22/06/2023
दोन हजारांसाठी रत्नागिरी शासकिय रूग्णालयात घुसून झुंडीने केला दोघांवर हल्ला; हल्लेखोर मोकाट
गुन्हेगारी कारवाया नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान
रत्नागिरी /प्रतिनिधी
रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागात घुसून दहा ते बारा जणांच्या झुंडीने उपचारासाठी दाखल झालेल्या दोघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी ( १८ जून २०२३) रात्री सवा बाराच्या सुमारास घडली आहे. ही मारहाण आर्थिक देवाण- घेवाणीवरून झाल्याचे समोर आले असून हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र हल्लेखोर फरार झाल्याचे ही वृत्त आहे.
गुढेवठार येथे राहणाऱ्या अक्षय नाखरेकर याने (वय.३१रा. गुढवठार ) परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका तरुणाला २ हजार रुपये उसने दिले होते. दिलेले पैसे मागण्यासाठी अक्षय गेला असता दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. हाणामारीचा राग पैसे घेतलेल्या तरुणाने मनात धरून त्याने आपल्या मित्रांना तिथे बोलावून घेतले. त्यातून पुन्हा नवा वाद सुरू झाला.
तू माझ्या मित्राला मारतोस अशी विचारणा करत जोरदार हाणामारीला सुरुवात झाली. यात जखमी झालेले तरुण व नातेवाईक पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेले. परंतु पोलिसांनी जबर मारहाण झालेली पाहून त्या तरुणांना तातडीने उपचार घेण्यासाठी शासकिय रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र पोलीस स्टेशनच्या परिसरात देखील हल्लेखोर जमावाने आले होते. मारहाण झालेल्या तरुणांवर पुन्हा हल्ल्या होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. परंतु पोलीस रुग्णालयात येण्यापुर्वीच दहा ते बारा जणांच्या झुंडीने शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागात घुसून पुन्हा अक्षयवर हल्ला चढवला. यामध्ये अक्षय नाखरेकर याच्यावर अमेय मसुरकर, आशिष सावंत, सुमित शिवलकर, हर्षद धूळप, अभिषेक पांचाळ अपघात विभागात घुसून हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.
या दहा ते बारा जणांच्या झुंडीने अपघात विभागात घुसून बेडवर उपचार घेणाऱ्या अक्षयला आशिष सावंतने आपल्या हातातील लोखंडी फाईटर डोक्यात मारले. तसेच सुमित शिवलकरने तिथेच असणाऱ्या ट्रे ने तसेच लोखंडी टेबलने अक्षयच्या डोक्यावर मारहाण करून बेडवरून खाली पाडले. तसेच त्याचे भाऊजी अमोघ पालकर याला अमेय मसूरकर व हर्षद धुळप हे सिव्हिलमध्ये लाकडी टेबल, प्रेशर चेकच्या मशीनने मारहाण केली. दरम्यान हा सर्व प्रकार रुग्णालयातील अपघात विभागात सुरू असताना तेथील सुरक्षा रक्षकांनी झुंडीतील एक एकाला बाहेर काढले. त्यानंतर जखमी झालेल्या दोघांवर तत्काळ नर्स, डॉक्टरांनी उपचार सुरू केले.
या प्रकरणी अक्षय नाखरेकरने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षद धूळप, अभिषेक पांचाळ, सुमित शिवलकर, आशिष सावंत, अमेय मसुरकर, व इतर पाच ते सहा जणांविरोधात भा.द.वि.क. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून सर्व संशयित आरोपी फरार आहेत. या घटनेला दोन दिवस उलटले असून सर्वत्र चर्चा रंगत आहे. मात्र या गंभीर प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.
'भाईंगिरी'ला लगाम घातला पाहिजे....
उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णावर शासकिय रुग्णालयात घुसून झुंडीने हल्ला करण्याची हिम्मतच कशी होते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दादा,भाईंवर पोलिस प्रशासनाचा धाकच उरला नसल्याचे या मारहाणीच्या घटनेतून स्पष्ठ होते. सदर मारहाणीच्या गुन्ह्यामधील काही संशयित आरोपीचे अवैध्य धंदे असल्याचे समोर आले आहे. तसेच राजकीय नेत्यांशी हितसंबंध असल्याचे उगड झाले आहे. मात्र हे अवैध्य धंदे पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. या अवैध धंद्यांवर पोलिसांनीच कारवाई करून यांच्या 'भाईगिरी'ला लगाम घातला पाहिजे असे शहरातील सजग नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात वाढत चाललेली गुन्हेगारी, खुन, महिला अत्याचार, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, गुन्हेगारांना मिळणारा राजकीय वरदहस्त, औद्योगिक तंटे, समाज माध्यमांवरील आणि सायबर गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आता जिल्हा अधीक्षकांसमोर आहे.
पोलीसांनी निपक्षपातीपणे `खाकीचा धाक’ दाखवावा...
वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सामाजिक वैचारीकतेचे अधःपतन होत असुन ह्यामुळे सुसंस्कृत समाज निर्मितीला खीळ बसत आहे. एखाद्या सामाजिक समस्येला तोंड देणं कुणा एकट्याची जबाबदारी नसुन त्यासाठी सामुहिकरीत्या सर्वच स्तरांतून प्रयत्न होणे गरजेचे असेल तरीही तुर्तास तालुक्यातील या वाढत्या गुन्हेगारीची नैतिक जबाबदारी शिरावर घेऊन पोलीस यंत्रणेला नव्या जोमाने सजग होऊन निपक्षपातीपणे `खाकीचा धाक’ दाखवावा किंवा वाढवावा लागेल. तरच वाढत असलेल्या गुन्हेगारीचे प्रकार नियंत्रणात आणता येऊ शकतील.