत्सवाला 'नळ आला रे आला' या नाटकातील अभिनय, स्वर माधुर्य कार्यक्रमाची रेलचेल, महिला दिनाचे अभिनय संपन्न सहसंचलन यासारख्या मोठ्यामोठ्या कार्यक्रमाला भक्कमपणे असलेली वीणाची साथ असे बरंच काही हृदय कवटाळून टाकणाऱ्या भावना 'मैत्रीचा निखळ झरा' या लेखात आहे. हे सर्व कसं भुर्रकन चिमटीतून निसटून जात आहे. असा भावस्पर्शी लेख बागेश्री मंजुळे नाईक यांच्या लेखणीतून झळकतो. म्हणून शेवटी पुन्हा एकदा त्या म्हणतात 'तुने हो रंगीले कैसा जादू किया' हे वाक्य निश्चितच दोघींच्या मैत्रीची पाळमूळं खोलवर रुजल्याचा दाखला देतात.
प्राची नारनवरे झोडापे 'माझी जननी : माझी प्रेरणा' या लेखात वीणाताईसारख्या आईची थोरवी गाताना स्वतः उंच भरारी घेत, आपल्या पिल्लांना पण बळ देणारी माझी आई. सामान्यापेक्षा वेगळी असल्याचा अभिमान दर्शवितात. 'प्राध्यापिका ते समाजसेविका' हा प्रवास प्रा. मंगला पाटील कथन करतात. आयुर्वेदाचार्य डॉ. प्रज्ञा मेश्राम यांची वीणा मॅडमनी घेतलेली मुलाखत. जणू काय कोरोनावर मात करणारा खजिना सापडल्यासारख्या, आमच्या स्टाफसह समाजाला मदत करीत सुटलेल्या वीणा ताईसारख्या सामाजिक दायित्वाचा पिंड असणाऱ्या व्यक्तीच करू शकतात हे त्यांचे अवलोकन सत्य आहे.
आपल्या सहवासाने आसमंत सुगंधित करणाऱ्या संवेदनक्षम भावनांचे उगमस्थान असलेली, मला लाभलेली सखी वीणा ताई असा 'स्नेहाचा परिमळ' या लेखात डॉ. मोनाली पोफरे भाव प्रगट करतात. 'माझी स्नेही व मार्गदर्शिका' या लेखात प्रा. नम्रता गिऱ्हेपुंजे यांनी वीणाताईंनी कलात्मक शब्द कुठे आणि कसे वापरावे याची कला शिकविली. त्या वीणाताईच्या शारीरिक आणि मानसिक चिरतरुण असण्याचा दाखला देत, कोरोना काळात माणसातला खरा देव वीणाताईंनी बघितल्याची साक्ष देतात. 'देव दगडात नाही तर माणसात आहे' याची जाणीव पुन्हा एकदा नम्रता समाजाला करून देतात. 'स्नेहाचा ओलावा' या कवितेत वीणाताई विनम्रतेचा झरा असून, सर्वांना स्नेहाचा ओलावा देणारी विश्वासाची, भरवसाची किल्ली आहेस', अशी दाद देणाऱ्या अरुणाच्या मैत्रीची साक्ष, अलीकडच्या द्वेष भावना बाळणाऱ्या मैत्रीला दिशादर्शक आहे.
डॉ.वीणा मॅडमनी दिलेली 'कौतुकाची थाप' या लेखात सुप्रिया वारेकर तपाडकर म्हणतात, ही माझ्या पुढील प्रवासाच्या संचालनाची शिदोरीच आहे. किंबहुना वीणा मॅडमने ''सपनों की उडान स्त्री मुक्ती की जुबान" यात बालपणाचा रोल दिल्याने मला निरागस बालपणाच्या बागेत विहार करता आल्याचा आनंद व्यक्त करतात.
शेजारी राहणारी वीणाताई दहावीच्या परीक्षेचे परीक्षा शुल्क हसत मुखाने भरते. पैशापेक्षा शिक्षणाचे महत्त्व अधिक याची जाणीव झालेली वैशाली बांगरे ही मुलगी पुढे साईनाथ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होते. नंतर मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात हक्काने राज्य करणारी एक निरंतर साथ म्हणजे माझी वीणाताई असे भावोद्गार काढते. वैशाली च्या नात्याचे पदर हे शेजारधर्मापासून ते आज हक्काच्या मानवधर्मात गुंफल्या गेलेले संपूर्ण बांगरे कुटुंब दिसते.
डॉ. वैशाली खडतकर माझ्या प्रिय मॅडम या लेखात सांगतात मला राऊत मॅडम सारखच व्हायचं होतं असा निश्चय बाराव्या वर्गातच या आदर्श विद्यार्थिनींनी केला आणि ती सुद्धा डॉक्टरेट झाली ही गुरु शिष्याच्या नात्याची हृदयभेट आहे. अशा आदर्श असणारया वीणाताईनी वैशाली चे डोहाळे सुद्धा पुरविले.खरंच ही शिक्षिका 'मातृत्वाच्या हृदयाचा गाभाराच' आहे . ही विद्यार्थ्यांप्रती असणारी आपुलकी, संवेदनशीलता गुरु शिष्याच्या नात्यातील जिव्हाळ्याचा महामेरू नव्हे तर अन्य शिक्षकांसाठी मार्गदर्शनाचा ठेवा आहे. तेवीस वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीने लिहिलेले पत्र तर विद्यार्थीप्रियतेचा कळसच आहे.
तारुण्याचा उंबरठ्यावर असणाऱ्या तरुणाईचे प्रियकर प्रेयसीचे स्वप्न बघण्याचे हे वय. बारावीच्या परीक्षेनंतरच्या उन्हाळ्यातील सुट्ट्यामधे वीणा मॅडमच्या सहवासाला पारखी झालेली पल्लवी ढगे विणाताईच्या भेटीची विरह व्यथा पत्राद्वारे पोस्टाने कळवते. बोर्डाचा निकाल लागण्याच्या तारखेची चातकासारखी वाट बघते तर
कुणासाठी फक्त राऊत मॅडमच्या भेटीसाठी, ही वीणाताईला विद्यार्थिनीने पत्रातून दिलेली शिष्याच्या रेशीमगाठीची गुरुदक्षिणाच आहे. ह्या गुरुदक्षिणेची तेवीस वर्षापासून वीणाताईंनी जोपासना केली. यावरून विद्यार्थ्याप्रती असण्याचा जिव्हाळा काळजावर कोरून ठेवणाराच आहे. 'विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या शिक्षिका' या लेखात रूपेश मेश्राम हा हिऱ्याला पारखणारा जोहरीच आहे. एका तरुण युवकाने वीणाताईच्या व्यक्तिमत्त्वाचे अवलोकन, निरीक्षण, अनुभव घेऊन गौरव ग्रंथाचे बीज रुजवावे आणि त्त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू समाजाला दिशादर्शक, मार्गदर्शक आणि प्रेरणास्पद ठरावे .
हा विचार मनात येणारा रूपेशचे व्यक्तिमत्व समस्त स्त्री अस्तित्वाच्या अस्मितेची ज्योत प्रज्वलीत करणारेच आहे. ही बाब सृजनशीलतेचे बीज अंकुरित करणाऱ्या' स्नेहबंधाची फुलबाग' या गौरव ग्रंथासोबतच रूपेश मेश्रामचाही सन्मान वाढवणारी आहे.
प्रकाश बावनगडे आपल्या कवितेत वीणाताईंच्या निवेदन शैलीत असणाऱ्या सर्व गुणांचा उल्लेख करतात आणि विणाताईसारखे व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून कसा मंच जिंकतात याचा उलगडा कवितेत करतात.
शालेय मैत्रीण नम्रता राजू चौधरी 'अवखळ वीणा 'या कवितेतून वीणाताईंच्या संस्काराचा वारसा तुझे लाडके विद्यार्थी चालवतील अशी ग्वाही देतात.
'मैत्रीच्या नात्यातील बहीण' या लेखात रेखा ढेंगरे यांनी वीणाताईने बहिणीसारखं भरभरून प्रेम दिल्याने मला बहीण नसल्याची सतावत असणारी खंत विरून गेली याचा आनंद व्यक्त करतात.
'मला आवडलेले व्यक्तिमत्त्व' या लेखात अतुल गुजर लिहितात विणाताईला बघताक्षणीच ती आवडली आणि आज माझी हक्काची बहीण झाली. ही बहिणीची माया, आपुलकीची झालर वीणाताईच्या व्यक्तिमत्वात आहे.
'सप्तसूर झंकारतसे वीणा' या लेखात तोष्णा मोकडे यांनी अल्पकाळात वीणाताईच्या सहवासात येणाऱ्या अनुभूतीरूपी झंकारातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सूर कसे ह्रदयाला भीडत गेले, ही भावना लेखातील प्रत्येक वाक्यात झळकते. आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या धनी 'आमच्या लाडक्या वीणा मॅडम' या लेखात पल्लवी जंगम वीणा ताईच्या व्यक्तिमत्त्वाला बघताक्षणीच माझ्यावर पडलेली छाप आणि 'सपनो की उडान स्त्री मुक्ती की जुबान' या नाटकाच्या अनुषंगाने लाभलेला सहवास मला नवी प्रेरणा देणारा ठरला, असे अभिमानाने सांगतात.
डॉ.वीणा यांच्या व्यक्तिमत्वातील कवयित्रीचा प्रत्यय त्यांच्या कितीतरी प्रासंगिक काव्यातून वेळोवेळी येतो. साईनाथ ,ज्ञानेश्वर शिक्षण संस्थे प्रति लिहिलेल्या 'अभिमान' गीतातून त्यांची संस्थे प्रतीची कळवळ, जिव्हाळा व प्रेम दिसून येते तर शाहू ,फुले आंबेडकरी विचारांची मशाल सतत पेटत राहून त्यामुळे समाजात परिवर्तन घडवून आले पाहिजे. अशा भावना 'परिवर्तन' गीतातून व्यक्त होताना दिसतात. भारतातील 'पहिले ओबीसी महिला' साहित्य संमेलना प्रसंगी लिहून सादर केलेल्या ओबीसी गीताने सर्वांना चकित केले.
मृण्मयी, तरुष या नातवंडांनी ही नानी दादीच्या व्यक्तिमत्त्वाचा कोपरा सांगताना आम्ही तिच्या मार्गदर्शनाने कसे शहाणी होतो असे सांगतात.
अडचणीच्या वेळेला कुटुंबातील सदस्य असो की विद्यार्थी, घरात काम करणारी बाई असो की शेजारी किंवा मित्र मंडळातील गोतावळा सर्वांना भरभरून आर्थिक मदत केल्याचे अनेकांनी स्वलेखात नमूद केलेले आहे. सहजासहजी अशी मदत करणारे व्यक्तिमत्त्व शोधून सापडणे दुर्मिळच!
असे स्नेहीजणांचे (49)एकोणपन्नास लेख, (01) एक पत्र,(01) एक गझल,(09) नऊ कविता, या ग्रंथात सामावले आहे. सगळ्यांनी विविध अंगाने वीणाताईंच्या कर्तृत्वाची, स्नेहत्वाची लेखकांच्या उर्जस्वल लेखणीने घेतलेली नोंद 'स्नेहबंधाची फुलबाग'मध्ये आहे. हा गौरव ग्रंथ मानवतेची उंची वाढविणारा आहे.
मानवतेचा प्राणवायू घेऊन जगणाऱ्या वीणाताईंनी अनेक राजकीय पक्षाचे दिग्गज नेते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विचारवंत अशा क्षेत्रातील महनिय व्यक्तींच्या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन केले आहे. व्यासंग आणि सखोल अभ्यासातून सूत्ररूपाने सारांशात्मक बोलण्याची कला वीणा राऊत यांनी आत्मसात केली आहे. माझा स्वतःचा अनुभव सुद्धा अविस्मरणीय आहे. पुण्याच्या रथी महारथींना मागे टाकण्याची क्षमता सर्वाथाने आणि सर्वांगाने वीणा राऊत यांच्या सूत्रसंचालनात आहे. एका चौकटीत हे व्यक्तिमत्व बंदिस्त होत नाही. नाटक, नृत्य, साहित्य, गायन, दिग्दर्शन ,नव्हे तर कोविड सेवा शैक्षणिक सामाजिक हक्काच्या न्यायासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग... ह्या बहुआयामी क्षेत्रातील वीणाताईचे कर्तृत्व समृद्ध आहे. कलात्मक श्रीमंती त्यांच्या वैभवाची साक्ष ठरते. धम्म प्रेरित मानवतावाद वीणाताईनी पचवल्याने वारकरी संस्कृती, धम्म संस्कृती, विश्व संस्कृतीचे उपजत भान त्यांच्या अंगी रुजल्याच्या अनेक साक्षी मिळतात. बहुधर्मीय व बहुसंस्कृती प्रवाहातील असंख्य लेखकांनी वीणाताईंच्या कर्तृत्वाचा विना अट गौरव केला आहे. अर्थात त्यांची भावना व भूमिका सर्वस्पर्शी व सेक्युलर आहे. ही सेक्युलर भूमिका संविधानात व भारताच्या गाभ्यात कोरली आहे. कर्मठ धर्मांधता वजा करूनच वीणाताई कला, संस्कृतीच्या सेवेत रमल्या. भारतीय नागरिकत्वाचा समृद्ध व श्रेष्ठ आदर्श यांच्या रूपाने आपल्यासमोर कार्यरत आहे. ही खरी समाज संस्कृतीची नायिका ठरते. या प्रस्तावनेत डॉ. वीणाताई राऊत यांचे अभिनंदन करणे माझे सांस्कृतिक कर्तव्य आहे...!
संपादक मंडळ :-
1.विलास गजभिये
2.प्रा.विजया मारोतकर
3.प्रा.संध्या राजुरकर
4.एल.टी.लवात्रे
6.अमर नारनवरे
7.डॉ.सुनंदा जुल्मे
7.एम.एस.जांभुळे
8.ज्ञानेश्वर रक्षक
9.रुपेश मेश्राम
10.प्रा.विशाखा कासारे