10/09/2021
उपनिषदांतील शांतिपाठ
हिंदू धर्माने शांततेचा आणि सद्भावनेचा संदेश नेहमीच दिला आहे. वेदांची तत्वे प्राशन करून जेंव्हा आमच्या ऋषींनी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिले आणि मानव जातीची आणि सृष्टीची सत्यरूपी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा त्यांना दोन गोष्टींची अनुभूती झाली- नीरव शांतता- ज्यात मनाला इतर कुठलेही विचार भावना नकोत, आणि दुसरे सत् चिद् आनंद. उपनिषदातून त्यांनी हाच संदेश विश्वाला दिला.सच्चिदानंदासाठी प्रयत्न करा- आणि विश्वात सर्वत्र शांतता, समानता आणि सद्भाव नांदू दे.
शांततेचा हा विचार उपनिषदांमध्ये येतो शांतिपाठांतून. हे शांतिपाठ वेदांच्याच ऋचा आहेत. प्रत्येक उपनिषदाला स्वतःचा शांतिपाठ आहे. गणेशोत्सवात आरती म्हणून झाल्यावर ह्यातील एखादा शांतिपाठ नक्की म्हणा. मन आणि घर प्रसन्न होईल. या शांतिपाठांचा अर्थ कळला तर आमच्या पूर्वजांची मनोवृत्ती किती व्यापक होती याची कल्पना येते आणि त्याचा अभिमान वाटतो.
ॐ सहनाववतु । सह नौ भुनक्तु l सहवीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु ।
मा विद्विषावहै ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
कठोपनिषदाचा हा शांतिपाठ. ऋग्वेदात 'समानी व आकूति: समाना ह्रदयानि व:' ही ऋचा आहे. या ऋचेचा अर्थ आहे- आमचे मन, विचार, उद्दिष्टे समान होवोत. माणसामाणसातील समानतेचा मंत्र ऋग्वेदाने दिलेला आहे. आजपासून किमान पाच हजार वर्षापूर्वी. हाच अर्थ वरील शांतिपाठात येतो.
आमचे तू रक्षण कर, आमचे पोषण कर, आम्ही तेजस्वी होवो, आम्ही कुणाचाही द्वेष न करो.
__________
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः॥
मुण्डकोपनिषदातील हा शांतिपाठ आहे.
आम्ही जे उत्तम आहे तेच श्रवण करु दे, जे पवित्र तेच पाहू दे, आमचे शरीर आणि चित्त स्थिर होवो, ईश्वर हिताचे आहे (जे योग्य आहे, जे ईश्वराच्या चरणी आम्ही अर्पण करु शकतो) असे शुचिर्भूत कार्य आमच्या हातून घडो.
ह्याच उपनिषदात हा श्लोक सुद्धा आहे.
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्॥
सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. सत्याच्या मार्गानेच देवत्वला पोहोचता येते. हा मार्ग आक्रमल्यानेच ज्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्या आहेत असे ऋषी परम मार्गाला जातात.
बरोबर! ह्याच श्लोकातील सत्यमेव जयते आपण भारताचे राष्ट्रीय वाक्य म्हणून स्वीकारले आहे.
_______
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् ,
पूर्ण मुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्ण मेवा वशिष्यते।
ॐ शांति: शांति: शांतिः ईश उपनिषद
बृहदरण्यक उपनिषदातील हा शांतिपाठ.
जे संपूर्ण आहे, म्हणजेच ब्रह्म ते नित्य आहे. या पूर्ण ब्रह्मात अजून काही मिळवण्याची गरज नाही, त्यातून व्यक्त होणारे जग म्हणजेच सृष्टीची निर्मिती झाली तरीही ते पूर्णच उरते. ते आहे तसेच राहते.
पुर्ण याचा अर्थ शून्य असाही घेतला तर शून्याचे गणित सांगणारा हा श्लोक आहे. शून्यात शून्य मिसळा, वजा करा, भागाकार किंवा गुणाकार करा त्याची बाकी शून्यच येते.
_________
ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता ।मनो मे वाचि प्रतिष्ठितम् ।आविराविर्म एधि ।वेदस्य म आणीस्थः ।
श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीतेनाहोरात्रान्सन्दधामि ।
ऋतं वदिष्यामि । सत्यं वदिष्यामि । तन्मामवतु ।
तद्वक्तारमवतु । अवतु माम् ।
अवतु वक्तारामवतु वक्तारम् ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
ऋग्वेदाच्या ऐतरेय आरण्यका चा चार पाच आणि सहावा अध्याय ऐतरेय उपनिषद् म्हणून ओळखले जाते. त्याचा हा शांतीपाठ आहे. ऋग्वेद काळातील असल्याने ह्याची भाषा सुद्धा कठीण आहे. ऋग्वेदात सभा आणि समिती असे लोकशाही संसदे सारखे प्रकार नमूद आहेत. बहुधा, त्या सभेत बोलण्यापूर्वी वक्ता ही प्रार्थना करीत असेल. हा तुम्ही पाठ करुन म्हणू शकाल असे नाही. पण ह्या श्लोकात जी प्रार्थना केली आहे ती वाचून तुम्हाला आपल्या पूर्वजांची एकात्मिक सामाजिक जाणीव काय होती हे समजेल.
माझी वाणी माझ्या मनात स्थिर असावी. म्हणजेच माझे मन आणि माझी वाणी यात एकवाक्यता असावी आणि अशा माझ्या वाणीतून प्रकाशरूप ज्ञान प्रकट व्हावे. हे वेदांचे ज्ञान माझ्यात तू आण. त्यामुळे मी अहोरात्र विद्वत राहीन. माझे ज्ञान नष्ट न होवो. माझ्या मुखातून केवळ शुभ ते बाहेर पडो. सत्य बाहेर पडो. ते ज्ञानरूपी ब्रह्म आमचे रक्षण करो.
_____
अशाच अर्थाचा शांतीपाठ तैत्तिरिय उपनिषदात आहे.
ॐ शं नो मित्रः शं वरुणः । शं नो भवत्वर्यमा । शं नो इन्द्रो बृहस्पतिः । शं नो विष्णुरुरुक्रमः । नमो ब्रह्मणे । नमस्ते वायो । त्वमेव प्रत्यक्षं बह्मासि । त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि । ऋतं वदिष्यामि । सत्यं वदिष्यामि । तन्मामवतु । तद्वक्तारमवतु । अवतु माम । अवतु वक्तारम् ।
तैत्तिरिय यजुर्वेदाचे उपनिषद असल्याने ऋग्वेद काळाशी जोडलेले आहे. मित्र, वरुण, इंद्र, बृहस्पती, वायू, विष्णू, ब्राह्मण (देव) ह्या ऋग्वेदी देवता. त्यांना नमस्कार करुन, त्यांच्या समोर मी वचन देतो की मी नेहमी शुभ तेच बोलेन, सत्य तेच बोलेन. तू माझे रक्षण कर तू आमचे रक्षण कर.
ऋग्वेद काळी वरूण ही देवता नैतिकतेची देवता होती. आपल्या हातून काही प्रमाद घडला तर वरुण शिक्षा करतो ही भीती ऋग्वेदीक समाजात होती. थोडक्यात समाजाचे नियमन नैतिकतेच्या अधिष्ठानावर व्हावे यासाठी आमचे पूर्वज जागरूक होते.
तर असा आहे आपला धार्मिक आणि सामाजिक इतिहास. आपले पूर्वज किती उच्च दर्जाचे जीवन जगत होते याचा विचार करुन आपल्याला अभिमानही वाटला पाहिजेच. पण आजच्या समाजाची स्थिती पाहून आम्हाला स्वतःची लाजही वाटली पाहिजे, की आमच्या पूर्वजांच्या आपल्या भावी पिढीसाठी च्या अपेक्षा आम्हीपूर्ण करु शकलो नाही.
हया गणेशोत्सवात आपण प्रतिज्ञा करु, वरुणाला स्मरून, की या समाजातील सर्व असत्य, अनृत, अशुभ संपवण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नात मी वाटा उचलेन.
सत्यमेव जयते
हर्षद माने
उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची वाट आजच्या उत्तम वाचनातून जाते... बातम्या, विश्लेषण, संपादकीय, सदरे, विशेष लेख, कोप.....