02/06/2022
सुपरफास्ट ‘डेक्कन क्वीन’ कल्याणला का थांबत नाही? कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!
दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही महाराष्ट्राच्या मुंबई व पुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक खास रेल्वेगाडी. मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी या गाडीचे एक विशेष स्थान आहे. ही गाडी असंख्य चाकरमान्यांसाठी रोजच्या प्रवासाचे साधन आहे.
खरं तर मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक म्हणजे कल्याण. कल्याण रेल्वे स्थानकाची प्रवासीसंख्याही जास्त आहे. येथून अनेक जण दररोज वेगवेगळ्या मार्गांवर प्रवास करतात.
कल्याण स्थानकात दररोज लांब पल्ल्याच्या तसेच उपनगरी अशा एकूण ९०० गाड्या थांबतात.
त्यामुळे कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबते. ठाण्यापलीकडे राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी पुण्याला जाणाऱ्या गाड्यांनासुद्धा कल्याण थांबा निश्चितच देण्यात आला आहे. पण डेक्कन क्वीन मात्र याला अपवाद आहे.
कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे, पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले.
कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले.
रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले.
आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला.
ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत.