
05/01/2025
#हा माझा मार्ग एकला..
“आई, आज संध्याकाळी ऑफिस मधून यायला उशीर होईल..सतरा वेळा उगाच फोन करू नकोस..” म्हणत देवयानी दरवाजा जोरात आपटत निघून गेली सुद्धा..
दीपिका हातात डबा घेऊन बघतच राहिली..आता हे रोजचं झालं होतं..देवयानीला टिपिकल पोळी-भाजीचा डबा नेणं कमीपणाचं वाटायचं बहुतेक..दीपिकाचे डोळे भरून आले..वडिलांचा राग तिच्यात जशास तसा किंबहुना जरा जास्तच उतरला होता..लहानपणापासून तशी हट्टी आणि रागीट..आता नोकरीला लागली तर अजूनच शेफारली असं दीपिकाला जाणवायला लागलं होतं..
दीपिकाला आपल्या शाळेतल्या मुली आठवल्या..किती छान, संस्कारी..एक शिक्षिका म्हणून किती आदर करायच्या..शाळेतली आदर्श शिक्षिका म्हणून तिला कितीतरी वेळा बहुमान मिळाला होता..पण घरात मात्र तिची काही किंमत नव्हती..मराठी शाळेतील शिक्षिकेला कोण विचारतंय..नवरा तर चक्क म्हणायचा देवयानी समोर..पाणउतारा करायची एक ही संधी सोडायचा नाही..
“ देवयानी..चल मी अभ्यास घेते तुझा..” म्हटलं की तो म्हणायचा..
“दीपिका, तू मराठी शाळेत शिकलीस..व्हर्नाक्युलर मिडीयम मधे शिकवतेस..तुला काय जमणार तिला शिकवायला..! उगाच काहीतरी..काही नाही उद्यापासून ट्युशनला जाईल ती..” हिरमुसल्या चेहऱ्यानं दीपिकानं सहन केलं..या अशा स्वभावामुळं ती सतत एकटी पडली..देवयानी सुद्धा बाबांची लाडकी..त्या दोघितलं अंतर वाढतच राहिलं..
माहेरी सुद्धा चार बहिणी..त्यात मोठी..सगळी ऍडजस्टमेन्ट तिलाच करावी लागायची..विरोध न करण्याची तिला सवय लागून गेली होती..मूकपणे अश्रू ढाळणे एवढीच तिची मजल..
दीपिका भूतकाळात शिरली..लग्नाला दोन वर्ष झाली..विक्षिप्त माणसा बरोबर संसार करता-करता..तिने जवळच्या शाळेत नोकरी धरली आणि तिचा वेळ छान जाऊ लागला..असले-तसले विचार करायला वेळच नसायचा..पगार पण बऱ्यापैकी..त्यामुळे नवरा ही काही बोलत नसे..अशातच दिवस गेले आणि ती मोहरली..मुलीचं नाव तिने हौसेनं देवयानी ठेवलं..शाळेत सगळ्यांना नाव फार आवडलं..
तिला आठवलं..
“आई, कसलं टिपिकल नाव ठेवलंस ग तू..ओल्ड फॅशनचं..” देवयानी एकदा म्हणाली...
“अगं, किती सुंदर नाव आहे..किती आवडतं सर्वांना..”
“मला नाही आवडत..बाबा माझं नाव बदलूया का आपण..मस्त देबो..!” तिनं बाबांना सांगितलं आणि नशीब त्यांनी तू मोठी झाल्यावर बदल सांगितलं..
बाबा गेल्यावर तर तिला विचारणारं नव्हतंच कुणी..मी मराठी शिकलेली बाई..तिच्या दृष्टीने अडाणीच..सहा महिन्यांपूर्वी एक कुरियर आलं..त्यावर देबो नांव बघून आश्चर्यचकित झाली दीपिका..ओह ! म्हणजे हिने नाव बदललं सुद्धा..ताकास तूर सुद्धा लागू दिला नाही तिनं..दीपिकाला खूप वाईट वाटलं..आई म्हणून कुणीच नव्हती का ती..!! कसली घमेंड आहे तिला..बापानं सगळा पैसा तिच्या नावावर केला..घर फक्त दोघींच्या नावावर..तिचं पेन्शन होतंच..पैसा नको पण एक माणूस म्हणून काहीच सोयर-सुतक नव्हतं कुणाला..ना नवऱ्याला ना लेकीला..खूप रडली ती..यापेक्षा वांझोटी राहिली असती तरी चाललं असतं..तिच्या मनात वाईट विचार चमकून गेला..एकदा तिचं लग्न केलं की जबाबदारीतून मुक्त होऊ असं तिला वाटलं..म्हणूनच ती गप्प होती..पण बोलण्याची सोय नव्हती..
रोजचंच रडगाणं..म्हणून तिने विचार झटकून टाकले आणि तिने टीव्हीचा रिमोट हातात घेतला..नेमका इंग्लिश-विंग्लिश सिनेमा चालू होता श्रीदेवीचा..श्रीदेवी आणि दीपिका..एकाच जातकुळीतील..खरं आहे..आपल्याला देखील स्मार्ट व्हायची गरज आहे..उगाच दबून राहणं सोडून द्यायला हवं..दीपिकाने पक्क ठरवलं मनाशी..त्यासाठी इंग्लिश भाषा मिरवण्याची गरज नाही..जिथे गरज असेल तेथेच बोलायचं आणि मराठी भाषेचा स्वाभिमान जागृत ठेवायचा..इतर भाषा कमी लेखण्यासाठी नाही..ती थोडी मोकळी झाली..कधी-कधी आपल्या मनातलं काहूर असं कथेच्या, कवितेच्या माध्यमातून सामोरं येतं आणि एखादा मार्ग ही गवसतो..वाटतं फक्त आपणचं चाललोय या मार्गावर एकटे..हा माझा मार्ग एकला..पण असं नसतं..
दीपिकाचा मोबाईल वाजला..आता कुणाचा फोन..नंबर अननोन..घ्यावा की नको समजेना..बघूयात तरी म्हणून तिने फोन घेतला..
“ हॅलो, कोण बोलतंय..” दीपिका
“ दीपिका मॅडम, मी सावू तुमची विद्यार्थिनी..”
“ कोण,सावित्री मुळे का? आज कशी आठवण काढलीस..?”
“ मॅडम,मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून एक किंडरगार्टन स्कुल काढतोय..म्हणजे बालवाडी..इंग्लिश मिडीयम..आज संध्याकाळी उदघाटन आहे आणि मॅडम तुम्ही नक्की या आम्हाला आशीर्वाद द्यायला..” दीपिका गप्पच होती..
“ मॅडम, सॉरी..माझ्याकडे तुमचा नंबर नव्हता..मी आता शाळेतून घेतला आणि तिथूनच बोलतेय..तुम्ही हवे आहात तिथे मॅडम..” दीपिकाचे डोळे भरून आले..आज किती दिवसांनी तिला मान दिला जात होता..
“सावू बेटा, नक्की येईन..या मोबाईलवर पत्ता दे पाठवून आणि काही हवं असेल तर हक्कानं सांग..”
“मॅडम, तुम्ही मला आईसारखं प्रेम दिलं..चुकले तरी वळण लावले प्रेमाने..कशी विसरेन मी तुम्हाला..आणखी एक विनंती म्हणा किंवा हट्ट..एक मराठीचा तास तुम्ही घ्यायचा या शाळेत..चालेल..!!” सावू
“ बेटा, जमलं तर घेईन ना..सावू, एक विचारू तुला..? तू सावित्री नाव बदललंस का गं..?”
“ मॅडम, अजिबात नाही..आजही मी सावित्री तुमची सावू आहे..आता ठेवते फोन..अजून आमंत्रण करणं बाकी राहिलंय..वाट बघते तुमची..ठेवते फोन..” सावूनं फोन ठेवला आणि दीपिका मटकन बसली सोफ्यावर..अनेक आठवणी दाटून आल्या..शाळेच्या आणि विद्यार्थिनींच्या..आईविना सावू..कायम भेदरलेली..देवयानीच्या वयाची..सावू मधे देवयानी दिसायची तिला..देवयानी इंग्लिश शाळेत आणि बाकी घरात सुद्धा तुटकच वागायची..का कुणास ठाऊक सावूशी एक अनामिक नातं जोडलं गेलं तिचं..आपल्या डब्यातला घास सावूला भरवायची ती..सावू सुद्धा प्रेमाची भुकेली..चिकटायची तिला.. दहावी झाल्यानंतर सेंडॉफच्या वेळी दीपिकाच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडणारी सावू..समजावलं तिला तेंव्हा..आज ही आपल्यावर तितकंच प्रेम करते हे पाहून गहिवरली दीपिका..काय नातं तिचं नि माझं..आणि माझी पोटची पोर असं अंतर ठेवून वागते..प्राक्तन की भोग..कुणास ठाऊक..आज जायलाचं हवं तिने मनाशी पक्के ठरवले..
संध्याकाळी छानशी साडी नेसून दीपिकानं आरशात पाहिलं..आज नेहमीपेक्षा आनंदी दिसत होता चेहरा..कपाटातून छानशी पर्स काढली आणि आठवणीने मोबाईल घेतला..आज रिक्षा न करता तिनं चक्क टॅक्सी बुक केली..
एका बंगलेवजा इमारती समोर टॅक्सी थांबली..दोन-चार मुली पुढे झाल्या..
दीपिका डाव्या बाजूने दार उघडून उतरली आणि समोर चक्क देवयानी दिसली तिला..
“ आई तू ? इथे कशाला आलीस..?” हळूच कुजबुजली कानात..
“एक्सक्यूज मी..जस्ट अ मिनट..” तिने देवयानीकडे लक्ष न देता मोबाईलवर फोन लावला..
“ हॅलो, सावू मी आलेय..” धावत-धावत सावू आली नी दीपिकाच्या पाया पडली..दीपिकानं तिला जवळ घेतलं..आणि मानानं दीपिकाला आत नेलं..तिचा सत्कार केला..आज दीपिका स्टेजवर निमंत्रिता पैकी एक होती..आजची उत्सवमूर्ती..वेगळंच तेज आणि आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर विलसत होता..देवयानीला खटकलं तिला डावलून आईचं जाणं..आईचं कौतुक तिला ऐकवेना..देवयानीला कार्यक्रम अर्धवट सोडून जाताना दीपिकाने पाहिलं..तिला याची कल्पना आलीच होती.. तेचं तर घडत होतं..समजावलं तिने मनाला..गेली ती देवयानी नव्हे देबो होती..
सपना (भाग्यश्री) जकातदार
8.12.2022
(कथा आवडल्यास नांवासहित शेअर करावी ही नम्र विनंती)