30/05/2024
बाजीरावांवरील निरर्थक आक्षेप आणि खंडन
एका पोस्टवर मित्रयादीतील सुहृदांनी टॅग केलं, ज्यात बाजीराव पेशव्यांवर अत्यंत उथळ आणि असंबद्ध आरोप करण्यात आले होते. खरंतर पोस्टकर्ते वैयक्तिक ओळखीतले असल्याने इथे मुद्दाम नाव घेत नाही, पण सदर पोस्टमुळे अनेकांचा गैरसमज होऊ शकतो त्यामुळे हे सविस्तर उत्तर देत आहे. मूळ पोस्टमध्ये बाजीरावांवर तीन आक्षेप आहेत. पहिला त्यांच्या वागण्यावर आक्षेप असून शाहू महाराजांच्या एका पत्राच्या आधारे बाजीरावांना 'उद्दाम' ठरवलं आहे. दुसरा आक्षेप त्यांना थेट 'स्वामीद्रोही' ठरवत छत्रपतींवर दबाव टाकण्याच्या विचित्र कल्पनेचा आहे, तर तिसरा आक्षेप हा दुसऱ्या कोणाला श्रेय मिळू नये यासाठीच्या संकुचित मनोवृत्तीचा आहे. हे आमचे मित्रवर्य तसे अभ्यासू आहेत, पण इथे मात्र कोणाच्या तरी नादाला लागून नको ते उद्योग करताना या तीनही घटनांचा आगापिछा विसरले असल्याने त्यांनाही याची थोडी उजळणी होईल.
ज्यांच्या घोड्यांच्या टापांनी कर्नाटक ते दिल्लीपर्यंतचा प्रदेश पिंजून काढला आणि स्वराज्याच्या अंमलाखाली आणला. ज्यांनी दिवस-रात्र, ऊन वारा पाऊस न बघता अथक मोहिमा काढल्या आणि फत्ते केल्या. ज्यांनी असे अनेक सरदार उदयास आणले जे पुढली पाच दशके स्वराज्याचे आधारस्तंभ बनले. ज्यांनी माळवा गुजरात, बुंदेलखंड, मारवाड असे प्रदेश अंकित करून तिथे आपापले सरदार कायमस्वरूपी नेमले आणि मराठ्यांचे राजकारण महाराष्ट्राबाहेर नेले आणि वाढवले अशा कर्तबगार महापुरुषाला तीनशे वर्षांनी "स्वराज्यद्रोही" म्हणणे हे केवळ त्याच्यावर लांच्छन लावणे नसून मराठ्यांच्या अजोड पराक्रमाचा मुर्तीमंत महामेरु आरोपांची लहान लहान बिळे करून पोखरण्याचा प्रकार झाला. हा प्रकार अर्थात क्लेशकारक तर आहेच पण एकंदरच मराठ्यांचा इतिहास डागळणारा आहे असे आम्हास वाटले म्हणून हा उत्तराचा प्रपंच.
मुद्दा क्रमांक १)
पोस्टकर्त्याने इथे रियासत खंड ३, पान क्रमांक २५३ वरील पत्रं दिलं आहे. राजवाडे खंड ६ मध्ये लेखांक १६ म्हणून छापलेल्या या पत्रात शाहू महाराज बाजीरावांना म्हणतात, "तुम्हांस हुजूर येण्याची आज्ञा करून वरचेवरी पत्रे सादर झाली असता अद्यापि येण्याचा विचार दिसत नाही.. तुम्हांकडून आलास होऊन दिवस घालविता.." हे संपूर्ण पत्र मोठं आहे, अभ्यासूंनी जरूर पहावं. पण या एका पत्राच्या आधारे पोस्टकर्त्याने बाजीरावांना त्यांच्या तत्कालीन हालचाली न पाहता आणि त्या पत्राचा आशय सुद्धा लक्षात न घेता 'उद्दाम' म्हटलं आहे.
या पत्रावर शके १६४४ एवढंच आहे. शके १६४४ सुरु झालं ७ मार्च १७२२ला, आणि ते संपलं २५ मार्च १६२३ला. बाजीराव या वेळेस काय करत होते? कुठे होते? त्यांची या वेळेस, म्हणजे पेशवाई मिळाल्यापासून सुरुवातीच्या तीन वर्षात कधी कोकण तर कधी माळवा अशी धावपळ सुरु आहे. जानेवारी १७२२ मध्ये कान्होजी आंग्र्यांच्या मदतीला जाऊन बाजीरावांनी पोर्तुगीजांशी तह केला. यानंतर त्याच वर्षी ते माळव्यात गेले आणि १७२३च्या मार्चच्या सुमाराला त्यांनी बुंदेलखंडात 'गोदू' नावाच्या कोण्या सरदाराचं पारिपत्य केलं (सं: पेशवे शकावली). बरं, दुसरा मुद्दा, या एका पत्रावरून बाजीराव शाहू महाराजांना भेटायला जात नाहीत असा अर्थ पोस्टकर्त्याने काढला. या वर दिलेल्या वर्षभरात बाजीराव पुढील तारखांना साताऱ्यात होते.
२४ फेब्रुवारी १७२२ (जमादि. १८)
९ जुलै ते ७ ऑक्टोबर १७२२ (जिल्काद १ ते मोहरम ७)
७ ऑक्टोबर १७२२ रोजी बाजीराव जे निघालेत ते पुढे सुपे सासवड भागात आले, आणि फिरत होते. तिथून पुढे २० नोव्हेंबरच्या सुमारास बाजीरावांनी पुण्याचा प्रांत सोडला ते अहमदनगर, औरंगाबाद (संभाजीनगर), पैठण, बऱ्हाणपूर, अशेरी, मकडाई, करत माळव्यात शिरले. इथे हंडिया, धार, बदकशा, आमझेरा, मांडू, करून पुन्हा आल्या वाटेने नर्मदेच्या काठी हुशंगाबादला आले. पुढे शिवणी-बऱ्हाणपूर करत नालछाला, आणि तसंच सरळ अकबरपूर करून पुन्हा साताऱ्याला आले. या वेळेस वर्षभराने बाजीराव साताऱ्यात आले आणि पुन्हा २२ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर असा जवळपास पाऊण महिना ते साताऱ्यात होते.
इथे गंमत अशी झाली, की माळव्यात बदकशा इथे बाजीरावांनी निजामाची भेट घेतली. वास्तविक या वेळेस निजामाला बादशहाने वजिरी सांभाळायला बोलावलं होतं, पण निजामाला ती नको होती. त्याला दक्षिणेतील त्याचं राज्य महत्वाचं होतं. शाहू महाराजांनी निजाम उत्तरेत जाताना त्याच्यासोबत आनंदराव सुमंतांना पाठवलं होतं. बाजीरावांची या सगळ्यावर नजर होतीच.
आता पुन्हा मूळ पत्राकडे येतो. त्याच्या सुरुवातीचा भागच असा आहे की, "तुम्ही विनंतीपत्र पाठवले ते प्रविष्ट जाहले, कित्येक निष्ठेचे अर्थ लिहिले." बाजीराव छत्रपतींना विनंतीपत्र पाठवतो आणि तरीही तो पोस्टकर्त्याच्या लेखी उद्दाम ठरतो! पत्रातीलच एक वाक्य आहे, "तुम्हीच (बाजीरावांनी) उद्योग केल्यास अगाध नाही, परंतु हयगयीने घडत नाही." या पत्रातील एक महत्वाचं वाक्य फार बोलकं आहे. "स्वामीसन्निध उभयपक्षींचे कल राखून चालण्यास एक चांगला योजावा" असं बाजीरावांनी कळवलं होतं. याचा अर्थ काय? तर सातारा दरबारातील प्रतिनिधी-सुमंत-डबीर ही माणसं बाजीरावांचे विरोधक असून बाजीरावांच्या मनसुब्यांना त्यांचा विरोध असे. या दोन्ही बाजू सांभाळण्यासाठी काही करावं असं बाजीरावांनी सुचवलं होतं. हे पूर्ण पत्रं आणि शाहू महाराजांची काळजी ही या गोष्टीचं फलित आहे. बाजीराव माळव्यात निजामाला भेटतात, थेट दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध आघाडी उघडून माळव्यात आपलं बस्तान बसवतात या गोष्टींनी दरबारातील बाजीरावांच्या विरोधकांनी उचल खाल्ली नसल्यास नवल. याच भीतीपोटी, त्यातून बाजीराव फौजेसह माळव्यात गेल्याने इथे "राज्यभारसंरक्षणार्थ सावधता" धरण्यासाठी शाहू महाराजांनी हे पत्रं लिहिलं आहे हे उघड आहे. याला प्रत्यंतर पुरावा आहे, नंतरही अशीच एक घटना घडलेली. (पुढच्या मुद्दा क्रमांक २ मधील 'इ' विभाग पाहावा.)
यातला शेवटचा मुद्दा म्हणजे कोणी असं म्हणेल की बाजीरावावर महाराजांचा एवढा विश्वास होता तर हे असं पत्रं लिहिण्याची गरज काय? तर हे पत्रं बाजीराव पेशवाईवर आल्याच्या पहिल्या तीन वर्षातलं आहे. यापूर्वी बाजीरावांनी अनेक युद्ध जिंकली असली तरीही पालखेड हे निःसंशय यश बाजीरावांनी मिळवलं आणि तत्कालीन जबरदस्त मुत्सद्दी पण शत्रू असलेल्या निजामाला मात दिली तेव्हापासून शाहू महाराजांचा विश्वास बाजीरावांवर कायमचा बसला, इतका की नंतर शाहू महाराजांची असंख्य पत्र आहेत ज्यात बाजीरावांचं प्रचंड कोडकौतुक केलं आहे. ती पत्रं न वाचता केवळ काल्पनिक इमले रचत पोस्टकर्त्याने बाजीरावांचा उद्दामपणा पुढे किती वाढला असेल वगैरे कल्पना केल्या आहेत.
वर दरबारातील दोन पक्षांबद्दल लिहिलं त्याबद्दल स्वतः शाहू महाराजांनी महादोबा पुरंदऱ्यांना मनातलं जे सांगितलं ते नमूद आहे. बाजीरावांनी शाहू महाराजांना विचारलेलं, "इन्साफ गैरवाजवी महाराजांच्या चित्तात कोणकोणते आले आहेत ते आज्ञा करावी, त्याचा विचार महाराज सांगतील तैसा करू". यावर महाराज म्हणाले, "आम्ही काय सांगणे? तुम्हांस कोणता न कलेसा आहे? जोपर्यंत तुम्ही व आम्ही अहो, तोपर्यंतच चालेल, पुढे चालणार नाही". थोडक्यात, मी असेपर्यंत बाजीरावाला सांभाळून घेईन, पुढे हे चालणार नाही, तेव्हा सावध राहा हा गर्भितार्थ होता याचा. याच पत्रात महाराजांनी बाजीरावांचं कौतुक केलं आहे, पण द्रव्याची आशा धरून कामं करतात असं महाराज म्हणतात ते बहुदा असंच कोणी गैरवाका समजावल्यामुळे असावं. (सं: पेशवे दप्तर १७, ले. ५२)
मुद्दा क्रमांक २)
दुसरा आक्षेप आहे तो निजामाकरावी शाहू महाराजांवर दबाव टाकण्याचा. ऑक्टोबर १७२४च्या एका यादीत (सं: पुरंदरे दप्तर खंड १, लेखांक ७७) चिमाजीअप्पा बाजीरावांना काही गोष्टी कळवत आहेत. त्या आधी, नुकतंच काय झालेलं हे कळावं म्हणून सांगतो- ३० सप्टेंबर १७२४ रोजी साखरखेडल्याला मुबारीजखान आणि निजामाच्या युद्ध झालं. शाहू महाराजांनी निजामाला मदत केली होती, आणि मराठ्यांकडून बाजीराव-पिलाजी जाधवराव निजामाच्या साहाय्यास गेले होते. या युद्धात बाजीरावांनी आणि पिलाजीरावांनी मोठं शौर्य गाजवल्याने निजामाने शाहू महाराजांना कौतुकाचं पत्रं पाठवलं, ज्यात तो बाजीरावांना 'शहामतपनाह' म्हणतो.
आता पुन्हा आक्षेप असलेल्या मूळ यादीकडे येऊ. दि. ९ ऑक्टोबर १७२४च्या या यादीत चिमाजीअप्पा लिहितात त्याचा सारांश असा- "बाजीरावांनी निजामाशी बोलणी करून ठेवावी की, ते माघारी आल्यावर पाठून निजामाचं पत्र शाहू महाराजांना यावं, ज्यात 'कर्नाटकच्या मोहिमेवर जाताना बाजीरावाला माझ्या मदतीला द्या' असं निजाम असेल. जर निजाम स्वतः गेला नाही तर ऐवजखानाच्या मदतीसाठी महाराजांकडून आपल्याला मागून घ्यावं." यातलं शेवटचं वाक्य असं आहे, "नवाबानी पत्रं राजश्री स्वामींशी ल्याहावें कर्नाटकात स्वारी, आथवा भागानगर प्रांते स्वारी झाली तरी रा. प्रधानपंत यासच पाठवणे." याचाही अर्थ सोपा आहे. वर जे दरबारी अंतर्गत विरोधक सांगितले आहेत त्यात प्रतिपक्षाकडून बारामतीकर नाईक वगैरे मंडळीही कर्नाटकात जाण्यासाठी उत्सुक होती. कारण कर्नाटकचा मुलुख अत्यंत सधन होता, जसा मध्यप्रांतांत माळवा होता. या ठिकाणी मोहीमशीर होण्यात सरकारचा आणि सरदारांचाही फायदा असे. चिमाजीअप्पांनी इथे निजामकरवी वशिला लावला असं म्हटलं जाऊ शकतं केवळ. कारण या वेळेस निजामाने बाजीरावांचं मोठं कौतुक केलं होतं, आणि शाहू महाराजही अजून तरी निजामाच्या बाजूचे होते. निजामाशी थेट शत्रुत्व हे १७२६पासून सुरु झालं जेव्हा निजामाने स्वतःहून पालखेडची मोहीम उघडली. चिमाजीअप्पांच्या या संबंध पत्रात कुठेही महाराजांवर 'दबाव' टाकण्याची भाषा नाही, किंवा महाराजांना सोडून शत्रुपक्षात जाण्याचं संगनमत नाही. उलट, निजामाचा आत्ता आपल्यावर विश्वास बसला आहे आणि महाराजांचाही निजामावर विश्वास आहे हे पाहून त्या निमित्ताने कर्नाटकची मोहीम पदरी पाडून घ्यावी म्हणजे तिथे स्वराज्य, पर्यायाने शाहू महाराजांचंच राज्य वाढवता येईल असा साधा सोपा विचार या यादीमागे आहे. तरीही, कसलाही अर्थ ध्यानी न घेता पोस्टकर्त्याने इथे बाजीरावांना थेट 'स्वामीद्रोही' म्हटलं आहे. बरं, निजामाकडून ही पत्रं आलीही असावी, कारण पुढे लगेच कर्नाटकच्या मोहिमा शाहू महाराजांच्या आज्ञेने सुरु झाल्या, ज्यात फत्तेसिंह भोसल्यांना मुखत्यारी दिली असली तरीही बाजीरावांनाही पाठवण्यात आलं होतं. या वेळीही निजामाशी बिघाड करू नये अशी शाहू महाराजांचीच इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार आपण वागत असल्याचं पत्रं बाजीरावांनीच शाहू महाराजांना लिहिलं आहे (सं: राजवाडे खंड ६ मध्ये लेखांक २२).
आता या दोन गोष्टींवरून बाजीराव उद्दाम आणि स्वामीद्रोही असतील तर शाहू महाराजांनी हे खपवून घेतलं? बरं, नुसतं खपवून घेतलं, दुर्लक्ष केलं तरी चाललं असतं, पण बाजीराव जाईपर्यंत शाहू महाराज त्यांचं कौतुक करायचे, त्यांची मर्जी जपायचे हे कसं होईल? पोस्टकर्त्याला शाहू महाराजांच्या क्षमतेवर बोट ठेवायचं आहे का? मी पुराव्याशिवाय बोलत नाही. खाली काही मोजकी उदाहरणं देतो, कारण सगळी द्यायची तर इथे एक पोस्ट पुरणार नाही.
अ) पालखेडच्या मोहिमेनंतर शाहू महाराजांनी कोणालातरी म्हटलेलं, "बाजीरावांची मर्जी सगळ्यांनी पाळावी, त्यांच्या चित्तास क्षोभ करू नये" (सं: पेशवे दप्तर १७, ले. १३)
आ) वर एके ठिकाणी म्हटलं तसं महाराजांनी बाजीरावांचं कौतुक करताना म्हटलंय, "आजकाल ईश्वरेच्छेने प्रधानपंतांच्या सर्व गोष्टी सर्वोत्कर्ष आहेत. याची कीर्ती भूमंडळी बहुत दिवस राहील. यशास आणि कीर्ती-ग्रहस्थास, स्वामीसेवेत आणि इतरही गोष्टीत कोणत्याही प्रकारे अंतर नाही." (सं: पेशवे दप्तर १७, ले. ५२)
इ) वर जे शाहू महाराजांच्या पत्राबद्दल आणि बाजीरावांना भेटीला यायला वेळ नसल्याबद्दल सविस्तर विवेचन केलं आहे, त्याला जोडून हा आणखी एक उल्लेख. नंतरच्या काळातही धामधुमीत प्रत्येक वेळेस लगेच लगेच साताऱ्यात जाऊन महाराजांची भेट घेणं बाजीरावांना जमत नसे. शाहू महाराजांचा बाजीरावांवर प्रवचन्द विश्वास आणि जीवही. ते मात्र कासावीस होत. याबद्दल खुद्द ताराबाईंचं एक पात्र आहे ज्यात त्या म्हणतात, "तुमचे येणे काळेकरून घडणार नाही, आणि यांस क्लेश भोगण्याची सीमा राहिली नाही. त्यापक्षी, याचे (शाहू महाराजांचे) समाधान तेच रक्षून तुम्ही सर्व राज्यभर चालवावा हेच तुम्हांस योग्य आहे. चिरंजिवांचे लक्ष तुमचे ठायी दुसरे नाही." (सं: पेशवे दप्तर ३०, ले. २२७)
मुद्दा क्रमांक ३)
पोस्टकर्त्याने पुन्हा इथेही केवळ एका पत्रावरून बाजीरावांना स्वराज्यद्रोही आणि स्वामीद्रोही ठरवलं आहे. पत्र काय, तर सेखोजींचे सरदार बकाजी महाडिकांना बाजीरावांनी सांगितलेलं की "तुम्ही व प्रतिनिधी एकत्र काम करता, असे समजले तर हे करू नये." मूळ गोष्ट अशी आहे -
एप्रिल १७३३ मध्ये बाजीराव मोहीमशीर झाले, आणि मी च्या पहिल्या आठवड्यात त्यांची छावणीव राजपुरीला पडली. महिनाभरात बाजीरावांच्या सैन्याने सिद्दीची बहुतांशी ठाणी जिंकून घेतली. या अवधीत बाजीरावांनी रायगडावरही संधान बांधलं होतं. (सं: काव्येतिहास संग्रह पत्रे यादी, ले. २२) सिद्दी रहमानला जंजिरा देऊन त्यांच्याकरवी जंजिरेकर सिद्दी आपले अंकित करायचे आणि रायगडचा ताबा मिळवायचा हा बाजीरावांचा प्लॅन होता. (सं: पुरंदरे दप्तर १, ले. १०६). प्रतिनिधींना महाराजांनी नेमलं तेव्हा बाजीरावांची अपेक्षा होती की ताज्या दमाची फौज जी कामं मोठी व अजून सुरुवात व्हायची आहे तिथे जाईल. पण प्रतिनिधी आले तेच थेट महाडला. उंदेरी आणि अंजनवेल हे सिद्दीचे दोन हात जाया करणं गरजेचं होतं. पण प्रतिनिधींनी ते केलं नाही. जे रायगडचं राजकारण बाजीरावांनी जवळपास पूर्ण होत आणलं होतं ते आयतं घ्यायला प्रतिनिधी महाडला गेले. (सं: पुरंदरे दप्तर १, ले. १०२). सगळ्यात महत्वाचं एक पत्र आहे ज्यात महादोबांनी बातमी कळवली आहे. बाजीराव आणि फत्तेसिंह भोसल्यांनी आपली साताठशे माणसं पाचाडला पाठवून चौकी बसवली होती, आणि किल्ल्याशी बोलाचाली सुरु होती. अशात प्रतिनिधी महाडला येऊन राहिले आणि त्यांनी परस्पर शाहू महाराजांना कळवलं, "रायगडचं काम माझ्याकडे आलं आहे, मला काय आज्ञा?" आता महाराजांना आतल्या गोष्टी चटकन न समजल्याने त्यांनी प्रतिनिधींना रायगड घेण्याची आज्ञा केली आणि प्रतिनिधींनी पुढची कारस्थानं केली. (सं: पेशवे दप्तर ३, ले. ४).
इथे बाजीरावांकडून एक लहानशी चुकही झाली आहे, आणि त्याबद्दल मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलंही आहे. पण ती चूक सहजगत्या झालेली आहे. प्रतिनिधी वगैरेंच्या विरुद्ध नाही. असो, मुद्दा हा की ८ जून १७३३ रोजीही बाजीराव, "रायगडचेही राजकारण आहे, लक्षप्रकारे येईल" असं म्हटलं (सं: पेशवे दप्तर ३३, ले. २७). या सगळ्यात बाजीराव दुसरीकडे गुंतले आहेत हे पाहून इकडे प्रतिनिधींनी, बाजीरावांच्याच योजलेल्या सगळ्या योजनेला आपलीच योजना म्हणून रायगड घेतला. ही गोष्ट पुण्याला कळली तेव्हा अप्पा गोंधळात पडले, त्यांनी बाजीरावांना विचारलं, "रायगडावर निशाणे चढली यैसे साताऱ्याहून लिहिले येथ आले, परंतु स्वामींकडून (बाजीरावांकडून) पत्र न आले. ऐसियास किला तो फते झालाच असेल, परंतु किल्ल्यावर लोक कोणाचे गेले, किल्ला सांप्रत स्वाधीन कोणाचे आहे ते पाहावयास आज्ञा केली पाहिजे." (सं: पेशवे दप्तर ३, ले. ७)
प्रतिनिधींचे हे उद्योग केवळ बाजीरावच नाही, तर इतर सरदारांनाही नकोसे झालेले. रघुनाथ हरी लिहितात, "पंतप्रतिनिधि आले नसते तर इतकीया दिवसात आम्ही मोर्चे सेऊन भांड्याच्या माऱ्याखाले (गोवळकोटाचे) येक दोन बुरुज पाडिले असते." (सं: पेशवे दप्तर ३, ले. १०). पोस्टकर्त्याने पत्र मुद्दाम खोडसाळपणाने दिलं आहे का कळत नाही. कारण त्या पत्राच्या अगदीच दोन पत्र मागे जाऊन असलेला वेगळ्याच पात्रातील मजकूर त्यांनी वाचला असता तर ही वेळ आली नसती. रायगडच्या आणि रघुनाथ हरीच्या अनुभवावरून बाजीरावांनी बकाजी नाईकांना सावध केलं आहे. ते म्हणतात, "श्रमशाहास तुम्ही कराल, आणि राजश्री पंतप्रतिनिधी आले आहेत ते यशास पात्र होतील" (सं: पेशवे दप्तर ३, ले. १५). आणि म्हणूनच पुढच्या पत्रात ते बकाजींना म्हणतात, "ते तुम्ही येक होऊन काम करता म्हणोन कळों येते, तर हे गोष्ट कार्याची नव्हे. आपले राजकारणात दुसरेयाचा पाय सिरू देऊ नये." (सं: पेशवे दप्तर ३, ले. १९). बाजीरावांनी हे सांगितलं ते योग्यच आहे याचा अनुभवही बकाजींना आला, म्हणूनच याच पत्रात ते बाजीरावांना म्हणतात, "आपण नीतिन्यायाने लिहून जे पाठवलं आहे ते यथार्थच आहे". स्वतः कान्होजींची पत्नी, सेखोजींची आई लक्ष्मीबाई आंग्रे यांनी प्रतिनिधींची बकाजी नाईकांच्या बाबतीतली लबाडी उघड केली आहे. (सं: पेशवे दप्तर ३, ले. २१). स्वतः सेखोजी आंग्र्यांनी पंतप्रतिनिधींबद्दल म्हटलंय, "प्रतिनिधींचा विचार घालमेलीचा व शामलाचे ममतेचा पहिलीपासून आहे, तो आपणास अवगतच आहे. कोकणच्या मनसुब्यास दोन्ही गोष्टी कार्याच्या नाहीत त्यांचा आमचा बनाव न बसे, तेव्हा मनसुबा काय होणे आहे? शामल दगेखोर, जागाजागा रातबारीत छापे घालून उपद्रव देईल. प्रतिनिधी उठोन जातील ते कळणार नाही. गोद्विजांचा उच्छेद केल्याचे श्रेय आपले पदरी पडेल" (सं: पेशवे दप्तर ३, ले. ४३)
असो, फार लांबवत नाही. लिहिण्यासारखं पुष्कळ आहे. पण एका लहानशा अन निरर्थक पोस्टने गैरसमज लोकांमध्ये चटकन पसरतात, ते होऊ नये म्हणून चार ओळींच्या चुकीच्या खोडून काढायला असं विस्तृत उत्तर द्यावं लागतं.
बहुत काय लिहिणे? लेखनावधी!
- © कौस्तुभ कस्तुरे