12/12/2024
३५ वर्षाच्या 'बेस्ट' प्रवासाने अखेर स्टॉप घेतला!
आयुष्यात जे कराल तर 'बेस्ट' च करा. लहानपणापासून आजपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्यावर बाबांकडून ऐकलेलं हे वाक्य. गेली ३५ वर्ष बेस्ट गाडीला कष्ट नावाचं इंधन देत प्रवासीरूपी कुटूंबाला सांभाळण्यासाठी सुरु केलेल्या प्रवासाने अखेर थांबा घेतला. जेव्हापासून मला समजतं आहे तेव्हापासून बाबांना मी दोन गोष्टीत रमताना पाहिलं आहे एक म्हणजे पांडुरंगाचं ध्यान आणि हातातलं बेस्ट परिवाराचं काम. गेल्या ३१ मे ला बाबा बेस्ट परिवारातून इंस्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झाले. बस चालक ते इन्स्पेक्टर असा प्रवास बाबांनी बेस्ट परिवारात केला.
मागील काही वर्ष उद्योजक, कलाकार, जाहिराती, मुलाखती, यांवर लिहणारा मी, ज्यांनी मला लिहायला शिकवलं पहिल्यांदाच आज त्यांच्यावर थोडसं.
आदरणीय आप्पा,
३१ मे २०२३ हा दिवस कधी ना कधी येणार आहे याची जाणीव मला खूप वर्षाआधी झाली होती. साताऱ्या सारख्या गावातून येऊन मुंबईत आपलं नशीब आजमावण्याच्या जिद्दीने तुम्ही प्रवास सुरु केला. नव्वदीच्या काळात कोणाचा ही पाठिंबा, कोणतं ही छप्पर नाही अशा परिस्थितीत तुम्ही मुंबईत पाऊल ठेवलं. काम करण्याची प्रबळ इच्छा शक्ती व अध्यात्माची आवड या दोन गोष्टींच्या आधारावर तुम्ही जीवनातील प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलात. शिक्षणाला वयाची अट नसते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही. लहानपणापासून तुम्हाला शिक्षणाची आवड होती मात्र घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे तुम्ही जबाबदारीची वर्दी अंगावर चढवली. ड्रायव्हर असताना सिग्नलवर बस थांबल्यावर मिळालेल्या वेळेत अभ्यास केलेल्याच्या अनेक आठवणी तुमचे साथीदार आज ही सांगतात. शांत स्वभाव, सदैव स्मित हास्य, दांडगा जनसंपर्क व आपली तत्व यांच्या बळावर आजवर तुम्ही आयुष्य घालवलं आहे आणि पुढे ही तसंच घालवा.
.
आज मी जो काही मीडिया क्षेत्रात काम करतो आहे त्याचं पूर्ण श्रेय तुमचं आहे. मला आज ही आठवतं आहे २०१५ साली 'काम करून पैसे फेडणार अशील तर कॅमेरा आणि कॅम्पूटर घेऊन देतो' हे तुम्ही बोललेलं वाक्य अजून माझ्या कानात घर करून आहे. त्यावेळी तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास खोटा ठरू नये म्हणून माझी आज ही धडपड सुरु असते. शाळेमध्ये लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज आदींवर वक्तृत्व स्पर्धांमध्ये तुम्ही लिहून दिलेली भाषणं मला आज ही आठवतात. मी लिहलेली पहिली बातमी तुम्ही आणखी चांगल्या शब्दात रचली होती. एवढ्या वर्षांनी आज ही मी लिहलेल्या बातमीमधली ओळ अन ओळ तुम्ही वाचता आणि सुधारण्यासाठी मला सुचना करता. म्हणूनच माझ्या डोळ्यांना दिपावणारं यश मिळवलेल्या माणसांच्या बैठकीला बसण्याचा माझा प्रवास तुम्हाला बघत झाला आहे. आजपर्यंत आम्हा ३ ही भावंडाना यश, प्रसिद्धी, पैसा यांमुळे हुरळून जाऊ नका आणि अपयशामुळे खचुन जाऊ नका हा दंडक घालून नेहमी जमिनीवर ठेवण्याचं काम तुम्ही अगदी चोख केलंय (मला तर अगदी खास पद्धतीने) आणि पुढे पण कराल याची खात्री आहे.
मला याची सुद्धा कल्पना आहे घरचा मोठा म्हणून मी खूप शिकून मोठ्या पदावर जावं याची तुम्हाला खूप इच्छा होती. पण माझा कल बघता माझ्या लिखाणाला, फोटो काढण्याच्या आवडीला व पुढे जाऊन मीडिया क्षेत्रात व्यवसाय करण्याच्या निर्णयाला तुम्ही झटून केलेला विरोध मला आठवत नाही. उलट व्यवसायाच्या अनेक अवघड टप्प्यावर आर्थिक, मानसिक पद्धतीने केलेली मदतच आठवते आहे. जी फोटोग्राफीची आवड जपण्यासाठी २०१५ साली भांडलो होतो त्याच फोटोंद्वारे तुमच्या 'बेस्ट' साथीदाराबरोबरच्या आठवणी फोटो स्वरूपात गिफ्ट देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न.
पुढील आयुष्य निरोगी व आनंदात घालवा याच शुभेच्छा...
शब्दांकन - रामेश्वर जगदाळे
विशेष आभार -
हे फोटो काढण्यासाठी बाबांची मानसिक तयारी करणारे माझे दाजी - Chetan Nanda Lala Nanaware
माझ्या मनातील भावना फोटो स्वरूपात मांडणारा जिवलग मित्र - Emmanual Karbhari