12/06/2023
भाजपासमोरील आव्हान !
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून भारतीय जनता पक्षाने यात आघाडी घेतली आहे. केंद्रातील मोदी सरकारला नवु वर्षे पुर्ण झाली आहेत. राज्यातही मधला अडीच वर्षाचा काळ सोडला तर भाजपाचीच सत्ता आहे. या दोन्ही सरकारच्या माध्यमातून केलेली विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी भाजपाने महाजनसंपर्क अभियान सुरु केले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात पक्षाचे नेते लोकांपर्यंत जातील. पक्षाची बाजु मांडतील, पक्षाची नव्याने बांधणी करतील. ठिकठिकाणी अध्यक्ष बदलण्याचाही त्यांनी घाट घातला आहे. लोकांच्या मनात सरकारविषयी आणि भाजपाविषयी सकारात्मक मत निर्माण व्हावा हाच यामागचा खटाटोप आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९५२ चा अपवाद वगळला तर २००९ पर्यंत अनेकवेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेच याठिकाणी आपले वर्चस्व दाखवले आहे. एम.बी.काडादी,सुरजरतन दमाणी, गंगाधर कुचन,धर्मण्णा सादुल,सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघातुन काँग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकावला. १९८१ मध्ये सर्वप्रथम भाजपाच्या विजयाचे 'कमळ' या मतदारसंघात फुलले.काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा पहिला मान लिंगराज वल्याळ यांनी मिळवला. त्यानंतर १९९९ मध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील अकलुजमधुन आले आणि भाजपाच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले. २००४ मध्ये सुभाष देशुमुख पहिल्यांदाच खासदार बनले. पुढच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसला पुर्नवैभव प्राप्त करुन दिले. मात्र मोदी लाटेत ते २०१४ मध्ये लयास गेले. गेली दहा वर्षे लोकसभेत सोलापूरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लोकांनी भाजपालाच दिली आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेची जागा जिंकून विजयाची हँट्रीक साधण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवरच भाजपाने सोलापूर लोकसभेसाठी विक्रम देशमुख यांची प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. देशमुख हे सध्या पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत. भाजपात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू मानले जातात. विक्रम देशमुख हे एक उत्तम संघटक आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडे राजकीय परिपक्वता आहे. सत्तेच्या पदाची अभिलाषा नाही.प्रभावी वक्तृत्वशैली आहे. प्रमोद महाजन यांच्या संस्कारात वाढलेले ते कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच पक्षाच्या नेत्या वसुंधराराजे यांच्या मतदारसंघात त्यांनी उत्तम कार्य केले आहे. त्यामुळेच त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने सोलापूर लोकसभेच्या प्रचार प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी
या जबाबदारीचे ओझे घेऊन विक्रम देशमुख यांना यापुढची वाट चालावी लागणार आहे. पक्षातील आणि बाहेरचीदेखील परिस्थिती फारशी अनुकूल नाही. कारण गेल्या दहा वर्षात भाजपाविषयी या मतदारसंघात तयार झालेले प्रतिकूल जनमत. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत लोकांनी भाजपाला सत्ता दिली. खासदार दिले, आमदारही दिले. मंत्रीपदेही मिळाली. लोकांनी भाजपाच्या झोळीत यशाचे भरभरून दान टाकले. इतके सर्व देणाऱ्या मतदारांना भाजपाने काय दिले हा प्रश्न लोकांच्या मनात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुमीपूजन करुनही समांतर जलवाहिनीचे काम गेली सात वर्षे अपुर्ण का राहिले ? शहरात चांगले रस्ते का झाले नाहीत? कोट्यवधी रुपये खर्च करुनही रस्त्यांची कुणी वाट लावली? हद्दवाढ भागाला आजवर उपेक्षित कुणी ठेवले ? शहराच्या उपनगरांत अद्याप ड्रेनेजलाईन का पोहोचली नाही? महापालिका आरोग्याच्या सुविधा का देऊ शकत नाही? शहरात गेल्या नवु वर्षात चांगले हाँस्पीटल का उभारता आले नाही? महापालिकांच्या शाळा का ओस पडल्या आहेत? उद्यान, मंडया यांची अवस्था 'असून अडचण नसून खोळंबा' अशी का झाली आहे? सर्वत्र सत्तेवर असलेल्या भाजपालाच या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. केवळ आश्वासनांची पुरचुंडी लोकांच्या तोंडावर फेकून त्यांना यापुढे मत मिळवता येणार नाही. काम न करता मत मागण्यांसाठी दारोदारी जाणे धाडसाचेच ठरणार आहे.
पक्षांतर्गत कुरघोड्या हे भाजपाला लागलेले शुक्लकाष्ट आहे. सत्ता नसताना ते होतेच पण सत्ता आल्यानंतर आणखी वाढले आहे. गेली नवु वर्षे पक्षातील आमदार द्वयांमध्ये असलेले विळ्याभोपळ्याचे सख्य आजही कायम आहे. पक्ष नेतृत्वाने केलेली शिष्टाई वाया गेली. शहर विकासाचा कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी हे दोन्ही आमदार एकत्र आलेले लोकांनी कधी पाहिले नाहीत. यांच्याच भांडणामुळे स्मार्ट सिटीतील प्रकल्पांची पुरती वाट लागली आहे. कोट्यवधी रुपये खर्च केलेले हे सारे प्रकल्प नीट मार्गी लागावेत अशी भावना यांच्या क्रुतीतुन कधीही दिसली नाही.पक्षातही प्रचंड खदखद आहे. प्रा. अशोक निंबर्गी, सुरेश पाटील यांच्यासारख्यांनी ती वारंवार बोलुन दाखवली आहे.संताप डोक्यात घेऊन नाईलाजाने पक्षात वावरणारे असे अनेक मौनीबाबा आजही भाजपात मोठ्या संख्येने आहेत. निवडणुका आल्या की कामापुरते हात जोडायचे आणि निवडणुका संपल्यानंतर हवे तसे तोंड सोडायचे हा पक्षातील स्थानिक नेत्यांचा शिरस्ता आता कार्यकर्त्यांनाही असह्य झाला आहे. म्हणूनच सत्ता असूनही पक्षाला गळती लागली आहे. पक्षातील वर्चस्ववादी प्रव्रुत्तींना सडेतोड 'उत्तर' देणारा आवाज वाढताना दिसत असून तो सुर आता वरिष्ठांच्या कानावर आदळु लागला आहे.
शरद बनसोडे झाले, डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीही पाहिले, आता कोण हा प्रश्न सोलापूरच्या जनतेसमोर आहे.नव्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे असे भाजपाचे नेते सांगत आहेत. लोकांना आवडेल असा चेहरा इतक्या कमी वेळेत शोधणे कठीण आहे. पक्षाने लादलाच तर तो जनमानसात रुजवणे त्यापेक्षा अवघड आहे. गेल्या दहा वर्षात लोकांनी 'मोदींचा खासदार' निवडून दिला. यावेळी 'जनतेचा खासदार' निवडण्याचा निर्धार लोकांनी केला आहे.'भाजपाने आपल्याच भ्रमात राहू नये ही लोकभावना आहे. कारण गेल्या नवु वर्षात आम्ही 'खासदार' पाहिलेला नाही, नाव घ्यावे असे कोणतेही काम त्यांनी केलेले नाही असे मतदार उघडपणे बोलु लागले आहेत. त्यामुळे करपण्यापुर्वी भाकरी फिरवण्याचा विचार भाजपा करेल का आणि करणार असेल तर तो नवा चेहरा कोण असेल याचे औत्सुक्य मतदारांना लागले आहे.
प्रशांत जोशी