19/06/2023
मिरगाचे नखीतर(मृग नक्षत्र )अर्धे झाले तरी अजून पावसाचा पत्ता नाही पूर्वीचे लोक सांगत असत मिरग ( मृग )हे नखीतर उन्हाळ्यामध्ये गणती असते. कदाचित तसंच असावं मृगामध्ये पेरण्या झालेल्या या उत्पन्नाच्या दृष्टीने चांगल्या असतात पण कधी कधी वेळेवर पाऊस न झाल्यामुळे सुद्धा पेरण्या लांबू शकतात आणि हे आजचे चित्र बघता तसंच काहीतरी म्हणावसं वाटतं येत्या 25 तारखेपासून पुढे मान्सूनचा पाऊस सांगितलेला आहे पण पडेपर्यंत काही नक्की नाही जवळपास सर्वच शेतकरी बंधूंचे शेतीतली महत्त्वाची असे सर्वच कामे आटोपलेली आहेत आणि सध्या तो चातकाप्रमाणे पावसाच्या प्रतीक्षेत आहे. थोडाही आभाळ आलं तरी त्याची मान आपोआप वरच्या दिशेने जाते आणि वरूण राजाला मनामध्ये विनंती करतो की आता तरी पाऊस येऊ दे.......
मी ९ जून रोजी मी कापसाचे दोन बॅग ची लागवड केलेली होती आज तिला दहा दिवस कम्प्लीट झालेले आहेत चांगल्या पद्धतीमध्ये उगवण शक्ती आहे असं मला तरी वाटते पाणी सरी असल्यामुळे फार भोगत(मुरणे) नाही असं जर चित्र असेल पाण्याचं तर मात्र एक-दोन दिवसांमध्ये कापसाला ड्रीप करणे आवश्यक आहे आणि ते मी करणार आहे.
हळदीच्या एका खोडव्याला ड्रीप टाकून झालेला आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्या बेडला विहिरीचे पाणी देणार आहे. त्यानंतर चार-पाच दिवसानंतर पाऊस नाही पडला तरीही बेडवर हळद लागवडीचा विचार डोक्यामध्ये आहे सध्या तरी कॅनलला(इसापूर प्रकल्प कालवा) पाणी आल्यामुळे विहिरीच्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे त्यामुळे कापूस आणि हळद या दोन्ही पिकाला पुरेल एवढं पाणी विहिरीमध्ये आहे ड्रीप टाकल्यानंतर कापसाला फार पाणी लागत नाही .फार फार झालं तर अर्धा ते पाऊण तासांमध्ये कापूस चांगल्या प्रकारे भिजतो उर्वरित चा टाईम हा हळदीच्या बेडला काढता येतो असं सर्व डोक्यामध्ये नियोजन आहे पण या आठ दिवसांच्या दरम्यान एखादा चांगला पाऊस झाला तर मात्र सोन्याहून पिवळा होईल..... पण शेवटी निसर्ग आहे त्याच्यानुसार आपल्याला वागाव लागत आपल्यानुसार निसर्ग चालत नाही हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.
कापूस, हळद, सोयाबीन या पिकांचे खत नियोजन आणि फवारणीचे नियोजन हे माझ्याकडे लेखी स्वरूपामध्ये असल्यामुळे मला हे सर्व नियोजन करण्यासाठी फार वेळ लागणार नाही याची खात्री आहे कापूस हे यापूर्वी मी एका बॅगला 14 क्विंटल पर्यंत काढलेला आहे तसं त्याचं नियोजनही होतं त्याच नियोजनानुसार यावर्षी करण्याचा डोक्यामध्ये आहे पण बघूत.... आपलं नियोजन असलं तरीही निसर्गाच्या नियोजनानुसार मजूरदारांच्या, नियोजनानुसार सर्व गोष्टी कराव्या लागतात.......