![गोविंदभाई श्रॉफ युवा पिढीचे अखंड ऊर्जास्रोत-संपादक शिरीष देशमुखमाजलगाव:दि-६:मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन...](https://img4.medioq.com/990/436/1249917309904367.jpg)
06/01/2025
गोविंदभाई श्रॉफ युवा पिढीचे अखंड ऊर्जास्रोत-
संपादक शिरीष देशमुख
माजलगाव:दि-६:मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन तत्वनिष्ठ जीवनातून विद्वत्ता,नम्रता,सभ्यता आणि नैतिकतेचा मापदंड निर्माण करणारे पद्मविभूषण स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ हे नव्या पिढीसाठीचे अखंड ऊर्जास्रोत आहेत असे प्रतिपादन नवविकास मंडळाचे संचालक तथा संपादक शिरीष देशमुख यांनी केले.
मराठवाडा जनता विकास परिषद बीड जिल्हा शाखेच्या वतीने जवाहर विद्यालयात आयोजित युवक विकास परिषदेत प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री.देशमुख बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख होते.प्रमुख उपस्थितीत मजविपचे उपाध्यक्ष प्राचार्य सोमनाथ रोडे तर व्यासपीठावर मजविपचे सहसचिव सुमंत गायकवाड,प्रा.अर्जुन जाधव,सोमेश्वर वाघमारे यांची उपस्थिती होती.
गोविंदभाई श्रॉफ आणि मराठवाडा जनता विकास परिषद या विषयावर बोलताना श्री.देशमुख म्हणाले की,श्रद्धेय गोविंदभाईंनी महाराष्ट्रात संस्था हे सेवेचे प्रभावी माध्यम असल्याचा विचार रुजवला.यावेळी प्रा.सोमनाथ रोडे यांनी गोविंदभाईचे विचार आत्मसात करून युवकांनी आयुष्याची वाटचाल करण्याचे आवाहन केले.यावेळी युवक विकास समितीची घोषणाही प्रा.रोडे यांनी केली.
याप्रसंगी माजी आ.डी.के.देशमुख यांनी गोविंदभाईंच्या अथक प्रयत्नातून मिळालेल्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार विरोधात जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे सांगून विकास परिषदेने त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घ्यावी असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्व.गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. या युवक परिषदेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए.आर.ईबीते यांनी स्वागतपर मनोगत सहसचिव सुमंत गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे गीत धनंजय जाडे व संकेत गायकवाड यांनी सादर केले.सूत्रसंचालन हिमांशू देशमुख तर आभार राजाराम शिवणकर यांनी केले.कार्यक्रमासाठी मजविपचे तालुकाध्यक्ष सुहास देशमुख, संतोष मुळी, गणपतराव सोंदळे,आर.एन.सावंत यांच्यासह युवक-युवतींची आणि विकासप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
#मराठवाडा #बीड