17/08/2022
स्मशानातील सोनं...
शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली.
सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता.
वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात मानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर च्या धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहूर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुनः पुनः सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडान जबरा होता. तो भर पहिलवाना सारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हूडहुडीच भरत असे.
भीमाच गाव दूर वारणेच्या काठी होत. पण रेड्याच बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात, जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरा जवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होत.
त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता. तो आपलं रेड्याच बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता. त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता; कारण त्याला पगार मिळत होता.
परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कु-हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले कि आजपासून हि खाण बंद झाली. आपलं काम सुटलं हि वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला.
अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनःस्थितीत तो घराकडे फिरला, तो त्याची नजर एका राखेच्या ढिगा-यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचारं, कंटाळूनच मेलं असेल. सुटलं असेल एकदाच – असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार! दोनच दिवसात उपासमार सुरु; मग नाबदा रडत बसेल. बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही.
इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्याने वाकून, निरखून पाहिलं. तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भिमानं करकरून मुठ दाबली. त्याला आनंद झाला. एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला.
आणि दुस-याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडु लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीन चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा, असे काही न काही घेऊन रोज येऊ लागला.
भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरु होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबान प्रेताच्या अंगावरच सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी.
संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदा साठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता.
भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं, गरिबांन मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजा-यांना दरडावून सांगत होता. जो मरतेसमयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याच मत होतं.
बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं.
त्याचं दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मढी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होतं. कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं. पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं.
सूर्य मावळला. सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं. तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली ,”आज कुठं जाणार वाटतं ? मला वाटतं हे काम नको आम्हाला. कुठंतरी दुसरं काम करा. मढं, मढ्याची राख , सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात.”
“तू बोलू नको.” तिचं बोलणं एकूण भिमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, “मी काहीही करीन. त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का?”
“तसं नव्हे -” नव-याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली,
“भुतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते.”
“मसणवट्यात भुतं असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, हि मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भुतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कुजतात. भूतांची पैदास गावात होते – रानात नाही.” भीमा म्हणाला.
त्याचं हे बोलणं ऐकूण ती गप्प झाली आणि भीमान निघण्याची तयारी केली. तो गुरकून म्हणाला, “मुंबई चाळून मला काम मिळालं नाही. पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला. पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते -” असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निःशब्द शांतता नांदत होती नि भीमा निघाला होता.
भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती. वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता. आज तो बिथरला होता.
वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं, मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुत्कार करून भेसूरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं
कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधून मधून कोणीतरी खाकरत होतं, एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपनिपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता.
आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता; पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता. त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला कि नवी गोर सापडणार नाही, याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता.
मध्यानरात्री पर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातचं खात असावं, तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला; परंतु तोच कुणीतरी हात पाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युतगतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला.
परंतु दुस-याच क्षणी त्यानं स्वतः ला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःचं खजील झाला. कारण जवळचं ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेऊन दुरूनच त्यांनी घळी पडायला आरंभ केला होता. आजुबाजूनं गोर उध्वस्त करण्याचं काम ती करीत होती; परंतु पुनः त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्या जवळ कोण जाणार या इर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती. पुनः नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्वशक्ती एकवटून माती ओढीत होती.
हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला.
अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली, चमकली नि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला.
आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला. एक कोल्हा पिसाट होऊन भिमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरच पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुनः भीमावर धावला नि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारद झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला नि रणधुमाळी सुरु झाली. पुनः भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला.
भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते; पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरवात केली होती.
चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारीत होता. कोल्हे तीरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते.
गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाच नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्हयांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी, आपली सर्वशक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव याचं मृतदेहासाठी दारूण रण पेटलं होतं.
सुर्ष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निपचित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मढ्यासाठी झटापटिला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोळी त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती, किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विव्हळत होता. शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते.
कितीतरी उशीराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुनः कोळी तुटून पडली नि पुनः हाणामारीला सुरवात झाली; परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली, त्यांनी आपला पराजय काबुल केला.
आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताठलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली कि प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली; पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजून ती पहार जबड्यात घालून दुसर्या बाजून त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला. पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. ” आरं कोळ्यांनी प्रेत खाल्लं, चला ” असं कुणीतरी ओरडलं नि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुनः डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पहिले आणि – बोटं काढून नंतर पहार काढण्या ऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली. आडकित्यात सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली.
आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन मानसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताच राग आला. त्याच्याकडे येणारी मानसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले. आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भुत हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाही तर मारमारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. ‘ भडव्या, सोड मला.’ तो जोरानं ओरडला.
गावकरी जवळ होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती, फक्त चामाडीला चिकटून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता.
तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरु झाली.
त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली.
आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुनः सुरु झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.
-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे