24/12/2025
#बालपणीचाअनमोलठेवा
माझं बालपण खेडेगावातलं
आपण जिथे लहानाचे मोठे झालो असतो तिथलं खाणपान ,तिथली बोलीभाषा ,तिथल्या असंख्य आठवणी आपण कधीच विसरत नाही.
मला लहानपणी खाल्लेल्या पदार्थाची आठवण आली की मी तो पदार्थ बनवते आणि मस्त त्या पदार्थाचा आस्वाद घेते.
गावी सगळ्या भाज्या विकत आणून खाणे अस काही नसत
घरी जे उपलब्ध आहे तेच आई बनवायची.
आमची घरची परिस्थिती तशी साधारण होती एक काळ आम्ही असा पण बघितला आहे की तेल साखर नसायचं घरी तर तिखटावर पाणी घेवून भाकरीला लावून खाल्लेल आहे आम्ही म्हणून अन्नाचा अपमान कधीच करायचा नाही हे आम्ही लहानपणापासूनच शिकलो.
पदार्थात हेच पाहिजे तेच पाहिजे मग पदार्थ होतो ही शिकवण नाही..
आहे त्यात पदार्थ चविष्ट कसा करायचा हेच आईने शिकवल आम्हाला.
आणि खरंच माझं अस मोजून मापून आणि पदार्थाला हेच घालायच ते नाही घालायच अस माझं नाही आहे.
मी एकच पदार्थ खुप प्रकारे करून बघते.
साध्या वरणाचे आतापर्यंत मी कितीतरी प्रकार करून बघितले असेल
आणि खरंच गावी खिश्याला परवडणार अस जेवण बनवल्या जायच
म्हणजे पोळ्या नेहमी बनवल्या जायच्या नाही पाहुणे आले तर घरी पोळ्या बनायच्या नाहीतर भाकरीच असायच्या.
तेव्हा आईच्या मागे आम्ही कटकट करायचो की काय गं आई रोज तू भाकरीच करते पोळ्या नाही करत.
मग कधी कधी आई आमच्या साठी कणिक पीठ एकत्र करून कणकीपिठाची भाकर करायची.
कधी घरचे गहू ज्वारी संपल्यावर घरात असलेल्या तांदूळाचे चक्कीतुन दळून आणून आम्हाला त्याचे आयते करून द्यायची.
कधी घरी काही नसलं की घरी असलेले हरबरे भिजत घालून तव्यावर सातळून द्यायची
पण खरंच आईची लेकरांविषयीची माया ईतकी अफाट असते की ती घरात काही नसलं तरी लेकराला काहीतरी करून लेकराचं पोट भरणार
स्वतः काही खाणार नाही पण लेकरांना पहिले खावू घालणार.
खरंच आईसारखी निस्वार्थ माया करणारं जगात दुसरं कुणीच नाई.
पण खरंच आता कळत की घरची गृहिणी घरात उपलब्ध असेल त्यात काटकसर करून घराचा प्रपंच काहीही तक्रार न करता चालवत होती.
असो गावी असतांना आई जास्त करून बेसनाचे खुप वेगवेगळे प्रकार जास्त बनवायची म्हणजे मेथीचं बेसन, टोमॅटो घालून बनवलेल बेसन , पालकाचं बेसन ,पतलं बेसन, कधीतरी झुणका , कांद्याच्या पातीचा झुणका , कळण्याचं बोर घालून बनवलेलं बेसन असे बरेच प्रकार बनवायची.
बर्याचदा ताकातल्या भाज्या करायची
म्हणजे ताकातल बेसन , ताकातली चाकवताची भाजी ,ताकातली सोल्याची आमटी ,ताकातल्या मुगाच्या वड्या , कढीगोळे असे बरेच प्रकार असायचे.
वरणाचे प्रकार पण खुप असायचे फोडणीचं वरण , मेथीचं वरण, पालकाची डाळभाजी,चमकुर्याच्या पानांची डाळभाजी, मिसळाचं वरण असे प्रकार असायचे.
कधी कधी रात्रीच्या जेवणात वरणातले फळं, वांग्याच्या भाजीतले फळं, साध्या वरणाबरोबर ज्वारीच्या पीठाचे फळं ,खिचडी बेसन , ज्वारीच्या कण्या आणि डाळभाजी, उकडपेंडी , शेंगोळे, रव्याचा उपमा,सोजीचा उपमा , लापशी, गोड शेवळ्या, अस बरच काही बनवायची.
आईने बनवलेला मऊ लुसलुशीत उपमा तर ईतका भारी लागायचा की बस्स तसा उपमा आता बनतच नाही तो आईच्या हातचा उपमा खाऊन तर मन तृप्त होऊन जायच खरंच.
आईच्या हातच्या कोणत्याही पदार्थाची चव म्हणजे अमृतासारखीच खरंच आई आपल्या लेकरांना घरात काही नसल तरी काहीना ना काही तरी बनवुन द्यायची.
रोज भाजी काय करायची म्हणून आई बर्याचदा भाजल्या मिरच्यांच तिखट करून ठेवायची म्हणजे कुसला
ते तिखट आणि भाकर तर ईतकी जबरदस्त लागायची की बस्स.
कधी कांद्याची चटणी करायची
कधी पापड कांद्याची चटणी बनवायची कांद्याची चटणी व पापडाची चटणी पण अफलातून लागायची.
घरात स्वयंपाक करण्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध नसतांना पण पोरांच पोट भरणारी माझी आई अन्नपूर्णाच आहे खरंच ❣
आईला मी कोणताही पदार्थ मन लावून प्रेमाने करतांना बघितल आहे आणि तेच मी शिकली.
(आजकाल माझ्या पोस्टवर काही लोकं जेव्हा आम्ही ह्या पदार्थात हेच घालतो ते घालत नाही
याला हे अमकं नाव नाही ढमकं नाव आहे
काही पण सांगू नको.
वेगळ नाव आहे चांगल्या पद्धतीने सांगूच शकतो पण पदार्थाला फालतू म्हणणे हे कितपत योग्य आहे.
आम्ही याला आमटी म्हणतो काहीपण फालतू सांगू नको
ही फालतू रेसिपी सांगते
कांदा लसूण टोमॅटो आलं घातल्यावर वाद घालत असतात
तुझ्या पूर्वजांनी तरी अशी रेसिपी केली होती का
कढीत मोहरी हळद घालत नाही तेल घालत नाही अस जेव्हा म्हणतात ना तेव्हा या लोकांची खरंच किव येते
अरे ईथे प्रत्येक राज्यातली प्रत्येक गावातील ईतकंच काय तर प्रत्येक घरातील रेसिपी वेगळी असू शकते.
तुम्हाला एवढंच वाटत तर तुम्ही स्वतः तुमची रेसिपी तुम्ही काय म्हणता तशी पोस्ट करा पण दुसर्यांनी केलेल्या अन्नाला कधी नावं ठेवू नका कारण जे आपल्याला दोन वेळेच जेवण मिळत ते सगळ्यांच्या नशिबात असतं अस नाही म्हणून कधीच अन्नाला नावे ठेवू नका खरंच)
#विदर्भकन्यासोनलगांवकर मडगाव गोवा.💚❤