01/11/2024
संविधानात संत परंपरेतील वैश्विक मूल्यांचे प्रतिबिंब :
ज्ञानेश्वर महाराज बंडगर
------------------------------------------------------------
‘संत आणि संविधान’ या पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न
पुणे, दि. २९ ऑक्टोबर : भारतातील संत परंपरेची समता, बंधुता आणि न्याय या वैश्विक मूल्यांशी बांधिलकी ठेवून, त्या काळात समाजातील अनिष्ट परंपरा, सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अन्याय आणि अंधश्रद्धांविरूद्ध जोरदार आवाज उठवला त्या सर्व उदात्त मानवीमूल्यांचे भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंब पडले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी केले. ‘संवैधानिक राष्ट्रवाद मंच’च्या वतीने काल आयोजित केलेल्या ‘संत आणि संविधान’ या पुस्तिकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संविधान प्रसार चळवळीचे नेते प्रा. सुभाष वारे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी, व्यासपीठावर मंचाचे संस्थापक प्रशांत कोठडिया, संयोजक विवेक काशिकर, संपादक प्रा. नीलम पंडित आणि विद्यालंकार घारपुरे, साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम मालनआप्पा शिंदे, साखळीपीर राष्ट्रीय तालीम मारूती मंदिराचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर, सीए प्रसाद झावरे, ज्येष्ठ समाजसेवक मच्छिंद्र गोजमे, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा तिवारी व रामदास मारणे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ‘साहित्यविश्व प्रकाशना’च्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणा-या ‘संत आणि संविधान’ या मराठी व इंग्रजी पुस्तिकांचे; तसेच श्री. मच्छिंद्र गोजमे लिखित व ‘शब्दवेध बुक हाऊस’, संभाजीनगर निर्मित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ या पुस्तकाचेही श्री. बंडगर आणि प्रा. वारे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुढे बोलताना, श्री. बंडगर यांनी संत शिरोमणी श्री. ज्ञानदेव महाराज, एकनाथ महाराज, संत कबीर, नामदेव महाराज आणि संत तुकाराम, आदी थोर संतांनी; तसेच छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांनी सामाजिक ऐक्यासाठी केलेल्या महान कार्याची व संपन्न वारशाची माहिती सांगितली. जातीच्या उतरंडीमुळे ग्रासलेल्या समाजामध्ये संतांनी, तसेच, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी श्री. शाहू महाराज, आदी थोर सत्यशोधक नेत्यांनी भेदाभेद संपविण्याची प्रेरणा दिली आणि म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये जातीभेदाला स्थान नसून, आता धर्माच्या नावाखाली काही सनातनी प्रवृत्ती समाजात विद्वेष पसरविण्याचे आणि समाजात भेद पाडण्याचे प्रयत्न करीत असून, त्याविरोधात आपण सर्वांनी सतर्क राहून समाज प्रबोधन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप करताना, प्रा. सुभाष वारे यांनी संविधानाची निर्मिती करताना, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्याची सर्वसमावेशक चळवळ आणि त्याचबरोबर जगभरातील राजकीय चळवळींचा डॉ. आंबेडकर आणि संविधान सभेतील मान्यवर सदस्यांनी सखोल अभ्यास केला आणि भारतीय मातीतून निर्माण झालेल्या वैश्विक प्रागतिक विचार व मानवीमूल्यांचा त्यामध्ये समावेश केल्यामुळेच, आपल्या देशात लोकशाही शासनव्यवस्था रुजू शकली, असे ठाम प्रतिपादन केले. सध्या देशामध्ये संकुचित विचारांच्या हिंदुत्ववादी शक्ती या माणसाच्या स्खलनशील स्वभावाचा फायदा घेऊन, संतांचा उपदेश आणि संविधानाचा गाभा असलेले ‘प्रेम’, ‘समता’ आणि ‘बंधुता’ या तत्वांनाच उध्वस्त करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करीत असल्याचे सांगून प्रा. वारे यांनी, संविधानातील तत्वे पुन्हा एकदा समाजामध्ये रुजविण्याचे एकत्रित प्रयत्न करण्याचे आव्हान केले.
युवा कलावंत श्री. धनंजय पवार आणि मोहिनी पवार यांनी या कार्यक्रमात आपल्या सुरेल आवाजाने संतांचे निवडक अभंग, भारूड व प्रार्थना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमात विवेक काशिकर, नीलम पंडित, विद्यालंकार घारपुरे, विक्रम मालनआप्पा शिंदे, रविंद्र माळवदकर, मच्छिंद्र गोजमे यांची भाषणे झाली. श्री. प्रशांत कोठडिया यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीमती तमन्ना इनामदार यांनी आभार मानले.
------------------------------------------------------------