18/02/2025
लेख मोठा आहे पण खूप माहितीपूर्ण आहे...
नक्की वाचा...
*आंबा 'घाईचा' उदो उदो!!*
चारच दिवसांपूर्वी एका नामांकित वर्तमानपत्रांमध्ये बातमीवर नजर गेली आणि धक्काच बसला.
बातमी आहे यंदा आंब्याची पेटी कोकणातून ऑल रेडी मुंबई मार्केटमध्ये पोहोचल्याची आणि तिला तब्बल एकवीस हजार पाचशे रुपयाची किंमत मिळाल्याची भारी आहे ना?
आज हा लेख लिहायला मी बसलो आहे ती तारीख आहे 9 फेब्रुवारी, 2020.
आमच्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सेंद्रिय पद्धतीच्या आंबा बागेत आत्ता कुठे आंब्याच्या झाडांना मोहर आला आहे आणि फार क्वचितच एखाद्या झाडावर मोहोराबरोबरच आंब्याची बारीक कणी म्हणजे, जेमतेम वाटाण्याच्या आकाराचे आंबे दिसू लागले आहेत मात्र तिकडे मुंबई-पुण्याच्या मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या पोहोचल्यासुद्धा. म्हणजे आमची आंब्याची बाग तब्बल तीन-साडेतीन महिने अजून मागे आहे.
तसं बघायला गेलं तर मार्केटला पोहोचलेल्या या आंब्याला सुद्धा जवळपास दोन महिने उशीरच झालेला आहे. म्हणजेच हा आंबा दोन महिने आधीच डिसेंबर मध्ये मार्केटला पोहोचायला हवा होता. काय प्रगती आहे ना ॲग्रीकल्चरशी निगडीत असलेल्या विज्ञानाची! आणि या विज्ञानाचा जनक असलेल्या माणसाची!
आणि इथे सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्ध्तीच्या नादाला लागून आमचा आंबा मात्र आम्ही मे महिन्याच्या दहा किंवा बारा तारखेला काढायला घेतो आणि त्यानंतर तब्बल आठवडाभराने म्हणजेच मे महिन्याच्या 17-18 तारखेला हा आंबा आमच्या ग्राहकांच्या मुखी पोहोचतो. काय हा ढिसाळपणा? किती हा उशीर? त्यावेळेस सर्वसाधारण मार्केट मधला आंबा म्हणजेच व्यावसायिक आंबा पेटीची किंमत जेमतेम एक हजार रुपयांपर्यंत उतरलेली असते. कुठे एकवीस हजार रुपये आणि कुठे एक हजार रुपये? किती नुकसान आहे ना व्यावसायिक आंबा उत्पादकांचं? त्यांनीसुद्धा बदलायला हवं ना त्यांच्या आंबा उत्पादन पद्धतीला म्हणजे स्वतःला सुद्धा? त्यांनी पण आंबा लवकरात लवकर पिकवून, लवकरात लवकर मार्केट ला पाठवून असाच हजारो रुपयांचा फायदा कमवायला नको का? अर्थात ही बातमी वाचून त्यांच्यातले काही जण तरी नक्कीच 'प्रेरित' झाले असतील आणि असाच उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी कंबर कसून तयारीला लागलेले असतीलच अशी 'आशा' आहे ना तुम्हाला?
या उलट, माझ्या लहानपणी म्हणजे फार जुनी नाही तर फक्त 80 च्या दशकातील ही गोष्ट. तेव्हा आंबे हे असे जानेवारी-फेब्रुवारीत नाही तर वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एप्रिल-मे महिन्याच्या सुट्टीत खायची गोष्ट. अक्षय तृतीयेला म्हणजे एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात कधीतरी, घरोघरी आंब्याचं नवं केलं जायचं. म्हणजेच सीझनचा पहिला आंबा, जेमतेम चार पाच आंबे, त्याचा आमरस करून सगळ्यांनी थोडा थोडाच वाटून खायचा. त्यानंतर मे महिन्याची सुरुवात झाली की आंब्यांची घरात रेलचेल चालू व्हायची. ही आठवण मी नॉस्टॅल्जिया किंवा मराठमोळी खाद्य संस्कृतीचं कौतुक वगैरे म्हणून सांगत नाहीये तर मला लक्षात आणून द्यायचंय की आंब्याचा खरा सीझन हा मे महिन्यातच असायचा. नव्हे, अजूनही तसाच आहे. नैसर्गिक पद्धतीने जोपासलेल्या आमच्या आंबा बागेत म्हणूनच आंबे आजही मे महिन्यातच तयार होतात.
आज मात्र आंबे हे मे महिन्यातला उन्हाळ्याचा मेवा म्हणून न उरता, भर थंडीत डिसेंम्बर-जानेवारी पासून खायचं श्रीमंत फळ झालं आहे. फक्त रत्नागिरी, देवगडच नाही तर, पार आफ्रिकेतल्या मलावीहुन किंवा गुजरात कर्नाटक पासूनच्या आंब्याची मुंबई-पुण्यासारख्या मार्केट मध्ये पोहोचण्याची शर्यत लागलेली असते!
*आणि ग्राहक राजा, हे सगळं तुझ्याच साठी रे!
कारण...*
या मधुर फळाची चव चाखण्यासाठी तुला मे महिन्यापर्यंत धीर धरायचा नसतो!
कारण, शक्य असेल तर तुला वर्षाचे बाराही महिने हा आंबा मिळायला हवा आहे!
कारण, तुझ्याकडे वाटेल ती किंमत मोजायची मानसिक आणि आर्थिक तयारी आहे!
कारण, तुला हा आंबा निसर्गानं हजारो लाखो वर्षांपासून फक्त उन्हाळ्यातच का बनवला आणि तेच तुझ्यासाठी, तुझ्या तब्येतीसाठी कसे उपयुक्त आहे याबद्दल जराही माहिती नाही!
कारण, उन्हाळ्याच्या इतक्या लवकर आधी हा आंबा तुझ्या मुखापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतीविज्ञानानी काय काय करामती केल्या आहेत आणि त्याचा तुझ्या आणि निसर्गाच्याही तब्येतीवर काय परिणाम होत आहे हे तुला माहीत असण्याची सुतराम शक्यता नाही!
पटत असेल तर पुढे वाचाल आणि वाचाल. नाहीतर द्या इथेच सोडून...
मला माहित आहे की तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की "आम्ही नाही बुवा असा दहा-वीस हजार रुपये देऊन जानेवारी महिन्यात आंबा खात, आम्ही तर मार्च महिन्यापासूनच आंबा खातो... तेही पेटीमागे जेमतेम पाच-सहा हजारच मोजून!"
तर काही आमच्यावरही आरोप करतील की आम्हाला शेती-विज्ञानाने केलेली प्रगती मान्य नाही किंवा आम्हाला इतर आंबा उत्पादकांनी कमावलेले पैसे बघवत नाहीत आणि आम्हाला शेतीचा व्यवसाय समजला नाही!
मुळात कुठल्याही भाजीचा किंवा फळाचा सिझन नसताना ती फळं किंवा भाज्या उगवता, पिकवता येणं ही खरंच प्रगती आहे का हेच आधी समजावून घेऊ. त्यासाठी निसर्गाने मुळातच आंबा हा उन्हाळ्यासाठी का बनवला आणि उन्हाळ्यात तयार होण्यासाठी त्याआधी झाडावर नक्की काय काय घडतं हे समजून घ्यायला हवं. "मला काय करायचं आहे आंबा कसा उगवतो हे समजावून, ते सगळं तुम्ही आंबा बागायतदारांना सांगा" असं म्हणून चालणार नाही. अर्थात आंबा बागायतदारांना हे समजायला हवं आणि दुर्दैवाने माझ्या माहितीतल्या 80% बागायतदारांना हे खरच माहित नाही. हे दुर्दैवी आहे पण खरं आहे. त्यांच्या दृष्टीने अमुक पद्धतीने आंब्याची कलमं लावली, त्यांना पाणी दिलं, छोटी असताना अमुक खतं घातली, मोठी झाल्यावर तमुक खतं घातली, अमुक कीड लागली की अमुक औषधाच्या फवारण्या केल्या, तमुक रोग येऊ नये म्हणून तमुक औषधं घातली की झालं असंच वाटतं... नव्हे, तेव्हढंच माहीत असतं! हे सगळं पटापट व्हावं असं वाटायला लावण्यात लवकर लवकर आंबे विकत घ्यायची तयारी असणाऱ्या ग्राहकांची भाऊगर्दी, लवकरात लवकर मागणी करणारी मार्केटची चढाओढ, आंधळेपणाने यालाच शेतीचं यश म्हणणारी समाजाची आणि आधुनिक शेती शास्त्राची मानसिकता मोठा हातभार लावते.
हाच आंबा बागायतदार, विशेषतः कोकणातला हापूस आंब्याचा शेतकरी... दर वर्षी त्याच्या बागेतील कमी कमी होत जाणाऱ्या आंबा पिकाच्या घटत्या प्रमाणामुळे चिंतीत आहे, बागायत पूर्णतः सोडून दुसऱ्याच व्यवसायाकडे वळतोय किंवा आंबा बागायत सोडून काजू लागवडी साठी धावतो आहे. फारशी मेहेनत न घेता दरवर्षी किलोला 150 रुपये मिळतील म्हणून बाकी सगळं तोडून टाकून फक्त काजूचीच लागवड वाढत्येय. पण सगळीकडे काजूच काजू झाले तर पुढच्या 5-10 वर्षांत 150 रुपये नाही, तर जेमतेम 50 रुपये मिळतील हे लक्षातच घेत नाहीये. तेव्हा कोकणात नारळी पोफळी, फणस, जाम्ब, जांभळं, करवंद जाऊन फक्त आणि फक्त काजूचीच झाडं दिसली तर नवल वाटायला नको. अर्थात तो विषय नंतर कधी तरी सविस्तरपणे...
याउलट, आपलं आंबा उत्पादन दर वर्षी का घटतंय, आपलं नेमकं कुठे आणि काय चुकतंय याचा त्यानं आणि आंबे खाण्याऱ्यानीही विचार करायची वेळ आली आहे.
*आधी म्हटल्याप्रमाणे मुळात झाडावरती आंबा येतो म्हणजे झाडांमध्ये नक्की काय होतं हे पाहूया.*
कोकणात आणि सर्वसाधारण प्रमाणे महाराष्ट्रात पावसाळ्याच्या शेवटी म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आंब्याच्या झाडांवर नवी पालवी येते. पुढल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये ही पालवी जून होऊन तिचा रंग गुलाबी पासून ते गर्द काळपट हिरव्या कडे झुकतो. असे जेव्हा होते तेव्हा ही पाने म्हणजेच पूर्ण झाड नव्याने प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटो सिन्थेसिस करण्यासाठी तयार होते. प्रकाश संश्लेषणाने हे झाड सूर्यप्रकाशातून विविध प्रकारचे घटक अन्न आणि ऊर्जा मिळवते. आणि त्याच वेळेस झाडाची मुळे जमिनीतून विविध प्रकारचे अन्नघटक जमा करत असते आणि झाडाला सशक्त बनवत असते या सगळ्यातूनच झाड पुन्हा अन्ननिर्मिती करण्यासाठी सक्षम होत असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे झाडाला मोहर येणे. आंब्याच्या झाडाला मोहर येण्यासाठी हवामानात विभिन्नता म्हणजेच, रात्रीची थंडी आणि दिवसाची उष्णता यामध्ये किमान 10 ते 12 डिग्री अशी तफावत सातत्याने 15 ते 20 दिवस असणे आवश्यक असते. जे साहजिकच डिसेंम्बर अंती किंवा जानेवारीच्या आसपास असतं. अशा पद्धतीचे हवामान मिळाल्यास झाडाला मोहर यायला सुरुवात होते. झाडाला आलेला मोहर म्हणजे झाडाची बारीक-बारीक छोटी फुले. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कीटक म्हणजे मधमाशा, फुलपाखरे, भुंगे, छोटे पक्षी या सगळ्यांचा या फुलांची संपर्क येऊन त्यातून परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन घडते आणि तिथे आंबा या फळाचा खऱ्या अर्थाने जन्म होतो. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीस. यावेळेस आंबा हे फळ अत्यंत छोटे एखाद्या मिरीच्या दाण्या एव्हढं होत मोहरातून डोकावू लागतं. त्यानंतर अडीच-तीन महिन्याचा कालावधी म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल. हा त्या आंब्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा काळ. झाडाने मिळवलेल्या सर्व अन्न आणि ऊर्जेचा वापर या फळाला मोठा करण्यासाठी होत असतो. त्या पोषणामुळे हे फळ पुढील अडीच-तीन महिन्यांत मोठे मोठे होऊन तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेल्या आणि आवडत असलेल्या हिरव्या गर्द कैरीत बदलतं. हिरव्या रंगाच्या कोवळ्या कैरीचं रूपांतर महिन्याभरातच जून होऊन फिकट हिरव्या जून आंब्यात होतं. या दरम्यान मार्च एप्रिल महिन्यात उन्हं तापायला लागलेली असतात आणि त्या उन्हातच म्हणजे त्या उष्णतेतच सगळी मेख आहे. जुनावलेल्या आंब्यात आता फ्रुक्टोज म्हणजे फळातील नैसर्गिक साखरेचं सॅच्युरेशन व्हायला सुरुवात होते आणि एथिलीन नावाच्या एंझाईमची निर्मिती होते. नैसर्गिक साखर आणि एथिलीनयुक्त असा आंबा मे महिन्याच्या सुरुवातीला झाडावरून काढायच्या योग्यतेचा झालेला असतो.
एथिलीन मुळे आंब्यातला पेकटीन नावाचा घटक विरघळायला सुरुवात होते ज्यामुळे आंबा हळूहळू मऊ आणि रसाळ व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आंब्यामधला दृश्य फरक म्हणजे सालीचा रंग देठाकडून खालच्या दिशेने सुरुवातीला लालसर आणि नंतर केशरी पिवळा व्हायला लागतो.
थांबा!
अजूनही आंबा खऱ्या अर्थानं खाण्यालायक झालेला नाही.
यानंतर वातावरणातल्या उष्णतेमुळे आंब्यातल्या पाण्याचं बाष्पीभवन व्हायला सुरुवात होते आणि आंबा थोडा आक्रसतो आणि त्याच्या सालीला सुरकुत्या दिसायला लागतात. पाण्याचा अंश आटल्यामुळे आंबा अधिक गोड होतो...
आता मे महिन्याचा पहिला आठवडा उजाडलाय, आत्ता घ्या तो आंबा खायला!!
धीर धरी रे धीर धरी, धीरापोटी फळे रसाळ गोमटी!
आहे ना खरं?
आता पाहुयात की आंब्या सारखं नैसर्गिक साखरयुक्त म्हणजेच फ्रुक्टोजयुक्त अत्यंत गोड फळ निसर्गानी फक्त उन्हाळ्यासाठीच का बनवलं? एकदा हे कारण लक्षात घेतलं की पुन्हा कधी आंबा उन्हाळ्या व्यतिरिक्त खावासा वाटणार नाही. उन्हाळ्यामध्ये माणसाच्याआणि इतर प्राणिमात्रांच्या शरीरामध्ये साखरेची म्हणजे ग्लुकोजची गरज वाढते. कडक उन्हाळ्यातच शरीरातील पाण्याचेही डिहायड्रेशन होऊन रसयुक्त पदार्थांची आणि एनर्जीसाठी साखरेची गरज वाढते. त्यामुळे या काळात अशी फळं किंवा पदार्थ खाणं शरीरासाठी हानीकारक नसून उपयुक्तच आहे. आता बघा ना, कलिंगडा सारखं 90% पाणी आणि ग्लुकोजयुक्त फळ सुद्धा कडक उन्हाळ्यातच आणि आणि तेसुद्धा वाळवंटी प्रदेशांमध्ये पिकतं. निसर्गाने सगळ्यांच्या सोयीसाठी केलेल्या सुंदर सिस्टीम डिझाईनचं हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. जिथे, जेव्हा जशी गरज तिथे आणि तेव्हाच, तसा पुरवठा हा निसर्गाचा नियम आहे. या नियमाच्या विरुद्ध जाऊन केवळ जिभेचे आणि मनाचे चोचले पुरवण्यासाठी उपर्युक्त हंगामम्हणजेच अप्रोप्रिएट सीजन च्या बाहेर जाऊन तशी फळं, भाज्या आणि पदार्थ खाण्यामध्ये काय शहाणपणा आहे बरं? आणखी एक उत्तम उदाहरण बघा. कोकणात कडक उन्हाळा हा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असतो तर उत्तर महाराष्ट्रात किंवा अजून वर उत्तरेकडे गुजरातमध्ये हाच उन्हाळा मे आणि जून मध्ये असतो. वरती उत्तर प्रदेशाकडे अजून वर सरकाल तसा हा उन्हाळा जून-जुलै आणि किंबहुना अगदी ऑगस्टच्या मध्यापर्यंत वाढलेला असतो. त्यामुळेच, उत्तर महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये पिकणारा केशर आंबा मे पेक्षा जास्त जूनमध्ये पिकतो तर उत्तर प्रदेशातले दशेरी, चौसा, लंगडा सारखे आंबे हे जून-जुलैत पिकतात. पण तिकडून येणारे हे आंबे महाराष्ट्रातल्या लोकांनी जून-जुलैत भर पावसाळ्यात शरीराला साखरेची गरज नसताना खाण्यात काय फायदा आहे? चवीची गंमत म्हणून त्या काळात यातला एखादाच आंबा खाणं वेगळं आणि आंबे आवडतात म्हणून वर्षाचे 6-7 महिने देशभरातून किंवा जगभरातून येणारे वेगवेगळे आंबे खात राहणं वेगळं! अश्या मूर्खपणाचा रिझल्ट म्हणून अवेळी वयात डायबेटीस किंवा वाताशी संबंधित रोग ओढवून घ्यायचे आणि दोषी ठरवायचं आंब्यासारख्या सुंदर फळाला. म्हणजे आजचे आधुनिक न्यूट्रिशनिस्ट, डाएटिशियन्स जेव्हा आपल्याला 'इट सीजनल, इट लोकल' असा सल्ला देतात तेव्हा ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे निसर्गाच्या नियमांनी वागायचा सल्ला देत असतात; जो आपल्या जुन्या पिढ्यांना म्हणजे आजी-आजोबांना घ्यायला लागला नव्हता. कारण तेव्हा शेतीचं आणि पिकांचं असं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं नव्हतं.
आज मात्र आंबा, कलिंगड, अननस सारखी फळे असु द्यात किंवा फरसबी, फ्लॉवर, गाजर सारख्या भाज्या असु द्यात; वर्षभर या सगळ्यांची निर्मिती आणि करोडो अजाण-अज्ञ ग्राहकांच्या मागणीला पुरेसा पुरवठा हे शेती व्यवसायाची पायाभूत गरज बनली आहे. त्यातून लवकरात लवकर आणि अधिकाधिक प्रमाणात उत्पन्न घेण्याची जीवघेणी स्पर्धा चालू आहे.
जीवघेणी अशा करता की, निसर्ग नियमाच्या विरुद्ध 2-3 महिने आधी आंबा पिकवण्यासाठी अनेक रसायनं, संप्रेरकं, वापरावी लागतात ज्यामुळे खूप आधी पावसाळ्याच्या शेवटी किंवा नंतर लगेचच मोहर येतो. या लवकर पण अवेळी आलेल्या मोहराला कीड, बुरशी, इतर रोग होण्याची शक्यता अधिक असते म्हणून त्यावर आणि तयार होत जाणाऱ्या आंब्यावर दहा ते वीस वेगवेगळ्या रसायनांची, कीटक नाशकांची फवारणी होते (फोटो क्र. ४). तरीही नैसर्गिक मधुरपणासाठी आणि फ्रुक्टोज सॅच्युरेशन साठी लागणारं कडकडीत ऊन तर मिळतच नाही. आंबा काढताना आणि पिकवतानाही घाईच असल्याने नैसर्गिक रित्या इथेलिन तयार होउ देण्याची वाट न पाहता केमिकली कॅापी केलेलं कृत्रिम इथेलिन फवारून पेटीतला आंबा पिकवला जातो. असा हा रसायनांची बरसात झालेला, बेचव आंबा, त्याची आवश्यकता नसताना इतक्या आधी हजारो रुपये मोजून खाण्यात काय हशील आहे? 'you are, what you eat' या नात्यानं अवेळी मोहर आणलेली अवेळी फळं, भाज्या खाऊन आपलं हार्मोनल संतुलन बिघडून लवकर वयात येणं, पीसीओडी सारख्या व्याधी, अपचनातून येणाऱ्या अनेक व्याधी, या सगळ्यांशी या सगळ्याचा संबंध असेल असं नाही का वाटत तुम्हाला?
आंबा बागायतदारांना सातत्यानं भेडसावणारी घटत्या पिकाच्या चिंतेशी सुद्धा या सगळ्याचा घनिष्ट संबंध आहे हे त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला हवं. या रसायनांच्या सतत आणि अति वापरानं झाडं ही व्यसनी माणसांसारखीच वागायला लागली आहेत, त्यांची रसायनांची गरज दरवर्षी वाढत्येय, जमिनीतल्या आणि परिसरातल्या जैविक चक्राची वाट लागत आहे, परागीभवन करणाऱ्या मधमाश्या, फुलपाखरं कोकणातून सुद्धा कमी होत चालले आहेत, आणि चुकून असलेच तर रसायनांच्या वासामुळे बागांपासून, मोहरापासून दूर पळताहेत, अपुऱ्या परागीभुवनामुळे (पॉलीनेशन) आंब्याचे उत्पन्न घटत्येय. येतंय का लक्षात?
सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या पेपरमधल्या बातमीच्या मुख्य विषयानं म्हणजे 21,500/- या किंमतीने सगळ्याच ग्राहकांचं, बागायतदारांचं लक्ष वेधलं असणार. त्या सगळ्यांच्या नजरेतून सुटलं असतील ते शब्द म्हणजे, 'बदलत्या हवामानामुळे'...
या बदलत्या हवामानाला कारणीभूत आहे ती 'घाई'... 'आज, आत्ता हवं'ची...
तुमची वीसच नाही, तर पेटीमागे पन्नास हजार रुपये खर्च करायची कुवत असेल तर तिचा आदर ठेवून विनंती करतो की तुम्हीही तुमच्या त्या कुवतीचा आदरच करा. आत्ताच आणि सतत हवंय, शक्यही आहे म्हणून वाट्टेल ते वाट्टेल तेव्हा घेऊ नका.
थोडं थांबा,
नीट विचार करा.
नाहीतर,
कोकणातल्या वळणदार घाट रस्त्यांत जागो जागी दिसणारे बोर्डस पाहिले आहेत ना?
"अति घाई, संकटात नेई!”
(लेख ५ वर्ष पूर्वीचा आहे पण अजूनही परिस्थिती तीच आहे )
©® Dm For Credit
🌴 #राजापूर #कोकण #राजापूरकर #गावं_वाचवा