22/07/2024
काल यु-ट्यूबवर एक पॉडकास्टची क्लीप पाहण्यात आली, त्यात एक स्वघोषित जोतिशी म्हणत होते."तुमची बायको कितीही वाईट असली, अहंकारी असली, तर तुम्ही दर शुक्रवारी तिच्यापुढे एक बोट उंचवून तकलीया,तकलीया,तकलीया असं म्हणायचं. आणि तिचा अहंकार जाऊन ती पूर्णपणे एका गरीब गायसारखी होऊन जाईल." अशा प्रकारच्या क्लिप तुमच्या सुद्धा पाहण्यात आल्या असतील. अशा प्रकारचे पॉडकास्ट आपण सुजान प्रेक्षक म्हणून एकदाचे हसण्यावारी नेऊ शकतो. अशा प्रकारच्या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपण बघतो. तेव्हा जरी जास्तीत-जास्त व्यक्ती जरी असल्या व्हिडिओला फालतू म्हणत असतील, तरीसुद्धा काही प्रेक्षक गंभीररीत्या असे व्हिडीओ बघत असतात असं दिसून येत. म्हणून अशा प्रकारच्या पॉडकास्टबद्दल बोलण्याची गरज भासते.
मागील दोन वर्षात यु-ट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पॉडकास्टचा खच पडत आहे. कारण हे पॉडकास्ट करण्यासाठी कोणती वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. एखाद्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती बोलवली आणि त्यांना त्यांच्या विषयावर बोलता केलं, म्हणजे आपोआपच त्या विषयात रुची असणारे प्रेक्षक तो व्हिडिओ बघतील. आणि वेगळी कुठलीच मेहनत न करता दोन कॅमेरा आणि माईकचा एक सेटअप घेऊन आपोआपच हे पॉडकास्ट चैनल प्रेक्षकवर्ग मिळवतात. पण आता हे पॉडकास्ट प्रेक्षक म्हणून खरच आपल्या किती फायद्याचे आहे ? हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाच आहे.
एखाद्या पॉडकास्टमध्ये त्या-त्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती येतात आणि त्यांच्याकडून त्या क्षेत्राची खोलवर माहिती आपल्याला मिळते. अनेकदा अशा पॉडकास्टमधून मिळणारी माहिती खूप फायद्याची आणि त्या क्षेत्राबद्दल खोलवर माहिती देणारी असते. असे मान्यवर जोपर्यंत एखाद्या क्षेत्राची माहिती आणि त्यांचे त्या क्षेत्रातील अनुभव सांगत असतात, तोपर्यंत हे पॉडकास्ट ठीक असतात. पण यातील मान्यवर जेव्हा प्रेक्षकांना सल्ला देऊ लागतात, तेव्हा खरी गोची होते. असे पॉडकास्ट पाहणारी प्रत्येक व्यक्ती मान्यवरांचा सल्ला खूप मोलाचा असं समजून ऐकत असतात. आणि त्याप्रमाणे बऱ्याच व्यक्ती आपल्या जीवनात निर्णय सुद्धा घेतात. पण एखादा सल्ला प्रत्येकच व्यक्तीला फायद्याचा ठरु शकतो असे नाही.
अशाप्रकारचे आरोग्य विषयक पॉडकास्ट बघून आपल्या जीवनात निर्णय घेणे धोक्याचे सुद्धा होऊ शकते. अशाच एका पॉडकास्ट एक आहारतज्ञ बाई वडापाव कसा सर्वात पोषक खाद्यपदार्थ आहे, हे समजावून सांगत होत्या. तर एक बाई उसाचा रस हा कोल्ड्रिंकपेक्षा घातक आहे, असं सांगत होत्या. खरतर अशा पॉडकास्टवर वैधानिक इशारा देण्यात यायला हवा. पण तसे करण्याची तसदी असले घेत नाही.