20/12/2024
19 डिसेंबर 2024/ पुणे
पुण्य नगरीच्या माझी प्रकाशन संस्था या उपक्रमास प्रारंभ : साधना प्रकाशना च्या पुरवणीचे प्रकाशन
दैनिक पुण्य नगरीच्या वतीने "माझी शाळा" या उपक्रमाच्या अंतर्गत अनेक शाळांच्या पुरवण्या मागील काही महिन्यांत प्रकाशित झाल्या आहेत. त्या यशस्वी प्रयोगानंतर आता पुण्य नगरीने "माझी प्रकाशन संस्था" हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातील पहिली पुरवणी पुणे येथील साधना प्रकाशनाची काढण्यात आली आहे. तिचे प्रकाशन आज 19 डिसेंबर 2024 रोजी साधना प्रकाशनाच्या कार्यालयात ज्येष्ठ पत्रकार व साहित्य समीक्षक विनय हर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संगीतकार दिग्विजय वैद्य आणि साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ, पुण्यनगरीचे जाहिरात व्यवस्थापक सुशील मेहेंदळे व पुण्य नगरीचे जाहिरात प्रतींनिधी प्रसन्न फडके हेही उपस्थित होते.
अशा नावीन्यपूर्ण पद्धतीने ही पुरवणी पुण्य नगरीने काढली याचे स्वागत करुन, वाचन लेखन संस्कृतीच्या वाढीसाठी हा उपक्रम अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकेल असे विनय हर्डीकर म्हणाले. तर पुस्तके व लेखक हे समाजाच्या तळातील समाज घटकांपर्यंत पोहचवणे फार आवश्यक आहे आणि पुण्य नगरी हे दैनिक तळातील घटकांपर्यंत जाते, त्यामुळे ही पुरवणी एक महत्वाचे पाऊल ठरेल असे, श्री दिग्विजय वैद्य म्हणाले.
साधना प्रकाशनाच्या 75 वर्षाच्या वाटचालीच्या निमित्ताने आणि पुणे येथील पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुरवणी मध्ये साधना प्रकाशनाच्या नव्या पुस्तकांच्या विषयी, विशेष महत्वाच्या जुन्या पुस्तकांविषयी, आगामी पुस्तकांविषयी, लेखकांविषयी व अन्य उपक्रमांविषयी ललितरम्य शैलीत माहिती मिळते. बातम्या , निवेदने व स्फुट लेख या प्रकारचे लेखन त्यात आहे. अनेक लेखकांची छायाचित्रे आणि पुस्तकांची मुखपृष्ठे यांनी हा अंक सजला आहे. यामध्ये साधना प्रकाशनाच्या डिजिटल विभागाचे एक पूर्ण पान असून , त्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ , वेबसाईट यांच्यावरील छोटे लेख आहेत. साधनाचा वैचारिक गाभा सांगणारे एक पान आहे, त्यात महात्मा गांधी, साने गुरुजी, आणि हमीद दलवाई यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्याविषयी तीन निवेदने आहेत . न्या. रानडे यांची तीन पुस्तके मराठीत प्रथमच येत आहेत, ही विशेष महत्त्वाची बातमी आहे. आगामी पुस्तकांच्या मध्ये रामचंद्र गुहा यांच्या "कालपरवा" व सुहास पळशीकर यांच्या "राजकारणी जिज्ञासा" या पुस्तकांचा समावेश आहे.
या पुरवणीचे लेखन साधना प्रकाशनच्या संपादकांनी केले, संयोजन सुदाम सानप यांनी केले, तर मुखपृष्ठ व मांडणी गिरीश सहस्रबुद्धे यांनी केली आहे. या पुरवणीला पुणे येथील पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि अशा प्रकारची पुरवणी आम्हालाही काढायला आवडेल, अशी इच्छा अनेक मराठी प्रकाशकांनी प्रसन्न फडके यांच्याकडे व्यक्त केली.