19/04/2024
*महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ*
*_ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ_*
अमरावती, दि.१९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मंगळवार दि. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी कळविले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आदी योजना राबविण्यात येतात.
सन 2023-24 या वर्षाअखेर महाडीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज प्रलंबित असल्याचे डॅशबोर्डवरील स्थितीवरून दिसून येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परिक्षा फी(फ्रीशिप) या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी कमी झालेली आहे.
महाडीबीटी पोर्टलवर विविध कारणास्तव अद्यापही अर्ज प्रलंबित असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्रे परिपूर्ण नसणे, संबंधित महाविद्यालयाची शुल्क रचना निश्चित नसणे, संबंधित अभ्यासक्रमास मान्यता प्रदान नसणे, विद्यापीठाने इतर शुल्क मंजुरीकरिता उशिराने महाआयटी कडे पाठविणे व त्या शुल्कास महाआयटी कडून उशिराने मान्यता प्रदान करणे इ.बाबींचा/ त्रुटींचा प्रामुख्याने समावेश आहे.
सन 2023-24 या वर्षाकरिता विविध स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या व अनुषंगीक अडचणींना लक्षात घेता महाडीबीटी पोर्टलवर सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवरील होम पेजवर सुध्दा मुदतवाढीबाबत सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अर्ज विहित वेळेत निकाली न काढल्यास, असे अर्ज महाडीबीटी प्रणालीमधून कायमस्वरूपी रद्दबातल (Auto-Reject) होतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच महाडीबीटी पोर्टलवर चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता ओंनलाईन अर्जाची नोंदणी दि 1 जून, 2024 पासून सुरु होणार आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी त्रुटींचे निराकरण करुन शिष्यवृत्तींचे प्रलंबित अर्ज विहित मुदतीत निकाली काढावे, अशा सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत.
विहित मुदतीत महाडीबीटी प्रणालीवरील पात्र अर्ज निकाली न काढल्यास किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0000
शिष्यवृत्ती/ सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड असणे गरजेचे आहे. तरी काही वि...