04/11/2024
देव, देश आणि धर्म यांना प्राधान्य देणारा, "अटक" पासून "कटक" पर्यंत मराठा (जात नाही समुह) साम्राज्य पसरवणारा, "आता विश्वात्मके देवे", म्हणत सगळ्या जगाच्या कल्यणाचं "पसायदान" मागणारा, " भेदाभेद भ्रम, अमंगळ " असं ठणकावून सांगणारा,"खरा तो एकचि धर्म...जगाला प्रेम अर्पावे" म्हणून हळवा होणारा,
महाराष्ट्र कुठे हरवलाय.....
समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकमेकांशी जोडून, समन्वय साधून सर्वाना एका सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर आणण्यासाठी अपार मेहनत घेतलेला,समानतेची भावना कायम रहावी, टिकावी आणि दिवसेंदिवस वृद्धींगत होण्यासाठी झटणारा, बाकीच्या राज्यांपेक्षा पुढारलेला, काळाची पावलं आधीच ओळखुन...हुशारीने स्वतः ची प्रगती साधणारा, जवळपास सर्वच क्षेत्रात आपलं द्रष्टेपणं सिद्ध केलेला,
महाराष्ट्र कुठे हरवलाय......
आपल्या आधी दुसऱ्याचा विचार करणारा, स्वतः उपाशी राहून समोरच्या व्यक्तीचं पोट भरणारा, समाजाचं (समूह ह्या अर्थाने - जात, धर्म, पंथ ह्या अर्थाने नाही), राज्यांचं, देशाचं आणि पर्यायाने जगाचं नेतृत्व करण्याची कुवत- क्षमता असणारा,
हा मराठा (मराठी माणूस ह्या अर्थाने) इतका स्वार्थी, आप मतलबी, कोत्या मनाचा कधी झाला कळलंच नाही....
माझा पक्ष, माझं चिन्ह, माझा मतदारसंघ,माझा निधी, माझे कार्यकर्ते, माझे मतदार, माझा मान, माझा अपमान, माझी कोंडी, माझी अवहेलना, माझी घुसमट, माझं हे.... आणि माझं ते....
मी नेता, मी महानायक, मी द्रष्टा, मी आश्वासक चेहरा, मी खंबीर नेतृत्व, मी लाखोंचा पोशिंदा, मी दोस्तांचा दोस्त आणि दुश्मनांचा दुश्मन, मी मोठ्या मनाचा, मी दिलदार, मी अमुक.... आणि मी तमुक...
ह्या अहमहिकांमध्ये ज्याच्या नावावर, ज्याच्यासाठी हे सगळं केलं जातं (खरं तर करण्याचा आव आणला जातोय) तो कुठे आहे. त्याच्या कोणीतरी विचार करतोय का?
राजकारणात सक्रिय सहभागी नसलेल्या सामान्य माणसाला पुर्वी मतदानाच्या दिवशी तरी काही किंमत होती. इथुन पुढे कदाचित तेवढी सुद्धा मिळणार नाही, बहुतेक...
बघा पटतंय का...?
पटलं तर तुमचं मत कळवा आणि आवडलं तर माझ्या नावासकट (प्रसिद्धिसाठी नाही तर हे लिहीण्याची जवाबदारी घेण्यासाठी म्हणून) पुढे पाठवा (आताच्या मराठीत -शेअर (share) करा).
आपलाच-
आशिष जयराम भोसले