साप्ताहिक कल्याण वैभव विषयी
मित्रहो,
सा. कल्याण वैभवच्या निर्मितीची गाथा आपणापुढे मांडतांना या साप्ताहिकाचा मालक, संपादक व प्रकाशक म्हणून माझी ओळख आपणास करुन देणे अभिप्रेत आहे.मी म. रा.वीज मंडळ व विद्यूत वितरण कंपनीची एकत्रित ४० वर्षींची सेवा करुन दि ३१-७-२०१३रोजी सेवानिवृत्त झालो. सेवा काळात मी कामगार चळवळीत नेहमीच सक्रिय राहीलो. मला काॅलेजच्या काळापासून लेखनाचा छंद जडला होता. मी त्या काळात सकाळ
, लोकमत, लोकसत्ता, जनमत सारख्या दैनिकांमधून लिखाण करायचो तसेच विविध दिवाळी अंकांसाठी कथा, लेख, कविता हे साहित्य सातत्याने द्यायचो. सेवा काळात असताना २००९ साली माझा ' भावनांच्या लाटांवर शब्दांचा प्रवास ' हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
सेवानिवृत्ती नंतर केवळ लेखनाच्या प्रचंड आवडीमुळे मी सातत्याने पाठपुरावा करीत 'कल्याण वैभव' या साप्ताहिकाचे रजिस्ट्रेशन करुन घेतले. अशा प्रकारे सा. कल्याण वैभवची मुहूर्तमेढ दि १५ सप्टेंबर २०१५ रोजी करण्यात आली. त्यानंतर या साप्ताहिकाने नुकताच ८वर्षे पूर्ण करीत ९ व्या वर्षात पदार्पण केले. वेळोवेळी पोस्टल नोंदणी करीत असल्याने ०.२५ पैशात पेपर देशात कुठेही पोस्टाने वाचकांना घरपोच अंक पाठविण्याची सेवा उपलब्ध असल्यामुळे व वाचकांचा मोठ्या प्रमाणात या साप्ताहिकास प्रतिसाद लाभत असल्या कारणाने हे साप्ताहिक ठाणे जिल्हाचे सिमोलंघन करीत दूर दूरवर नाशिक, मालेगाव, पुणे, सांगली, कोल्हापूर ते अगदी बुर्हाणपूर पर्यंतच्या वाचकांच्या भेटीस पोहचले. काळानुरूप बदलणे आवश्यक आहे या विचाराने सा.कल्याण वैभवला डिजिटल स्वरुपात वाचकांसमोर आणीत आहोत. वाचकांनी इतकी वर्षे जे भरभरुन प्रेम या साप्ताहिकाच्या छापील अंकांना दिले तसेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रेम आमचे वाचक या नविन स्वरुपातील अंकाना देतील असा विश्वास मनी बाळगून बहुमूल्य सहकार्य व अलोट प्रेम देणारया सर्वांचे ऋण मनी बाळगून शब्दांना विराम देतो.
धन्यवाद.
विश्वास शंकर कुळकर्णी
मालक/संपादक/प्रकाशक
सा. कल्याण वैभव