03/07/2025
एका सामान्य माणसाचे, विलक्षण आत्मचरित्र .!!
कॅलिडोस्कोप…!! भाग बारावा
लेखक: राजीव शांताराम थत्ते.
बी.फार्म.(युडीसीटी), एम.एम.एस.(जमानलाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज)
भाग बारावा
बदलापूरची फॅक्टरी
बदलापूरला एम.आय.डी.सी.मध्ये फॅक्टरी काढण्याआधी घरी एक प्रसंग घडला. मी जेव्हा फॅक्टरी काढायची असे घरच्यांना सांगितले. त्यावेळी घरी वातावरण तंग झाले.
‘माझे प्रोव्हीडंट फंड आणि ग्रॅच्युइटी जी मला रिटायर होण्याच्या वेळी मिळाली ती तू धंद्यात उडवून टाकणार आणि आम्ही आई वडिलांनी मग भिक मागत दारोदार फिरायचे असा तुझा विचार दिसतो आहे मला..’ बाबा मला म्हणाले.
मला ढसढसा रडायला आले.
‘बाबा तुमच्या कडून मला एक पैसाही नको, फक्त आशीर्वाद हवेत. मी पैसे कुठूनही आणेन पण तुमच्या पैशांना हात लावणार नाही. तुम्ही याची खात्री बाळगा.’ मी बाबांना सांगितले.
त्यादिवशी माझ्या नियोजित प्रकल्पाची माहिती थोडक्यात देणारी पोस्टकार्ड मी चौदा नातेवाईक व मित्रांना पाठवली. कै. सौ. मैनाबाई रानडे, कै. श्री. भालचंद्र खाडिलकर, माझे सासरे कै. श्री. केशव पाटणकर, माझा मित्र प्रा. मोहिनीराज सुतावणी व डॉ. विजय पेठे, माझा भाऊ अनिल व सुधीर इत्यादींनी मला पासष्ट हजार दिले. त्या पैशांवर १५% दर साल व्याज द्यायचे मी सगळ्यांना कबूल केले होते. तसे मी त्यांना मी वेळोवेळी दिलेही.
बाबांनी माझी पैसे उभे करण्याची जिद्द पाहून स्वतः पाच हजार रुपये दिले.
या सगळ्यांनी मला विश्वास ठेवून सहाय्य केले त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. त्यावेळी माझ्याकडे एक पैसाही स्वतःचा नव्हता. सर्वांच्या कर्जावर मी धंदा उभा करू शकलो. आज त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो.
*****
माझा विवाह
मी एम.एम.एस. झालो तरी बदलापूरचा कारखाना अजून चालू झाला नव्हता. ५ जुलै, १९८१ला मी संध्याशी विलेपार्ल्याला रजिस्टर लग्न केले. कै. श्री. श्रीराम खरे, माझा मित्र उदय कुलकर्णी हे दोघे साक्षीदार होते. विवाहाला रजिस्टर म्हणून श्री. खान आले होते. माझ्या भावाच्या गोवंडी येथे झालेल्या लग्नालाही तेच श्री. खान आले होते. आम्ही थत्ते मंडळींनी ‘आम्ही खोट्या रजिस्टर’ला आणले, असे संध्याच्या घरच्यांना सांगितले.
मी सासरयाकडून लग्नाला काही घेतले नसले तरी लग्नाला आलेल्या पाहुण्यांकडून मात्र आहेर स्विकारला.
आम्हाला एकूण आहेर एकशे चार रुपये मिळाला. आणि त्याच्यातही माझ्या जमनालाल बजाज मधल्या प्रा. तेंडुलकर सरांनी पंचवीस रुपये दिलेले धरले होते. त्यावेळी पैशांची किंमत किती जास्त होती, आणि त्याहि पेक्षा सगळ्यांचे जे प्रेम आम्हाला मिळाले ते ‘अनमोल’ होते..!!
*****
लाच देणाऱ्यांसाठी सारे काही
बदलापूरच्या कारखान्याच्या उभारणीसाठी मी ‘स्वच्छ’ पणे काम करायचे ठरवल्याने फारच अडचणी येत होत्या. एम.एस.एफ.सी.ने कर्ज मंजूर करूनही त्याच्या डीसबर्समेंट मध्ये अडचणी येत होत्या. त्यावेळी देखील प्रोजेक्टच्या एकूण कॉस्टच्या दहा टक्के ही रक्कम विविध परवाने, परवानग्या, रजिस्ट्रेशनस, लोन्स मिळणे, सबसिडी मिळणे या सगळ्यांसाठी ‘लाच’ म्हणून द्यावी लागायची. मला हे मान्य नव्हते.
‘तुम्ही मला लाच देण्यासाठी कर्ज द्या. मी ते फेडेन. पण आज लाच द्यायला माझ्याकडे पैसेच नाहीत.’ मी श्री. एस.एन. देसाई नावाच्या इंडस्ट्रीजच्या राज्यमंत्र्यांना सांगितले. तेव्हा त्या मंत्र्यांनी डोक्याला हात लावला होता, हे आजही मला आठवते.
त्यावेळी अंतुल्यांचे सिमेंट प्रकरण जोरात होते. सिमेंटच्या गोणीमागे लाच म्हणून पाच दहा रुपये मागितले जात. सिमेंटची एक गोणी पन्नास रुपयांना मिळायची. म्हणजेच १० ते २०% लाच मागितली जायची.
मला सिमेंट, परवाना मिळाल्याशिवाय मिळणे शक्य नव्हते. परवान्यासाठी ५-१० रुपये सिमेंटच्या गोणीमागे लाच देणे मला शक्य नव्हते. याला मार्ग काय?
एक दिवशी मी मंत्रालयात इंडस्ट्रीज सचिव श्री. मोहनी साहेबाकडे गेलो. अकरा वाजले असतील. मोहनी साहेब कुठल्यातरी मिटींगला निघाले होते. मी त्यांना नमस्कार केला. ते मिटींगला रवाना झाले. एक वाजता ते परत आले. मी अजूनही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून होतो. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि आत गेले. आतून पुन्हा बाहेर आले आणि दुसऱ्या मिटींगला निघून गेले. मी तिथेच बसून राहिलो. पाच वाजता ते परत आले तरी मी तिथेच बाहेर उभा होतो.
‘माझ्याकडे काही काम आहे का?’ मोहनीने विचारले.
‘मी एक मिनिट आपल्या केबिनमध्ये येऊ काय?’ मी नम्र पणे विचारले.
‘या..’ मोह्नींनी उत्तर दिले.
मी आत गेलो आणि मोहनीना सिमेंटची सगळी कहाणी सांगितली.
‘गोणीमागे मी १० रुपये लाच दिली असती पण मला त्यासाठी कोणी कर्ज देईल का हो..’ मी कहाणीचा शेवट केला.
‘तुम्ही आता घरी जा. उद्या सकाळी अकरा वाजता आमचा इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचा इन्स्पेक्टर तुमच्या घरी बदलापूरला सिमेंटच्या चारशे गोण्यांचा परमिट घेऊन पोचेल. नाही पोचला तर मला फोन करा. हा माझा फोन क्रमांक…’ मोहनीनी मला आश्वासन दिले.
दुसऱ्या दिवशी बरोबर अकराच्या ठोक्याला इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचा इन्स्पेक्टर चारशे गोण्यांचा परमिट घेऊन घराच्या दरवाज्यात उभा होता. हा तोच इन्स्पेक्टर होता जो माझ्याकडे लाच मागत होता.
मी परवाना ताब्यात घेतला. परवान्याच्या कोपीवर सही करून दिली.
‘थत्ते साहेब मला सांगायचे नाही का आमचे सेक्रेटरी साहेब तुमचे सख्खे मामा लागतात म्हणून. आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या माणसांना कधीच त्रास देत नाही.’
मोहिनीनी माझ्यावर उपकार केले होते. एक पैशाचीही लाच न देता मला ४०० गोण्या सिमेंट मिळाले होते. आणि तेही अन्तुल्यांच्या काळात..!!
लग्नाच्या आदल्या दिवशी २०० गोणी सिमेंटची डिलिव्हरी घ्यायची होती.
‘लग्नाच्या एक दिवस आधी तू घरच्या बाहेर असे रिस्क असलेले काम करण्यासाठी पडू नकोस. लग्नाच्या आदल्या दिवशी घरीच राहावे.’ घरच्यांनी मला सांगितले.
मी ते मानणार कसा?
मी लग्नाच्या एक दिवस आधी २०० गोण्या सिमेंटची डिलिव्हरी घेतली. त्यातही मला मुंबईहून बदलापूरला जाताना सिमेंटच्या गोणींची चोरी होईल असे वाटत होते. त्याचमुळे ड्रायव्हरच्या केबिनमध्ये क्लीनर, तर मी ट्रकवर सिमेंटच्या गोण्यांवर लक्ष ठेवत बसून मी, असा उन्हात प्रवास केला. सिमेंटच्या गोण्या बदलापूरच्या प्लॉटवर उतरवल्या आणि संध्याकाळी सहा वाजता रिकाम्या ट्रक मध्ये बसूनच मी परत आलो.
आज सदुसष्ठ वर्षांचा झालो असताना मी हे काम याच पद्धतीने करेन?
अजिबात नाही.
मला कोणी, कोणते काम आणि कसे करायचे ते आता समजले.
वयाच्या एकवीस- बावीस वर्षांचा असताना ते तसे शक्यही नव्हते.
मी त्यावेळी अनिलचे ‘पत्रकार’चे कार्ड घेऊन अनेकांना भेटायचो. अनिललाही, ‘आपले बंधू आले होते’ असे कोणी जर सांगितले, तर तोही ‘मला राजीव म्हणाला होता. काय शक्य असेल ती मदत त्याला करा’ असे सांगायचा. खरे तर मी त्याचे कार्ड कशासाठी आणि कोणाला दिले, हे त्यालाही माहिती नसायचे. आणि तो मला कधी त्या विषयी विचारतही नसे.
एम.एस.एफ.सी.त श्री. श्रीराम खरे हे ‘जन संपर्क अधिकारी’ म्हणून होते. त्यांचे, अनिलचे आणि त्यांचे माझेही संबध चांगले होते. एम.एस.एफ.सी.त कर्ज मिळेनासे झाले कि अखेरचा उपाय म्हणून मी त्यांना सांगत असे आणि ते चेअरमनला सांगून रिजनल मेनेजर श्री. यादवांना फोन करायचे आणि माझे जेन्युईन मिळणारे कर्ज वितरीत व्हायचे.
एकदा मला श्री. यादवांनी ‘तुम्ही चेअरमन कडे एवढी छोटी कामे घेऊन का जाता. माझ्या ऑफिसचा स्टाफ आहेना तुमच्या मदतीला.’ म्हणून सांगितले.
‘चार महिने झाले मी सगळी कागदपत्रे दिली आहेत, मग मला लोन का मिळत नाही हे तुमच्या स्टाफला कधी तुम्ही विचारले का? त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही. म्हणून माझ्या प्रपोजलला ‘बाजूला’ ठेवले जाते, मग मी तुमच्या चेअरमन कडे जातो. याला काही मार्ग तुम्ही सुचवू शकता का?’ मी यादवांना विचारले.
यादवांचे ऑफिस त्यावेळी कुलाब्याला होते. बदलापूरहून कुलाब्याला पोचायला तीन तास जायला आणि तीन तास पुन्हा परतायला लागायचे. दोन लाखांच्या लोनसाठी मी शंभराहून अधिक वेळा त्याच्या ऑफिसला गेलो. सहाशे तास म्हणजे ७५ वर्किंग डेज मी घालवले. तेव्हा कुठे मला दोन लाखांचे कर्ज मिळाले.
हे मी १९८१-८२ मधले सांगतो.
हल्ली फायनान्शियल इंस्टीट्युटची, बँकांची काय परिस्थिती असेल. त्याची कल्पनाच केलेली बरी. आज दोन लाख कोटींची ‘नॉन पर्फोमिंग असेट्स’ बँकांत दिसतात. यात भ्रष्टाचाराचा १००% वाटा आहे, आणि त्याला जबाबदार उद्योजक आणि अधिकारी ही आहेत हेच सत्य आहे.
ही एम.एस.एफ.सी. अशाच कर्मचाऱ्यांमुळे पुढे ‘बुडली’ हे वेगळे सांगायला नको.
असो.
बदलापूरच्या फॅक्टरीची बिल्डींग २००० चौरस फुट बांधून होत आली होती. लिक्विडस, सिरप सेक्शन आणि कॅप्सूल सेक्शन असे दोन विभाग फॅक्टरीत होते. सगळी मशिनरी आणली. जमीन रु. २५,०००, बिल्डींग रु. २,००,०००, आणि मशिनरी रु. १,५०,०००, असा एकूण तीन लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा प्रोजेक्ट उभा राहिला.