15/02/2022
इतिहासात 'जर' , 'तर' या शब्दांना कोणतेही स्थान नसते, परंतु जर या महापुरुषाचा क्षय रोगामुळे (T.B.) 29 व्या वर्षी मृत्यू झाला नसता तर कदाचित इंग्रजांच्या पारतंत्र्यात भारत कधी गेलाही नसता.
१६ वर्षाचे असताना पेशवाईची जबाबदारी अंगी येऊन पडलेल्या माधवराव पेशव्यांनी स्वतःचा गृहकलह सोडवत मराठी दौलतीसाठी केलेल्या भराऱ्या उल्हसित करुन जातात. आपल्या २८ वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांनी मराठी सत्तेचा वचक पुन्हा एकदा दिल्लीवर बसवला. बारा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पानिपतच्या पराभवानंतर कोलमडलेल्या राज्याची पुन्हा उभारणी केली. पानिपतावर मराठी फौजांची बेसुमार कत्तल करणा-या रोहिल्यांचा आणि पठाणांचा संपूर्ण पराभव करून हे यश संपादन केलं आणि पानिपतचा पराजय धुवून काढला. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावसारखा सत्तेची लालसा असलेला चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासनव्यस्था निर्माण केली आणि अल्पावधीतच मराठयांचा दरारा पुन्हा एकदा सर्वत्र निर्माण केला.
माधवरावांचा मृत्यू हे मराठा साम्राज्य आणि संपूर्ण भारतावर आलेले सर्वात मोठे संकट होय. जी हानी पानिपतच्या युद्धाने झाली नाही ती थोरल्या माधवरावांच्या अकाली मृत्यूमुळे मराठा साम्राज्याला झाली.
- Ritiksha Dhanaraj