03/05/2023
सहकार - स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची स्थिती
देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार सहकार हा विषय संबंधित राज्य सरकारांकडे ठेवण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाने सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेला महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० व अधिनियम १९६१ हा कायदा पारीत केला. या कायद्यात सहकारी संस्थांची नोंदणी, संस्थांच्या सभासदांचे हक्क व जबाबदाऱ्या, संस्थांची कर्तव्ये व विशेषाधिकार, राज्य शासनाचे संस्थांना विविध स्वरूपांचे आर्थिक व तत्सम सहाय्य, संस्थांची मालमत्ता व निधी, संस्थांचे व्यवस्थापन, संस्थांच्या व्यवहारांचे लेखापरीक्षण, चौकशी, तपासणी व देखरेख, विवादांची सोडवणूक, संस्थांचे कामकाजांचे समापन, निवडणुका, गुन्हे व शास्ती, अपिले, पुनःपरीक्षण व संस्थांच्या कामकाजाविषयी अन्य सर्वसाधारण बाबीविषयीच्या सविस्तर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
सन १९७० मध्ये तत्कालीन सहकारमंत्री मा. श्री. यशवंतराव मोहिते यांनी सहकार विभागाच्या तसेच सहकार चळवळीच्या पुनर्रचनेसंदर्भात श्वेतपत्रिका काढली होती. त्यास अनुसरून राज्यस्तरीय लेखा समिती स्थापन करण्यात आली व तद्नंतर स्वतंत्र साखर संचालनालय (सध्याचे साखर आयुक्तालय), पणन संचालनालय आणि वस्त्रोद्योग संचालनालय अस्तित्वात आले. सन १९७५ मध्ये सहकार न्यायालयाची स्थापना व सन १९८१ मध्ये तालुका स्तरावरील कार्यालयांची स्थापना करून सहकार विभागाचा विस्तार करण्यात आला. सन १९७७ मध्ये दुग्धसंस्था दुग्धविकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. मार्च १९८९ पासून मंत्रालय पातळीवर कृषी व सहकार विभाग यांचे विभाजन होऊन सहकार व वस्त्रोद्योग विभाग हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला.
सहकार क्षेत्राची माहिती देणारे मासिक
सहकार भारतीचे मुखपत्र - सहकार सुगंध
आजच मासिकाचे वर्गणीदार व्हा
वार्षिक वर्गणी - ४००/- , त्रैवार्षिक -१०००/-
अधिक माहीतीसाठी संपर्क - ८८०५९८१६७३