18/08/2024
प्रेषित महंमद पैगंबर यांच्या लग्नाबद्दल साने गुरुजी लिहितात,
थोरांच्या लग्नात महान अर्थ असतात. जणू ते पती बनून पालक होतात. सांभाळकर्ते होतात. ते तुम्हा आम्हांस जमणार नाही. सतरा वर्षांच्या मुलीजवळ निग्रही मुहंमदच लग्न लावू शकतील. तुम्ही आम्ही याचे अनुकरण करायचे नसते. तसे करायला पैगंबरांनी सांगितले नाही. सतरा वर्षांच्या या मुलीखेरीज बाकीच्या सर्व बायका विधवा होत्या. मुहंमदांनी सर्वांचा सांभाळ केला. या आपल्या भार्यांमार्फत स्त्रियांत ते धर्मप्रचारही करीत. स्त्रियांत एरवी विचार कसे जाणार?
१९३२ साली धुळे तुरुंगात आम्ही होतो. कोणी तरी पू. विनोबाजीना प्रश्न केला, "मुहंमदांनी किती लग्ने केली? सतरा वर्षांच्या मुलीजवळही.”
विनोबाजी गंभीर झाले. डोळे चमकले.
“थोरांच्या लग्नाचा पुष्कळ वेळा पालक होणे एवढाच अर्थ होतो. मुहंमदांना का तुम्ही भोगी समजता? ते असे असते तर दुनिया त्याना जिंकता अली नसती. गिबन, कालाईल वगैरे महान पंडितांनी त्यांची स्तुतिस्तोत्रे गायिली नसती. पैगंबर महापुरूष होते. थोर विभूती होते. त्यांचे चरित्र डोळ्यासमोर आले तर माझी समाधी लागायची पाळी येते !"
विनोबाजींचे ते कातर सकंप भावभक्तीने भरलेले शब्द माझ्या कानांत घुमत आहेत. पैगंबरांच्या चरित्राने समाधी लागेल ? होय, खरेच लागेल ! ते दिव्य, भव्य जीवन आहे, अलोट श्रद्धेचे, त्यागोचे, क्षमेचे, धैर्याचे संस्फूर्त जीवन आहे. प्रेमळ, निरहंकारी जीवन ! गुलामाने जेवायला बोलावले तरी जात. रस्त्यात कोणी भेटला तर हातात हात देत आणि त्याने आपला हात काढून घेतल्यावर आपला हात मागे घेत, परंतु ते आपण होऊन प्रथम आपला हात आधी मागे घेत नसत. त्यांचा हाता अत्यंत उदार होता. त्यांची वाणी अती मधूर होती. त्यांच्याकडे जे जे पाहत त्यांचे हृदय पूज्यतेने भरून येई. जे जवळ येत ते प्रेम करू लागत. लोक वर्णन करताना म्हणत, "असा पूर्वी कधी पाहिला नाही, पुढे असा दिसणार नाही !” किती विशुद्ध, प्रेमळ, परंतु शौर्यधैर्याने संपन्न ! अशा विभूतीविषयी पूज्यभावच नाही तर प्रेमही वाटते, वाटते, याच्या पायाही पडावे व याच्या गळा मिठीही मारावी अरब लेखकांना, अब्दुल्लाच्या या मुलाच्या गुणांचे वर्णन करताना धन्यता वाटते. हृदयाचे बुद्धीचे हे थोर गुण स्तविताना परम कृतार्थता व अभिमानही वाटतो.
प्रतिष्ठित व मोठे असत त्यांच्याजवळ ते सभ्यतेने वागत. गरिबांजवळ प्रेमाने वागत. आढ्यताखोराजवळ धीरोदात्तपणे वागत. सारेच अखेर त्याना स्तवू लागले. हृदयातील त्यांची उदारता मुखावर फुललेली असे. त्याना अक्षरज्ञान नव्हते; परंतु निसर्गाचा महान ग्रंथ त्यानी नीट अभ्यासिला होता. त्यांचे मन वाढते होते, विशाल होते. विश्वात्म्याजवळच्या समरसतेने त्यांचा आत्मा जागृत व उदात्त झालेला होता. पंडित वा अज्ञानी दोघांवरही त्यांचा प्रभाव पडे आणि त्यांच्या तोंडावर एक प्रकारची भव्य दिव्यता दिसे. प्रतिभाशाली विभूतिमत्व जणू त्यांच्या अंतर्बाह्य जीवनातून सरवत होते.
इतरांना ते संस्फूर्त करीत. विभूतिमत्त्वाचे हे लक्षण आहे. नम्रता व दयाळूपणा, सहनशीलता व स्वसुखनिरपेक्षता, औदार्य व निरहंकारवृत्ती त्यांच्या वर्तनात भरलेली होती. सर्वांचे प्रेम ते आकर्षून घेत. जेवायला बसताना ईश्वराचे आभार मानल्याशिवाय, त्याची कृपा भाकल्याशिवाय राहत नसत. आभार मानल्याशिवाय भोजन करून उठत नसतः दिवसा जेव्हा प्रार्थनेत ( नमाज) मग्न नसतील तेव्हा पाहुण्यांच्या भेटी, मुलाखती घेत. सार्वजनिक कामकाज बघत.
संदर्भ:
इस्लामी संस्कृती | साने गुरूजी | पृ. ११९