30/12/2024
*शोधला तर देव हि सापडतो*...
दहिवडी पोलिस ठाणे सातारा येथील दोन दिवसांपूर्वीच पदोन्नती स्वीकारुन पोलीस हवालदार पदावर कार्यरत झालेले पोलिस हवलदार बक्कल नंबर 1988/रामचंद्र शिवाजी गाढवे व त्यांचे सहकारी यांनी केलेला छोटा परंतू महत्त्वपूर्ण तपास.
दिनांक 19/12/2024 रोजीची हि गोष्ट , हवालदार गाढवे हे त्यांना नेमलेल्या पहिल्या वाहिल्या राखीव पोलिस ठाणे अंमलदार कर्तव्यावर हजर झाले. आणि ग्रामीण रूग्णालय दहिवडी येथुन सांगावा आला की एक अंदाजे 65 ते 70 वयाची वयस्कर व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाली असून त्यांनी उपचारापूर्वी त्यांचे नाव व ते पुणे शहरातील ज्या भागात राहतात त्या भागाचे नाव सांगितले असून संपुर्ण पत्ता किंवा मोबाईल नंबर व ईतर कोणतीही माहिती दिलेली नाही अथवा त्यांचे जवळ ऊपलब्ध नाही. आपण तत्काळ पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात यावे.
सदरची माहिती मिळताच हवालदार गाढवे आपले सहकारी असिफ नदाफ, स्वप्नील म्हामने यांचे सोबत ग्रामीण रूग्णालय दहिवडी येथे पोहचले कर्तव्यावरिल डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास चालु करण्यात आला.
मयताची पाहणी केली असता मयत हे पुणे शहरातील गजबजलेल्या लोकवस्तीतील वार्जे - माळवाडी भागातले रहिवाशी असल्याचे त्यांचे जवळ मिळालेल्या PMT बसेसच्या अनेक तिकीट वरून लक्षात आले. त्याच बरोबर मयताकडे मिळाले ST तिकीट हे दिनांक 17/12/24 रोजीचे स्वारगेट ते गोंदवले असे असल्याने मयत एक दोन दिवसांपूर्वीच या भागात आल्याचे लक्षात आले.
परंतू मयताचे वारसांचा शोध घेणेकरीता आवश्यक असलेला संपुर्ण पत्ता, आधार, मोबाईल किंवा तत्सम कोणतेही कागदपत्र जवळ नसल्याने फक्त नाव व दाट लोकवस्ती असलेल्या शहरातील एका भागाच्या नावावरून वारसांचा शोध घेणे कठीणच.
परंतू हवालदार गाढवे यांचेवर आले जबाबदारीतील हे पहिलेच कर्तव्य आणि त्यात *कोणत्याही पोलिसांच्या आयुष्यात प्रथम मयताचा तपास आला तर ती पुण्याची गोष्ट मानली जाते* असे जुने सहकारी सांगतात.
कोणत्याही मयताचे शेवटचे सोपस्कार हे त्याचे नातेवाईकांचे हातूनच व्हावेत हि ईच्छा मनी बाळगून हवालदार गाढवे आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी मयताबाबत वेगवेगळ्या पद्धतीने माहिती घेण्यास सुरवात केली परंतू उपयुक्त माहिती मिळत न्हवती.
*सदर बाबत दहिवडी पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन करून तपासाची दिशा ठरवली व त्यांना आलेल्या अनुभवांची सांगड घालून जलद गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या.*
प्रभारी अधिकारी यांचे सूचनेनुसार
मयताकडे मिळुन आलेले वस्तूंची पाहणी करताना एक आशेचा किरण चमकला आणि *मयताचे जवळील दोन्ही शर्टवर मयताने कपडे शिवलेल्या टेलरचे नावाचे लेबल व मोबाईल नंबर असे नमूद असल्याने दिसून आले* गाढवे यांनी क्षणाचा विलंब न लावता शर्ट वर मिळून आलेल्या दोन्ही नंबरवर कॉल केले परंतू त्यातील एक नव्या ग्राहकाशी जोडला गेला होता तर एक बंद मिळुन आला.
आता शोध सुरू झाला लेबलवर नमुद मेन्स वेअरच्या मालकाचा. बराचवेळ प्रयत्न केल्यानंतर मोबाईल नंबर प्राप्त करण्यात यश आले. त्यावर संपर्क साधून माहिती घेतली असता संबंधित टेलर यांनी सांगीतले की, त्यांनी सदरचे दुकान हे दिड वर्षापूर्वी बंद केले असून आता तेथे बिअर शॉप आहे. त्यावर हवालदार गाढवे यांनी त्यांचेशी सौजन्याने बोलून सदर मयत गृहस्थ आपलेच भागात राहण्यास असण्याची शक्यता असल्याचे त्यांचेकडे मिळुन आलेले तिकीट व आपले दुकानातील शर्ट वरून वाटत आहे कृपया पोलीसांना सहकार्य करा. त्यावेळी त्यांनी पोलिसांना मदत करण्याची ग्वाही दिली व त्यांना पाठवलेला मयताचा फोटो व माहिती त्या भागांतील सर्व व्हॉट्स ॲप ग्रुपवर पाठवला.
काहीवेळाने त्यांचा फोन आला की सदर मयत आमच्याच भागातील आहे परंतू ते या परिसरात भाडेतत्वावर राहत असल्याने त्यांचा सध्याचा ठाव ठिकाणा मिळुन येण्यास अडचण होत असून मी मा.नगरसेवक यांचेशी बोललो आसून आपणं देखील बोलावे.
त्यांचेकडून नगरसेक साहेबांचा नंबर घेऊन तत्काळ त्यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकरण कानावर आल्याचे सांगून पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला व प्रभागातील मतदार याद्या शोधून मयताचे नाव पत्ता शोधला परंतू सदर पत्त्यावर मयत राहत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांचे लोकल नेटवर्क (जनसंपर्क) वापरून मयताची माहिती मयताचे मुलीचा मोबाईल नंबर पो हवालदार गाढवे यांना दिला.
गाढवे यांनी सदर मोबाईलवर संपर्क साधून मोबाईल धरकाकडे मयताचे वर्णन व नावाची खात्री केली असता त्यांनी ते आमचेच बाबा असल्याचे सांगितल्याने त्यांना धिर देऊन घडलेली घटना सांगून तत्काळ दहिवडी येथे येण्याबाबत सांगीतले.
मयताचे नातेवाईक आलेनंतर सर्व सोपस्कार पूर्ण करुन मयत इसमाचा मृतदेह पुढील अंत्यसंस्कारासाठी मयातची पत्नी व दोन मुली यांचे ताब्यात देण्यात आला.
केलेल्या कष्टाला फळ तेव्हा मिळाले जेव्हा त्यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखिल त्या माय भगिनींनी पोलिसांचे केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. आणि आम्हाला देखील मनातून आनंद झाला की आम्ही बेवारस मयताचे वारसांचा शोध घेऊन एका मृतआत्म्याला सद्गतिकडे जाण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आणि एका गोष्टीची प्रचिती आली की,*शोधला तर देव हि सापडतो* — with Ram Gadhave.