20/07/2022
∆∆∆ साप्ताहिक नाशिक परिसराच्या 12व्या वर्धापन दिन तपपूर्ती निमित्त
ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात रंगला विद्यार्थी गुणगौरव सोहळा ∆∆∆∆
नाशिकरोड -आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव करतांना खूप आनंद होत आहे. आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थी दशेतून गेलो आहोत. मात्र विद्यार्थी दशेतच आध्यात्मिक मार्ग पत्करल्यामुळे आम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलो आहोत. मात्र आज जर बघितले तर समाजातील वातावरण खूप नकारात्मक व प्रदूषित झालेले दिसते. कॉलेजमधील विद्यार्थ्यानंकडून खूप चुकीचे व खराब कर्म होऊन जातात. अशा पार्श्वभूमीवर समाजाचे वातावरण साफ करण्याची खूप आवश्यकता आहे. यासाठी विद्यार्थी दशेतच व्हॅल्यू एज्युकेशनची किंवा आध्यात्मिक शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. अध्यात्म व भौतिकतेचा समतोल साधूनच सुखी व उज्वल जीवन बनू शकते.
आज मानसिक ताण तणावामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. मेडिकल सायन्स ने सुद्धा मान्य केले आहे की 85 टक्के आजार हे सायकोसोमॅटिक अर्थात मनाच्या कमजोरीतून उद्भवतात. यामुळे मनाला सुदृढ करण्यासाठी राजयोग मेडिटेशन खूप सहाय्यक ठरतो. जीवन सुखी शांती आनंदी व एकाग्र करायचे असल्यास प्रत्येकाने आध्यात्मिक शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.
साप्ताहिक नाशिक परिसराच्या १२व्या वर्धापन दिन तपपूर्ती निमित्त आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रसंगी दीदीजी बोलत होत्या. दिनांक 17 जुलै रोजी नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नगरसेवक दिनकर आढाव, परफेक्ट क्लासेसचे नितीन अमेसर, आयडियल क्लासेस चे विनीत पिंगळे व निखिल कुलकर्णी, मोटिवेशनल स्पीकर शंतनु खानवेलकर, ब्रह्माकुमारी शक्ती दीदी ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, लेखिका अलका दराडे, हेल्पिंग ह्यूमन फाउंडेशनच्या संगिता महाजन साप्ताहिक नासिक परिसर चे संचालक प्रकाश बोरसे, संपादक दिलीप बोरसे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदनगर येथून विशेष उपस्थित प्रमुख वक्ता व मोटिवेशनल स्पीकर शंतनु खानवेलकर यांनी आपल्या ओजस्वी व स्फूर्तीदायक व्याख्यानातून विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी अधिकाधिक क्रियाशील व कल्पक कसे राहावे याची त्रिसूत्री सांगितली. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाताना आपल्याला मन मेंदू मनगट ह्यावर काम करावं लागेल. मन एकाग्र आणि कायम संयमी राहण्यासाठी मेडीटेशन ध्यान साधना, मेंदू कायम तल्लख राहण्यासाठी नियमित सतत काही न काही नवीन गोष्ट शिकत राहणे, तर मनगट म्हणजे शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम अशी त्रिसूत्री आवश्यक असल्याचे खानवेलकर यांनी स्पष्ट केले.
विविध उदाहरणे व मूल्ययुक्त गोष्टी कथेतून केले.
चांगल्या सवयी संस्कारांमुळे एखाद्याला नोकरी सुद्धा विना इंटरव्यू मिळू शकते याचे उदाहरण गोष्टी रूपाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित दिनकर आढाव यांनी सांगितले.
परफेक्ट क्लासेस चे नितीन अमेसर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मनोकामना व्यक्त करत साप्ताहिक नाशिक परिसर ला ही शुभेच्छा व्यक्त केल्या.
साप्ताहिक नाशिक परिसर ची उत्तर उत्तर अशीच प्रगती होत जाऊन नाशिक परिसराचा चहुबाजूंनी विकास होवो अशा शुभेच्छा ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी व्यक्त केल्या.
साप्ताहिक नाशिक परिसर तर्फे वर्धापन दिनानिमित्त नाशिक मधील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक दर्शन वानखेडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराची घोषणा व निवड करण्यासाची कामगिरी आयडियल क्लासेस चे विनित पिंगळे व निखिल कुलकर्णी यांनी चोख बजावली.
कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम व द्वितीय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना साप्ताहिक नाशिक परिसर च्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व येथील प्रसिद्ध सोनी गिफ्ट या गृह उपयोगी वस्तूंचे दालन व हेल्पिंग ह्यूमन फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयोगी अशा भेट वस्तूंचे वितरण करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपादक दिलीप बोरसे यांनी प्रास्ताविकात साप्ताहिक नाशिक परिसराच्या वाटचालीविषयी सांगत साप्ताहिक नाशिक परिसराचा विकास हा ब्रह्माकुमारी संस्थेत मिळालेले अध्यात्मिक शिक्षण व येथील दीदींच्या मार्गदर्शनामुळेच झालेला आहे असे प्रतिपादित केले. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी यांनी केले.
कु. स्वरा मोरे ह्या चिमुकली ने, आयो रे शुभ दिन आयो रे… या राजस्थानी गीतावर मनमोहक नृत्य केले. उपस्थितांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व पालक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी संस्थेचे सेवाधारी व साप्ताहिक नाशिक परिसर चे कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम केले.