26/01/2024
एकांत : एकाचा अंत कि शून्याची सुरुवात ? एकटेपणाची भीती ही बऱ्याचदा आपल्याला सतत कार्यशील राहण्यास मदत करते. ही भीती आयुष्यभर आपला साथ देते आणि आपण तिचा सांभाळ करतो. पण निसर्गात गेल्यावर मात्र मन शांत होऊन जेव्हा आपण त्याच्याशी एकत्व साधतो तेव्हा दुसऱ्या कोणाचा अगदी स्वतःचाही आवाज नकोस वाटतो. आपल्या आतले विचार आपोआपच शमतात. जसे शांत पाण्यावर तरंग नसतो तसे मन अगदी नितळ होऊन पारदर्शी बनते. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे शून्यत्व किवां जीव शिवाचे ऐक्य यांच्या अगदी जवळची अवस्था काही क्षण का होईना जागृतावस्थेत होते. द्वैत असूनही आणि अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव कुठल्याही गुरूशिवाय फक्त निसर्गच देऊ शकतो. आपल्या आतील कोलाहल थांबविण्याची शक्ती आणि सर्व शंकांचे मूळ नष्ट करणारा हा निसर्गच आपल्याला शून्याच्या गर्भात प्रविष्ट करण्यास मदत करतो. म्हणूनच कधी कधी एकांत हा अंत आणि आरंभ दोन्हीही आहे असे वाटते. पण त्याची चव चाखण्यासाठी मात्र तो आपणाकडून फक्त मनाची निर्भयता आणि वेळ एवढेच मागतो.
Write up and photography Yogesh K
Muse K Raginee Yogesh
🚫repost/painting/sketching not allowed
©️Copyrights reserved.