28/07/2022
तोमर/तोवर/तंवर/तौर
एक क्षत्रिय राजघराणा
- - - - - - - - - - - - -
तौर-जहागीरदार,
तौर-ठाकूर
(ठाकूर म्हणजे राजा)
@
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आणि तेही गोदावरी नदीच्या सुपीक पट्ट्यात तौर-ठाकूर या अभिमानी आडनावाने राहाणाऱ्या लोकांची काही गावे आहेत. जी की तौर-ठाकुर यांच्या जहागीरीतील गावे आहेत. तौर-ठाकूर यांच्या जहागीरीतील गावांची संख्या सुद्धा थोडी लॉजिकल अशीच आहे. ती म्हणजे ही जहागीरदारीतील गावे आहेत साडेबावीस.!
तौर-ठाकुर यांची तब्बल साडेबावीस गावची जहागीरदारी असली, तरी अगदी जहागीरदार असल्याच्या वा ठाकूर म्हणजे राजा, राज घराण्यातील असल्याचा कसलाच अविर्भाव अथवा अभिमान न दाखवता राहाणारे लोक म्हणून तौर घराण्याची ओळख आहे. या साडेबावीस जहागीरीतील गावांखेरीज तौरांची उस्मानाबाद जिल्ह्य़ात सुद्धा काही गावे आढळतात.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यात तौर देशमुख यांची गौर आणि वाघोली ही दोन गावे आहेत. तर उस्मानाबाद तालुक्यात येडशी, ढोकी आणि तुगाव बावी तर तुळजापूर तालुक्यात शिराढोण आणि परळी तालुक्यात नागापूर ही तौर ठाकूर जहागिरदार यांची 'देशमुख' आडनाव लाऊन अभिमानाने वावरणारी अजून वेगळी काही गावे (गावांची संख्या जास्त असू शकते) सुद्धा पाहायला मिळतात.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तौर हे वडवणी येथील तौर असावेत असा अंदाज आहे. कारण तौर यांच्या साडेबावीस गावांच्या जहागीरदारीत वडवणी हे एक स्पेशल गाव आहे. मात्र येथे सध्या एकही तौर घर वास्तव्यास नाही.! यावरून असे दिसते की, उस्मानाबादेतील तौर वडवणी येथीलच असल्याचा ऐतिहासिक अंदाज आहे. शिवाय उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तौर देशमुख यांना देखील खूप पूर्व इतिहास माहित नसल्याचे चर्चेअंती लक्षात आले. पश्चिम महाराष्ट्रातील राजे शिर्के देखील याच कुळात येतात.
अलिकडे इतिहासातील अनेक नवनवीन अभ्यासक आहेत, की ज्यांचा राजपुतांमधून मराठ्यांची उत्पत्ती झाली असावी, या गोष्टीला विरोध आहे. मात्र मराठवाडय़ातील तौर घराण्यावर अभ्यास केल्यास वरील अभ्यासकांचा विरोध मावळेल. कारण तौर घराण्याचा पूर्वज इतिहास हा उत्तरेतील तोमर/तोवर/तंवर राजपुतान्यातील कुळातील इतिहासाशी जुळलेला आहे. वरील सिद्धांताने अभ्यास न केल्यास तौर घराण्यावर अभ्यास करणे शक्य होणार नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तौर आणि सोळंके या दोन्ही घराण्यातील लोकांना त्यांचा पूर्वीचा इतिहास विचारल्यास या लोकांचे महाराष्ट्रात येण्याचे कारण हे देवगिरीची लढाई असेच सांगितले जाते. अल्लाउद्दीन खिलजी याचे देवगिरी राज्यावर आक्रमण झाल्याने, देवगिरीच्या राजाने मदतीसाठी राजस्थान राज्यातील (आताचे गुजरात) सोलंकी राजांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार गुजरातेतील सिद्धपूर पाटन येथील सोलंकी राजे आणि राजस्थान राज्यातील तंवरवाटी (तोरावाटी) भागातील राज्याचे तंवर राजे यांच्या फौजा देवगिरीच्या मदतीसाठी देवगिरीच्या दिशेने दर-कोस - दर-मुक्काम करीत निघाल्या.
मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सोलंकी आणि तंवर यांच्या फौजा देवगिरी येथे पोहोचण्या पूर्वीच राजा रामदेवराय यादव आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात तह झाला. या तहाने यादव राजाला क्षणार्धात मंडलिक राजा बनविले. तलवारीच्या पात्याला रक्ताचा एक थेंबही न लागता रामदेवराय कडून सर्व काही मिळालेल्या अल्लाउद्दीन खिलजीचे धाडस अजूनच वाढले. तेवढ्यात खिलजीला सोलंकीच्या फौजा देवगिरीच्या दिशेने येत असल्याची माहिती हेराकडून समजली. खिलजीने क्षणाचाही विलंब न करता सोळंकी आणि तंवरच्या रस्त्यावर चालणाऱ्या फौजांवर आक्रमण केले.
एका बाजूला रस्त्यावर दर-कोस दर-मुक्काम करीत चालून चालून दमलेल्या सोलंकी आणि तंवर यांच्या फौजा. तर दुसर्या बाजूला अल्लाउद्दीन खिलजी याची ताजीतवानी फौज.! अशा या दोन्ही फौजांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन त्यात सोलंकी आणि तंवर फौजांचा पाडाव झाला. खिलजीने क्षणाचाही विलंब न करता सोळंकीची राजस्थान राज्यातील (आताचे गुजरात) राजधानी असलेल्या सिद्धपूर पाटन शहराकडे सैन्य दामटवले आणि पाटन शहरावर चढाई करून ते ताब्यात घेतले.
अल्लाउद्दीन खिलजीने एवढ्यावरच न थांबता तंवरांच्या राजस्थानातील विखुरलेल्या तंवरवाटी (तोरावाटी) भागातल्या राज्यावर आक्रमण करून ते सुद्धा आपल्या अधिपत्याखाली आणले. खिलजीच्या अशा या दुहेरी आक्रमणाने सोलंकी आणि तंवर यांच्या फौजा बेघर बनल्या. ज्या देवगिरीच्या लढाईसाठी सोलंकी आणि तंवर राजांच्या फौजा महाराष्ट्रात आल्या होत्या, ते रामदेवराय यादव यांचे राज्य खिलजी सोबत लढाई न करताच त्याचे मंडलिक राजे बनले होते.
तौर-जहागीरदार यांच्या
साडेबावीस गावांचा इतिहास
- - - - - - - - - - -
शिवाय तिकडे सोलंकी आणि तंवर यांच्या स्वतःच्या असलेल्या राज्याला सुद्धा अल्लाउद्दीन खिलजी याने गिळंकृत केले होते. अशा दुहेरी संकटाने अचानक बेघर झालेल्या तंवर लोकांनी मराठवाडय़ातील दंडकारण्याचा भाग असलेल्या गोदावरी नदीच्या पट्ट्यात आपले बस्तान बसवले. तर सोलंकीच्या बेघर झालेल्या लोकांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आपली छावणी टाकली.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सोलंकींनी टाकलेल्या या छावणीला पुढे बर्याच दिवसांनी गावाचे स्वरूप प्राप्त झाले. सोळंकी यांच्या राजस्थान राज्यातील (आताचे गुजरात) राजधानीचे शहर असलेल्या पाटनची आठवण म्हणून सोलंकींनी या गावाला 'पाटन' हे नाव दिले. ते गाव म्हणजे सातारा जिल्ह्य़ातील आजचे पाटन हे तालुक्याचे शहर होय.
सोलंकी यांच्या आडनावाचा महाराष्ट्रात आल्यानंतर साळुंखे असा अपभ्रंश झाला. अगदी तशाच पद्धतीने तंवर यांच्या आडनावाचा सुद्धा काळाच्या ओघात अपभ्रंश होऊन ते तौर असे झाले. तंवरांची लोकसंख्या साळुंखे यांच्या तुलनेत कमी असल्याने, हे लोक पुन्हा विस्थापित न होता गोदा काठी एकाच ठिकाणी थांबले. मात्र साळुंखे यांचा मोठा भाऊ पाटन येथे थांबून, उरलेल्या साळुंखे लोकांनी महाराष्ट्रातील अनेक मोहिमामध्ये भाग घेत घेत हे लोक सबंध महाराष्ट्रभर विखुरले गेले.
साळुंखे हा लढाऊ घराणा असल्याने, या घराण्यातील लोकांनी अनेक युद्धात आणि मोहिमामध्ये भाग घेत घेत हे लोक सातारा जिल्ह्य़ातील पाटन येथून संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरले गेले. हे लोक ज्या भागात मोहिमेवर गेले तिकडे त्या त्या भागात त्यांनी आपली गावे बसवली. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात साळुंखे यांच्या आडनावाचा पुन्हा एकदा अपभ्रंश होऊन ते सोळुंके अथवा सोळंके असे झाले.
तंवरांच्या देवगिरीच्या लढाईसाठी आलेल्या सैन्यात सख्खे आणि चुलत असे मिळून तेवीस भावंडांचा विस्तार होता. या तेवीस तंवर कुटुंबातील भावंडांनी गोदावरी नदीच्या पट्ट्यात आपली स्वतंत्र तेवीस गावे बसवली. तंवर लोकांतील आक्रमकता आणि लढाऊ वृत्ती बघून पुढे निजामाने या तंवरांना जवळ करून, त्यांना साडेबावीस गावची जहागीरदारी दिली. या जहागीरीच्या तेवीस गावामध्ये बावीस पूर्ण आणि एका अर्ध्या गावाचा समावेश आहे.
सरदार महादोजी उर्फ़ महादजी तौर-ठाकूर यांचा इतिहास.
- - - - - - - - - -
इतिहासाची पाने चाळताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे कोणत्याही घराण्यातील लोकांत मनगटाच्या जोरावर लढण्याची ताकद नसेल, तर त्यांचा इतिहास हा शून्य आहे.! साडेबावीस गावची जहागीरदारी असलेल्या तौरांचे बाबतीत मला नेहमी वाटायचे की, या साडेबावीस गावांत कोणीतरी एखादा लढवय्या जरूर असला पाहिजे. त्या शिवाय निजामाने साडेबावीस गावचे जहागीरदारीचे वैभव यांच्या पदरात उगाच कशाला टाकले असते.!
एक दिवस इतिहास संशोधक डॉ. राजेनरेश जाधवराव यांच्या सोबत तौर-जहागीरदार या विषयावर चर्चा सुरू असताना, त्यांनी सांगितले की राजे लखोजी जाधवराव यांच्या सैन्यातील महादजी ठाकुर नावाचे एक आक्रमक आणि अत्यंत क्रुरतेने लढणारे लढवय्ये सरदार होऊन गेले. या सरदाराचा रणांगणातील लढण्याचा इतिहास हा खूपच पराक्रमी आणि गौरवशाली असा आहे.
सरदार महादोजी तौर-ठाकूर हे राजे लखोजी जाधवराव यांच्या सैन्यातील एक उत्कृष्ट पट्टीचे तलवारबाज असलेले सरदार होते. रणांगणात लढताना शत्रुपक्षावर त्यांचा अतिशय दरारा आणि वचक असायचा, धाक असायचा. रणात खूप क्रुरतेने लढणारे सरदार अशी सरदार महादजी तौर-ठाकूर यांची ओळख होती. लखोजी जाधवराव यांच्या सैन्यातील एक आक्रमक लढवय्ये सरदार म्हणून शत्रुपक्षावर यांची कायम धडकी भरलेली असायची.
इतिहासात सरदार महादजी तौर-ठाकूर यांची ओळख (उल्लेख) अत्यंत क्रुरतेने लढणारे सरदार अशी आहे. कदाचित यांची तलवार अशी ताकतीने चालत असेल, की तिच्या एका घावात ती समोरच्या व्यक्तीला धडावेगळे करीत असेल. म्हणून सरदार महादजी तौर-ठाकूर यांची ओळख इतिहासाने क्रुरतेने लढणारे सरदार अशी करून दिली असावी.!
सरदार महादजी तौर-ठाकूर यांचा इतिहास हा राजे लखोजी जाधवराव यांच्या काळातील म्हणजे सतराव्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. बहुतेक सरदार महादजी तौर-ठाकूर हे राजे लखोजी जाधवराव यांच्या नंतर निजामाच्या चाकरीत मानांकित सरदार म्हणून गेलेले असावेत, असा अंदाज आहे. सरदार महादोजी तौर-ठाकूर यांच्यातील लढण्याची जिगर आणि शौर्य पाहून, यावर खूश होऊन निजामाने त्यांना गोदावरी नदीच्या पट्ट्यातील साडेबावीस गावची जहागीरदारी दिली असावी, असा अंदाज आहे.
सरदार महादोजी तौर-ठाकूर यांच्या विषयीच्या इतिहासात नोंदी सापडल्यावर मी साडेबावीस गावातील ओळखित असलेल्या तौर-ठाकूर अथवा तौर-जहागीरदार यांना त्यांच्या पूर्वजांनी जतन करून ठेवलेल्या काही वंशावळी अथवा दस्तावेजाची मागणी केली. मात्र मला फक्त उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना येथील वंशावळी उपलब्ध झाली. आणि योगाची गोष्ट म्हणजे जे सरदार महादोजी तौर-ठाकूर यांचे नाव मला हवे होते, ते मला याच वंशावळी मध्ये मिळाले.
उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना येथील महादेव मंदिरासमोर एक पुरातन कालीन समाधी असून, या समाधीचे निर्माण राजे लखोजी जाधवराव यांच्या काळाशी जुळणारे वाटते. समाधीवर महादेवाची पिंड होती पण काही (अती) शहाण्या लोकांनी ती दुसरीकडे ठेवली असून समाधीवर तुळशी वृंदावन ठेवले आहे. शिवाय समाधीला अलिकडच्या काळातील रंगाने रंगवण्यात आल्याने, तिचे (समाधीचे) पुरातनत्व नष्ट झाल्यासारखे वाटत आहे. समाधीला लावलेल्या बटबटीत आणि ओबडधोबड अधुनीक रंगवटीमुळे समाधीवर काही शिलालेख असेल, तर तो दुर्दैवाने लक्षात येत नाही.
निजामाने तंवरांच्या बावीस
गावातील तौर लोकांना त्यांच्या गावातील महसुलाचे आणि इतर संपूर्ण अधिकार बहाल केले. तर टाकरवन, ता. माजलगाव, जि. बीड येथील तंवरांना मात्र महसुलातील फक्त अर्धेच अधिकार दिले गेले. तेव्हा पासून गोदावरी नदीच्या पट्ट्यातील भागात 'तौर लोकांची जहागीरीतील साडेबावीस गावे आहेत', असे म्हणण्याचा या भागात एक प्रघातच पडून गेला.
तंवरांच्या साडेबावीस गावातील सर्वात थोरले गाव उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना हे आहे. म्हणून तौरांची जहागीरीतील गावे मोजताना सर्वात अगोदर उक्कडगाव या गावापासून मोजदादीला सुरूवात करावी लागते. आणि ही मोजणी थोरल्या भावाकडून धाकट्या भावाकडे (गाव) मोजत नेण्याची पद्धत आहे.
"तौर-जहागीरदार
यांची साडेबावीस
गावांची यादी"...
1) उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
2) गोपत पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड.
3) ढालेगाव, ता. गेवराई, जि. बीड.
4) शेवनगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
5) कवडगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
6) शेलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
7) रिधोरी, ता. माजलगाव, जि. बीड.
8) भादली, ता. घनसावंगी, जि. जालना.
9) गुंज, ता. घनसावंगी, जि. जालना.
10) लिंबी, ता. घनसावंगी, जि. जालना.
11) डुब्बा, ता. माजलगाव, जि. बीड.
12) काळेगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
13) चांगतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
14) सावरगाव, ता. परतूर, जि. जालना.
15) संकनपुरी, ता. परतूर, जि. जालना.
16) वारुळा, ता. माजलगाव, जि. बीड.
17) गोळेगाव पोकतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
18) हिवरा, ता. माजलगाव, जि. बीड.
19) ठाकर आडगाव, ता. गेवराई, जि. बीड.
20) वडवणी, ता. वडवणी, जि. बीड.
21) बाबुलतारा (तौर बोंगे), ता. गेवराई, जि. बीड.
22) हिशी धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी.
आणि अर्धे गाव
23) टाकरवन, ता. माजलगाव, जि. बीड.
तौर-ठाकूर- जहागीरदार यांच्या जहागीरदारीत येणार्या साडेबावीस गावांची ही वरती दिलेली लिस्ट आहे. तौर हा हजारो वर्षाचा राज घराणा असून, तौर म्हणजे ठाकूर (राजे) आहेत. शिवाय त्यांना मराठवाडय़ातील साडेबावीस गावची जहागीरदारी असल्याने तौर हा घराणा जहागीरदार घराणा आहे. गावात आपल्यापेक्षा कोणी मोठा नसावा म्हणून या घराण्यातील लोकांनी गावपातळीवरील पाटीलकी घेतलेल्या आहेत.
तौर हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही, तर सबंध भारतातल्या क्षत्रिय घराण्यातील सर्वात मोठा इतिहास असलेला वरच्या क्रमांकावरील राज घराणा आहे. तौर- ठाकूर- जहागीरदार अशा घराण्यातील मोठ मोठ्या उपाध्या (पदव्या) आपल्या आडनावा समोर लावायच्या सोडून आपल्या आडनावा समोर "पाटील" ही (सर्व उपाध्यातील खालची पदवी.!) गावपातळीवरील पदवी लावून मिरवताना दिसत आहेत.
तौर- ठाकूर अथवा तौर- जहागीरदार मधील आजच्या तरुणाईला हे ध्यान असले पाहिजे, की आपण किती मोठ्या गौरवशाली इतिहासाचा वारसा असलेल्या घराण्यात जन्म घेतला आहे. ज्या घराण्यातील पूर्वजांचा ऐतिहासिक गाथा स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवला तरी कमीच आहे. या घराण्यातील आजच्या सकल वंशजांनी आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या दैदीप्यमान इतिहासाशी अंकित असले पाहिजे.
घराण्यातील अशा दैदीप्यमान इतिहासाचा वारसा नेटाने पुढे चालवत नेण्यासाठी खरे तर आज प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज तौर असो वा सोळंके, या घराण्यातील आजचा युवक पूर्वजांच्या या गौरवशाली इतिहासापासून अनभिज्ञ असणे, ही खरोखरच दुर्दैवाची बाब आहे. असे असणे म्हणजे त्याला पूर्वज लोकांनी निर्माण केलेल्या प्रभावशाली इतिहासाचा परिचय नाही, शिवाय तो करून घेण्याची इच्छा सुद्धा नाही असेच म्हणावे लागेल.
आज आपल्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा आणि त्या जोडीला परिवार सुद्धा असेल. पण या जोडीला घराण्याचा इतिहासच माहिती नसेल तर हे ऐश्वर्य अपूर्ण आहे.! मित्रहो, सोळंके आणि तौर हे इतिहासातील हजारो वर्षापासून शौर्य गाजवत आलेले राज घराणे आहेत. मात्र आजच्या काळात हे दोन्ही घराणे शापित आणि भ्रमित अवस्थेत असल्याचा उघड उघड आरोप होत आहे. हा आरोप यापुढील काळात सर्वांनी मिळून पुसून काढायचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
तौर आणि सोळंकेतील लोकांनी यापुढील काळात संकल्पित होऊन आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या दैदीप्यमान आणि गौरवशाली तसेच संस्कारीत इतिहासाच्या सुगंधाने यापुढील काळात समाजाला दरवळायचे आहे.
तौर घराण्याचा इतिहास
- - - - - - - - -
तोमर/तोवर/तंवर/तौर हा उत्तर-पश्चिमी भारतातील एक प्रमुख राजपूत राजवंश आहे. तोमर क्षत्रिय हे छत्तीस कुळी क्षत्रियातील चन्द्रवंशी कूळ असून या कुळाला पाण्डु पुत्र अर्जुनाचे वंशज मानले जाते. यांचे गुरू गोत्र अत्री असून, नंतरच्या काळात मात्र या कुळातील काही शाखेतील लोकांचे गुरू गोत्र हे गार्ग्य अथवा पाराशर असे झालेले दिसून येते.
तोमर/तौर (तोवर/तंवर/तुंवर/तूर) या आडनावाची उत्पत्ती ही पांडवांपासून झालेली आहे. यामुळे तोमर/तौर यांचे जन्म गोत्र पाण्डुवन्शी किंवा कुंतलवंशी (कुंतीची मुले) असे सांगितले जाते. तोमर/तौर (जाट, राजपूत, शिखा, मराठा आदी वंशातील लोक) हे पांडवातील अर्जुनाचे वंशज आहेत. तंवरांची कुलदेवी ही मनसा देवी अर्थात योगमाया योगेश्वरी (कृष्णाची बहिन) म्हणजे, शाकुम्भरी देवी (जोगेश्वरी) ही आहे. या देवीला पांडव आपली कुलदेवी आहे, म्हणून तिची साधना करीत होते.
पांडवातील अर्जुन वंशी परिक्षितीचा पुत्र जन्मेजय याने विश्वविख्यात सर्प यज्ञाचे आयोजन केले होते. ही कथा जगविख्यात आहे. जगातील संपूर्ण सर्प प्रजातीच्या वंशाचा नायनाट करण्याच्या उद्देशाने जनमेजयाने आयोजित केलेल्या या यज्ञात नागाच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या होत्या. सर्प आणि नागाच्या सर्वच प्रजाती नष्ट होऊन सृष्टीचक्र बिघडू नये, म्हणून या आयोजित यज्ञात भगवान श्री. विष्णूने स्वतः हस्तक्षेप करून सर्प जातीचे रक्षण केले होते. त्या बदल्यात राजा परीक्षिती याला विष्णूने यापुढे तोमर वंशातील लोकांना सर्प दंश होणार नाही आणि झालाच तर त्यांच्यावर याचा असर होणार नाही, असे वरदान दिल्याची कथा जगत प्रसिद्ध आहे.
'तोमर' या शब्दाच्या उत्पत्ती संदर्भात बोलायचे झाल्यास, तोमर हा एक मूळ संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ भाला किंवा लोहदंड असा आहे. 'तोमर' हे आई दुर्गादेवीचे सुद्धा एक शस्त्र आहे. तोमर या शस्त्राचे सुंदर वर्णन दुर्गा कवच मध्ये सुद्धा करण्यात आलेले आहे. यात तोमर नावाचा उल्लेख दुर्गादेवीचे हत्यार म्हणून करण्यात आलेला आहे. भारतीय पौराणिक कथेतून असे सांगितले जाते, की हेच तोमर शस्त्र दुर्गादेवीने अर्जुनाला महाभारत युद्धावेळी दिले होते. जे की अर्जुनाच्या अक्षय भात्यातील एक आयुध होते, शस्त्र होते. ज्याचा योग्य वापर कृष्णसखा अर्जुनाने महाभारत युद्धात वेळोवेळी केला होता.
त्या काळातील या सर्व प्रकारातून असे दिसून येते, की पांडू पुत्र अर्जुनाकडे असलेल्या अक्षय भात्यातील 'तोमर' हे एक प्रमुख असे शस्त्र होते. तोमर हे त्यावेळेसच्या युद्धकालीन शस्त्रांपैकी एक अद्भुत आणि अनन्य साधारण महत्त्व प्राप्तीच्या यशोशिखरावर असलेले त्या काळचे एक शस्त्र होते. ज्या शस्त्राने अर्जुनाला एक प्रबळ योद्धा बनवले होते. शिवाय अर्जुन कुळाला हेच तोमर शस्त्र 'तोमर' हे आडनाव बहाल करून गेले. या सर्व गोष्टीतच या आयुधाचे महत्पण सामावलेले आहे.
तोमर जाट (राजपूत, शिखा, मराठा आदी) हे कुंती आणि पांडु यांचे वंशज आहेत. त्यामुळे तंवरांना कुंतल वंशी म्हणून ओळखले जाते. 36 क्षत्रिय राजवंशातील अधिकांश राजवंश हे क्षत्रियातील जाट, राजपूत, शिखा, मराठा आदी वंशातील लोकात दिसून येतात. कर्नल टॉड यांनी तर संपूर्ण तोमर वंशातील लोकांना 36 राजवंशातील एक राजवंश असल्याचे मान्य केले आहे. तोमरांच्या बाबतीत कर्नल टाड यांनी म्हटले आहे, की “जेव्हा जेव्हा तोमर वीरांनी प्रचण्ड पराक्रम दाखवले त्या त्या वेळी संपूर्ण संसार थरकापत होता. अशा या शूर वीरांचे वंशज आज शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत.“
तोमर राजवंशातील लोकांनी बहुसंख्य वेळा आपल्या पराक्रमी मनगटाच्या जोरावर इतिहास निर्माण केलेला आहे. तोमर लोक खूप साधे जीवन, उच्च विचार, राकट आणि दणकट व्यक्ती म्हणून दिसून आलेले आहेत, असे मत दिलीप सिंह अहलावत यांनी व्यक्त केले आहे. तोमर हे मध्य आशिया खंडातील शक्तिशाली सत्तारूढ़ कुळांपैकी एक कुळ असल्याचे सुद्धा उल्लेख आहेत.
मराठवाडय़ातील तौर यांची शाखा दिल्ली येथून ग्वाल्हेर आणि ग्वाल्हेर येथून राजस्थान येथील जयपूर राज्याचा एक भाग असलेल्या अमेर भागातील तंवरवाटी (तोरावाटी) पाटन या भागात स्थिरावली असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे मराठवाडय़ातील साडेबावीस गावचे जहागीरदार असलेल्या तौरांचे जन्मदाते गोत्र पाण्डुवन्शी (कुंतलवंशी) अथवा तोमर हे असून, गुरू गोत्र (ऋषि) गार्ग्य हेच आहेत.
तोमर/तंवर हा वंश उत्तर मध्य काळातील खूप ताकतवर वंश मानला जातो. उत्तर पश्चिमी भारतातील मोठ्या भागात या कुळाचे राज्य होते. तोमर/तंवर/तौर यांच्या राज्याची राजधानी ढिल्लिका (आजची दिल्ली) ही होती. तंवर राज्यनिर्मितीचे श्रेय हे याचं वंशातील तोमर राजांना दिले जाते.
राजपूत वंशामध्ये तोमर/तोवर/तंवर या वंशाचे एक श्रेष्ठ असे स्थान आहे. भारतीय पौराणिक कथेतून असे लक्षात येते की, सुरुवातीच्या काळात तोमर लोकांचे निवासस्थान हे हिमालयातील आसपासच्या परिसरात होते. मात्र दहाव्या शतकात हे लोक करनाल पर्यंत विखुरले आढळून आले आहेत. ठाणेश्वर या भागात सुद्धा यांचे राज्य विखुरलेले होते.
त्या वेळी उत्तर भारतातील कान्यकुब्ज भागात प्रतिहार राजपूत वंशातील राजांचे साम्राज्य विस्तारलेले होते. परिहार साम्राज्यातील मांडलिक राजे म्हणूनच तंवर राजांनी दक्षिणेत स्थलांतरित होण्यास सुरुवात केली.
ढिल्लिका (दिल्ली) मध्ये तंवर यांचा शासनकाल कोणत्या काळातील असावा हे अनिश्चित असले तरी विक्रम संवत दहाव्या आणि अकराव्या शतकात आपल्याला सांभरचे चौव्हाण आणि तोमर यांच्यातील युद्धाचे उल्लेख सापडतात. तोमर नरेश रुद्र हा चौहाण राजा चंदन याच्या हातून मारला गेला होता. तसेच तंत्रपाल तोमर हा चौहान राजा वाक्पति याच्याकडून पराभूत झाला होता. वाक्पति चौहान राजाचा मुलगा सिंहराज चौहान याने तोमर नरेश सलवण याचा खून केला होता.
मात्र चौहान राजा सिंहराज सुद्धा काही दिवसांनी मारला गेला. सिंहराज चौहान हा तोमर यांच्या हातूनच मारला गेला असावा असे लक्षात येते. यावरून असे दिसते की तोमर राजे हे त्या काळी दिल्लीचे राजे बनले होते.
मोहम्मद गझनीच्या सर्वात सुरुवातीच्या आक्रमणावेळी दिल्ली-थानेश्वर येथील तोमर राजवंश हा उत्तर-पश्चिमी भारतातील एक शक्तीशाली राज घराणा समजला जात होता. तोमर राजांनी आपल्या राज्याचा मोहम्मद गझनीच्या हातून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना यात यश आले नाही.
इ.सन् १०३८ ते इस. १०९५ या काळात दिल्ली राज्याने अनेक अनुभव अनुभवले. मोहम्मद गझनीचा मुलगा मसूदने हांसी वर आक्रमण करून ते ताब्यात घेतले. मसूदचा मुलगा मजदूदने थानेश्वर जिंकून आपल्या ताब्यात घेतले. आणि तोमर यांची राजधानी दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी तयारी सुरू केली. असे वाटू लागले होते की मुसलमान दिल्ली राज्य समाप्त केल्याविना आता गप्प बसणार नव्हते. मात्र तोमर राजांनी गजनीच्या आक्रमणाचा धाडसाने सामना करण्यासाठी तयारी सुरू केली. तोमर राजवंशातील महीपाल तोमर या राजाने सैन्याची जमवाजमव करून गजनीच्या आक्रमणाला मोडून काढण्याची तयारी सुरू केली.
महीपाल तोमर यांनी फक्त हांसी आणि थानेश्वर येथील किल्लेच जिंकून घेतले नाहीत, तर सैन्याने कांगडा येथे सुद्धा आपले विजयी निशान फडकावले. तंवरांनी इतका भीम पराक्रम केला होता, की गजनीचे भाग्यच बलवत्तर म्हणून तंवरांच्या हातून लाहोर शहर ताब्यात घेणे थोडक्यात वाचले.
तंवरांच्या या विजयाचे त्या काळी कौतुक व्हायला हवे होते, मात्र झाले उलटेच. तंवरांच्या या विजयाने राजपुतान्यात विद्वेषाग्नी भडकला गेला. तोमरांवर आजुबाजुच्या राजपुतान्यातील राज्यांचे आक्रमणे वाढू लागली. तंवरांनी या आक्रमणाला यथोचित यथाशक्ति उत्तर दिले. विक्रम संवत् ११८९ (सन् ११३२) मध्ये श्रीधर कवी यांच्या पार्श्वनाथचरित् ग्रंथावरून असे लक्षात येते की, तंवर साम्राज्याच्या वेळी त्यांच्या राज्याची राजधानी असलेले दिल्ली ही त्या काळात समृद्ध नगरी म्हणून ओळखली जात होती. तेथील तंवर राजे अनंगपाल तंवर आपल्या शौर्य आणि इतर गुणांनी सर्वत्र विख्यात असलेले राजे होते.
अनंगपाल तंवर द्वितीय यांनी मेहरोली येथे लोखंडी स्तंभावर स्तंभलेख लिहून त्याची दिल्लीत स्थापना केली होती. बिजलियाँ शिलालेखावरून बीसलदेव चौहान (विग्रहराज चतुर्थ) ने विक्रम संवत् १२०८ (सन् ११५१ ईo) मध्ये तंवरांना हरवून दिल्लीवर त्यांचे निशान फडकावले. त्या नंतर तंवर राजे हे चौहान राजांचे मांडलिक राजे म्हणून दिल्लीत राज्य करू लागले. पृथ्वीराज चौहान यांच्या दिल्लीतील पराभवा नंतर दिल्लीवर मुसलमान राजवटीला सुरुवात झाली.
फिरोजशाहा तुगलक याच्या राजवटीच्या काळात ग्वाल्हेरवर तंवरांच्या एका दुसर्या शाखेने राज्य प्रस्थापित केले. यानंतर ग्वाल्हेर येथे जवळपास १५० वर्ष तंवरांचे राज्य होते.
राजा रामसाह तंवर यांनी हल्दीघाटी युद्धात राजा महाराणा प्रताप यांना मदत केली होती. हल्दीघाटीच्या या प्रसिद्ध युध्दात लढताना रामसाह तंवर आणि त्यांचे दोन जवान मुले शहीद झाले. ग्वाल्हेर येथील तंवरांनी कला, साहित्य आणि संस्कृतिच्या सरंक्षणासाठी खूप मोठे कार्य केले होते.
दिल्ली येथे तंवरांच्या पराभवा नंतर तोमर/तंवर राजपूत वेगवेगळ्या दिशांनी विखुरले गेले. यातील एका तंवर शाखेने उत्तरी राजस्थान मधील पाटन भागात जाऊन आपले राज्य स्थापित केले. ज्याला जयपूर राज्याचा एक भाग समजले जात होते. सध्या या भागाला 'तंवरवाटी' अथवा 'तोरावाटी' अशा नावाने ओळखले जाते. सध्या सुद्धा या भागात तंवरांची ठिकाणे आहेत. यातील मुख्य ठिकाण मात्र पाटण हेच आहे.
तंवरांची दुसरी एक शाखा चंबळ भागात गेली, तिला 'तोमर राजपूतो की बसापत' म्हटले जाते. तंवरांच्या या बसापतीत (वसाहतीत) १४०० गावांचा समावेश आहे. या क्षेत्राला (परिसराला) तंवरघार या नावाने ओळखले जाते. तंवरांच्या या शाखेने अनेक पिढ्या ग्वाल्हेरवर राज्य केले. पश्चिमी उत्तर प्रदेश आणि हरियाणा या भागात सुद्धा तोमरांचे राज्य होते. तिथे आज सुद्धा तोमर/तंवर राजपूत खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
पश्चिमी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्य़ात असलेल्या पिलखुवा भागात तोमर/तंवर राजपूतांची 84 गावे आहेत. यात मुकीमपुर गढ़ी सुद्धा आहे. ज्यांनी 1857 च्या उठावात भाग घेतला होता. यामध्ये तंवरांचे अनेक लोक शहीद झाले होते. गढ़मुक्तेश्वर जवळ सुद्धा तंवरांची 42 गावे आहेत.
राजा अनंगपाल तंवर यांचा एक मुलगा भद्रसेन तंवर याने गढ़मुक्तेश्वर येथे येऊन अहिरांचा हा भाग जिंकून घेतला होता. आणि येथे भदस्याना नावाचे एक गाव बसवले होते. या गावापासून भैना, धौलपुर, लिसडी असे अनेक गावांचे निर्माण होऊन आज मितिला ही संख्या 42 गावांची आहे. मेरठ जवळ सुद्धा तोमर/तंवरांची 12 गावे आहेत. यामध्ये सिसौली, मऊ ख़ास, पंचगांव अशा नावाची ही गावे आहेत.
बुलंदशहर जिल्ह्य़ात सुद्धा तोमर/तंवरांची 24 गावे आहेत. गुलावठी आणि सिकंदराबाद यांच्या मध्ये असलेलेले बराल हे तोमर/तंवर यांचे एक प्रमुख गाव आहे. खुर्जाच्या जवळ सुद्धा तोमर/तंवर यांची धरपा सहीत 5 गावे आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की ,तोमर/तंवर/तौर यांच्या लोकांना एका शेजारी अनेक गावांच्या वसाहती तयार करून राहण्याची जुनीच सवय आहे. अथवा ही त्यांची संस्कृती आहे असेच म्हणावे लागेल.
पश्चिमी उत्तर प्रदेशात तोमर/तंवर यांची आडनाव बदलून राहाणारी दुसरी एक शाखा आहे. या शाखेला जंघारा अशा नावाने ओळखले जाते. या शाखेचा इतिहास खूप गौरवशाली आहे. ज्यांनी अनेक वर्षापर्यंत आत्ताच्या रोहिल्लखंडात मुस्लिम शासकांच्या विरोधात टक्कर घेतली होती. जंघारा (तंवर) यांनी मुसलमान राजवटीला कधी सुखाची झोप लागू दिली नव्हती. दिल्लीतील पराभव झाल्यानंतर काही तोमर/तंवर यांनी रोहिल्लखंडातील अहीरांना पिटाळून येथे राज्य प्रस्थापित केले होते.
जंघारा या शब्दाचा अर्थ 'जंग के लिए भूखे' असा आहे. हा खूप मोठा लढाऊ वंश आहे. यामुळे रोहिलखंडात राहाणाऱ्या तंवर या वंशाला जंघारा हे नाव पडले आहे. तंवर वंशातील जंघारा आडनावाने राहाणारे लोक बरेली, शाहजहाँपुर, बदायूं, एटा, फर्रुखाबाद आदी भागांत खूप मोठ्या संख्येने बघायला मिळतात. अलीगढ़ भागात सुद्धा जंघारा (तंवर) यांची 42 गावे आहेत.
या व्यतिरिक्त आगरा, फीरोजाबाद आदि जिल्ह्य़ात सुद्धा तोमर/तंवर राजपूत मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. हरियाणा राज्यातील भिवानी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तंवर राजपूत बघायला मिळतात. ज्यांना 'जाटू तंवर' नावाने ओळखले जाते. मेवाड़च्या सलुंबर ठिकाणच्या राजाने तंवर राजपूतांच्या हातून युद्धात ज्या मुण्डकटी आणि सिरकटी केल्या, त्या बदल्यात तंवरांना अनेक गावे जहागीरीमध्ये दिली गेली. त्या गावापैकी बोरज, तंवरान, सलुम्बर अशी काही तंवरांच्या जहागीरीतील गावे आहेत.
काही तोमर/तंवर राजपूतांनी दुसर्या जातीतील स्त्रिया ठेवल्याने, त्यांच्या संबंधातून तोमर वंश हा जाट, गूजर आणि अहीर अशा जातीत सुद्धा विभागाला गेला. जाट लोकात असे अनेक उप आडनावे आहेत, जे की स्वतःला तोमर/तंवर मानीत आहेत.
यामध्ये पिलानिया, नैन, मल्लन, लाम्बा, खटगर, खरब, ढंड, भादो, खरवाल, सोखिरा, रोनिल, सकन, बेरवाल आणि नारू अशा आडनावाचा समावेश आहे. हे लोक पूर्वी तोमर वा तंवर उप आडनाव वापरत नव्हते. मात्र यांच्यातील बहुतांश लोक स्वतःचे गोत्र आता तोमर वा तंवर लावू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील बड़ौत भागातील सलखलेन् जाट सुद्धा स्वतःला सलखलेन् तोमर यांचे वंशज सांगताना दिसत आहेत. हे लोक स्वतःला अनंगपाल तोमर यांच्या वंशातील असल्याचे सांगत असून आता ते स्वतःला तोमर/तंवर म्हणवून घेवू लागले आहेत.
गुजर लोकात सुद्धा तोमर राजपूतांचे अवशेष बघायला मिळतात. खटाना गूजर हे स्वतःला तोमर/तंवर राजपूतांमधून निर्माण झाल्याचे मानत आहेत. तर ग्वाल्हेर जवळ टोंगर गूजर आहेत, जे स्वतःला ग्वाल्हेरचा राजा मान सिंह तोमर यांची गूजरी राणी मृगनयनी हिचे वंशज मानतात. ज्यांना गूजरी (ठेवलेली) मातेची संतान असल्या कारणाने राजपूतांनी स्वीकार केले नव्हते.
दक्षिणी दिल्लीत सुद्धा तंवर गूजर यांची गावे आहेत. मुस्लिम शासनकाळात जेव्हा तोमर/ तंवर राजपूत दिल्लीमधून निष्काषित होऊन इतरत्र राज्य करण्यासाठी गेले मात्र काही तोमर राजपूतांनी गूजर बनून मुस्लिम राजवटीच्या अधीन राहणे स्वीकार केले. ते हे आजचे दिल्लीतील तंवर-गुजर आहेत. हरियाणा मधील अहिर मध्ये सुद्धा दयार गोत्र पाहायला मिळते. जे स्वतःला तोमर/तंवर राजपूत वंशातून निघालेले मानतात.
*दिल्लीतील तोमर/तंवर राजे
- - - - - - - - - - -
दिल्लीतील तंवर(तोमर) राजे
(736-1193 ई)
अनंगपाल तोमर (प्रथम)
(736-754 ई)-
अनंगपाल तोमर हे दिल्लीचे तंवर/तोवर वंशातील संस्थापक राजा होते. ज्यांना बीलनदेव, जाऊल अशा अनेक नावाने ओळखले जात होते.
राजा वासुदेव तंवर
(754-773)
राजा गंगदेव तंवर
(773-794)
राजा पृथ्वीमल तंवर
(794-814)
राजा जयदेव तंवर
(814-834)
राजा नरपाल तंवर
(834-849)
राजा उदयपाल तंवर
(849-875)
राजा आपृच्छदेव तंवर
(875-897)
राजा पीपलराजदेव तंवर
(897-919)
राज रघुपाल तंवर
(919-940)
राजा तिल्हणपाल तंवर
(940-961)
राजा गोपाल देव तंवर
(961-979)-
यांच्या काळात साम्भर येथील राजा सिंहराज आणि लवणखेडा येथील (तोमर राजाचे) मंडलिक राजा सलवण यांच्यात युद्ध झाले. या युध्दात सलवण मारला गेला. त्यानंतर दिल्ली येथील राजा गोपाल देव तोमर याने सिंहराजवर आक्रमण करून त्याला युद्धात कापून काढले.
सुलक्षणपाल तोमर
(979-1005)
जयपालदेव तंवर
(1005-1021)
कुमारपाल तंवर
(1021-1051)
लियाअनगपाल द्वितीय (1051-1081)
तेजपाल प्रथम (1081-1105)
महिपाल
(1105-1130)
विजयपाल
(1130-1151)
मदनपाल अथवा अनंगपाल तृतीय
(1151-1167)
अनंगपाल तृतीय यांच्या काळातील अजमेर येथील प्रतापी शासक विग्रहराज चौहान उर्फ़ बीसलदेव यांनी दिल्ली राज्यावर आक्रमण करून आपला अधिकार जमवला आणि तह करून मदनपाल तोमर यालाच दिल्लीचा राजा र