23/09/2022
*बेळगावातून गोव्याला भाजीपाला नेण्यास बंदचा निर्णय*
बेळगाव :
बेळगावातून गोवा सरकार व तेथील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरविला जातो. मात्र, गोवा सरकार बेळगावातून होणारी आवक बंद करून भाजीपाला स्वतःच पिकविण्याच्या विचारात आहे. बेळगावातून होणारी भाजीपाला आवक बंद करणार असल्याचे सूतोवाच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदसावंत यांनी केले आहे. तसे झाल्यास बेळगावातील अनेक व्यापारी व शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गोव्यात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक शेतीवरील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.
गोवा हे स्वयंपूर्ण राज्य बनण्याची गरज आहे. शेजारील राज्यांतून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून न राहता भाजीपाला, फळे, दूध आदींचे उत्पादन राज्यातच करणे आवश्यक आहे. राज्य फलोत्पादन महामंडळ रोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे खरेदी करुन गोव्यात अनुदानित दराने विकते. त्यात बेळगावातून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण अधिक आहे. आगामी काळात भाजीपाल्याचे स्थानिक उत्पादन वाढविण्यासाठी महामंडळ बेळगावातून होणारी भाजीपाला खरेदी बंद करण्याची शक्यता आहे. जे काही हवे ते गोव्यात तयार केले पाहिजे. किमान निम्मे उत्पादन गोव्यात झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक भाजीपाला उत्पादन वाढविले तर फलोत्पादन महामंडळ शेतकऱ्यांना चांगला दर देईल. काही दिवसांत महामंडळ इतर राज्यातून भाजीपाला आयात करणे बंद करेल आणि केवळ स्थानिक पातळीवर उत्पादित भाज्या खरेदी करेल.
राज्याला रोज 4.5 लाख लिटर दुधाची गरज आहे. मात्र, केवळ एक लाख लिटर दुधाचे उत्पादन गोव्यात होते. याचा अर्थ आम्ही बाहेरून 3.5 लाख लिटर दूध मागवितो, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
गरजेइतके उत्पादन अशक्य
बेळगावपासून गोवा अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर आहे. बेळगावातून रोज सुमारे 50 गाड्या ताजा भाजीपाला गोव्याला जातो. प्रत्येकी 8 ते 10 टनांचा समावेश करता येईल. मात्र, गोव्याने स्वतः भाजीपाला उत्पादन सुरू केल्यास बेळगावच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. गोव्यात यापूर्वीही स्वतः भाजीपाला तयार करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, ते प्रयत्न अपयशी झाले होते. तेथील वातावरण व मातीचा विचार करता आपल्या गरजेएवढा भाजीपाला गोवा स्वतः तयार करणे अशक्य असल्याचे मत येथील व्यापाऱ्यांतून व्यक्त होत आहे.