06/08/2023
श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी, आजोळी श्री बापन्नाचार्युलू यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे. याप्रमाणे बाळ श्रीपादाच्या दुसऱ्या वर्षीच्या जन्मदिना निमित्त ते सर्व आजोळी गेले होते. आजोबा श्रीपादाना मांडीवर घेऊन त्यांचे तळपाय पाहत होते. अशा प्रकारे त्यांनी पूर्वी सुद्धा अनेक वेळा श्रीपादांचे तळपाय पाहण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येक वेळी त्याना कोटी, कोटी सूर्याच्या तेजस्वीतेचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहू शकले नव्हते. परंतु आज असे घडले नाही. बापनाचार्युलूना श्रीपादांच्या तळपायावर शंख, चक्र, आदी चिन्हांचे दर्शन झाले.बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्हे पुरेशी होती. आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयांचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिकच धृढ झाला. या दिव्य दर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. ते बाळ श्रीपादाच्या गालावर पडले आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात मोत्याप्रमाणे चमकू लागले. आजोबांनी ते आपल्या उत्तरीयाने हळुवारपणे टिपले. यावेळी बालक श्रीपाद आजोबास म्हणाले “आजोबा| तुम्ही सौरमंडळातून शक्तिपात करून जी शक्ती श्रीशैल्यस्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षून घेतली होती त्याच वेळी ती शक्ती, गोकर्णमहाबळेश्वर आणि पादगया स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचे ठायी सुद्धा आकर्षित झाली होती. श्रीपाद पुढे म्हणाले “आजोबा| प्राणीमात्रातून जी अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्या प्रती शुभ स्पंदनाचे प्रसारण होते. हे माझ्या संकल्पानुसारच घडते. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्म लिंग आहे. त्यामुळे त्याच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते. बालक श्रीपाद पुढे म्हणाले “आजोबा| मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन. त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षुना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करीन. माझा या नंतरचा अवतार नृसिंह सरस्वती या रुपात असेल. हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हे रूप नित्य, सत्यरूप असे राहील. नृसिंह सरस्वती अवतारातील कार्यभाग संपवून श्रीशैल्याजवळ असलेल्या कर्दळी वनात तीनशे वर्षे तपस्या करीन. या नंतर “स्वामी समर्थ” या नांवाने प्रज्ञापूर (सध्याचे अक्कलकोट) या स्थानी प्रकट होईन. या अवताराच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करवून, मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईन. केवळ दोन वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले हे वक्तव्य ऐकून आजोबा बापन्नाचार्युलू अत्यंत आनंदित झाले. तसेच त्यांच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाहीत. बाळ श्रीपादाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा झाला.
संदर्भ-श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र