03/07/2020
*हे असच चालले तर..*
*सरकार ओरडून ओरडून सांगत होतं सामाजिक, शारीरिक अंतर पाळा*, डॉक्टर, पत्रकार, अधिकारी, पोलीस सांगत होते, पण तेव्हा कोरोनाची भीती वाटली नाही. *वाढदिवस साजरे केले, एकमेकांना केक खाऊ घातले, 15/20 जण जमून पत्ते खेळलो, उगाच कट्टयावर बसून रात्री 11/ 12 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो, गरज नसताना मार्केट मध्ये फिरत राहिलो, मेडिसिन आणायचा बहाणा करून पोलिसांना कसं फसवलं याचा आनंद तर गगनात मावत नव्हता*. तेव्हा कोरोना ची भीती नाही वाटली, खर्रा खाऊन तोंड सडायची वेळ आली, सगळ्या गल्ल्या, चौक, थुंकून थुंकून लाल केले तेव्हा आम्ही अस्वच्छ आहोत असं कधी वाटलं नाही, चोरून खर्रा विकताना आणि तो चोरून खाताना यामधून कोरोना माझ्या घरापर्यंत येईल याची भीती नाही वाटली आम्हाला. *पोलिसांची नजर चुकवून आम्ही पुणे, मुंबई अजून कुठे कुठे जाऊन आलो, आणि जसं काही अटकेपार झेंडा लावून आल्याच्या थाटात आल्यानंतर स्वतः फॅमिली आणि समाज यांचे पासून विलग न होता आमचं रोजचं काम करीत राहिलो*,
पण जेव्हा शेजारी कोरोनाचा रुग्ण सापडला तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि *विलगीकरण केलं तेव्हा मात्र इथे काहीच सोय नाही, इथंच आम्हाला कोरोना होईल ही भीती वाटायला लागली. मग प्रशासन कसं आमची काळजी घेत नाही, आम्हाला जनावरसारखं डांबून ठेवलं, खायला दिलं नाही, जे दिलं ते चांगलं नाही, इथे साफसफाई नाही याचे व्हिडीओ आम्ही व्हायरल केले*.
पण आपण पसरवीत असलेल्या भीतीमुळे सफाई करायला कोण कामगार तयार होत नाही, कुणी प्लम्बर येत नाही, कुणी इलेक्ट्रीशीयन येत नाही, याची जाणीव नाही राहिली आम्हाला. काहींना तर असं वाटत आहे की मुद्दाम सफाई कामगार लावले जात नाहीत. *काही लोक म्हणत आहेत की त्यांचे नावाने आलेला पैसा खाण्यासाठी अधिकारी हे सगळं करत आहेत, काही खात्री तर करावी की नाही ?* त्यांच्या उच्च विचारला तर 52 तोफांची सलामी दयायला हवी. विलगिकरणाचा अर्थच आहे की स्वतः इतरांपासून वेगळं करणे. *पण घरी, समाजात, आणि विलगिकरण परिसरातही मध्ये सुद्धा गप्पा मारत फिरत आहोत आम्ही. अगदी आम्ही अधिकारी/ कर्मचारी सुद्धा इतरांना विलगीकरणाचे चे अर्थ समजावून सांगतो ते आम्हीसुद्धा quarantine झाल्यावर त्या center वर इतरत्र फिरत असतो*.
काहींना वाटलं *माझं राजकीय वजन जास्त आहे, मी कसला विलागिकरणात (qurantine) राहतो. मग इकडून दबाव, तिकडून दबाव, कधी अधिकाऱ्यांना धमक्या हेही करून पाहिलं आम्ही*. पण कोरोनाला तुमचं राजकारण ,त्यातील तुमचं वजन, तुमचं पद, पैसा, प्रतिष्ठा याचं काही देणंघेणं नाही. तुम्ही मास्क, सामाजिक व शारीरिक अंतर नाही पाळलं की तुमचा गेम झाला म्हणून समजा..
साध्या गोष्टी आहेत खबरदारीच्या, पण *आम्हाला प्रत्येकाला वाटत राहतं की मला काही होत नाही, इतरांनी खबरदारी घ्यावी*. कधी वाटतं की आम्हाला फक्त स्वातंत्र्य मिळालं, पण एक राष्ट्र म्हणून विचार करताना आमची काही सामाजिक जबाबदारी आहे, काही संकटांचा मुकाबला करण्यासाठी फक्त प्रशासन पुरेसं नाही पडणार, त्यासाठी आम्हाला स्वतः रोजच्या जगण्या-वागण्यामध्ये काही शिस्त पाळावी लागेल याचं भान येणं अजून आमच्या समाज मनापर्यंत पोहोचलं आहे असं दिसतं नाही. काहींना यातही राजकारण दिसलं, 'आमची' माणसं सोडा, 'त्यांची' तशीच ठेवा.
*"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..... " हे आम्ही प्राथमिक शाळेत शिकलो, पण जसजसे मोठे होत गेलो तसतसं "हे आमचे" "ते तुमचे" हे विष आमच्या मनात इतकं भिनत गेलं की जसं काय ते आमच्या रक्ताचाच एक भाग बनून गेलंय*.
काही ठिकाणी तर याला जातीय रंग द्यायचा पण प्रयत्न झाला. या सगळ्या हेव्यादाव्यातून कोरोनाशी आम्हाला शरीराने दूर पण मनाने एकत्र राहून लढायचं आहे हेच आम्ही विसरून गेलोय.
आज प्रत्येक अधिकाऱ्याचा/ कर्मचाऱ्याचा सर्व डॉक्टर्स (सरकारी/खाजगी) / फर्मासिस्ट आणि इतर खाजगी व्यवसायिक यांचा घरात पाऊल ठेवताना काळजाचा ठेका चुकत असेल, दिवसरात्र कुणा कुणाच्या संपर्कात येतोय याचं भानसुद्धा नाही राहत, कित्येक लोक घरात जाऊन सुद्धा दारात जेवत आहेत, झोपत आहेत, पण ही वेळच अशी आहे की, *प्रत्येकानं संयम आणि खबरदारी ने वागायला हवं, मीच एकटा बरोबर आणि बाकी सगळे चोर ही वृत्ती नको या भयंकर परिस्थितीत*.
प्रशासनात काम करणारी माणसं घरदार सोडून दिवस रात्र लढत आहेत, (तेही काही उपकार करत नाहीत, कामाचा भाग आहे.) *पण कोणत्या परिस्थितीत आणि किती वेळ काम करत आहेत याचं कुणाला सोयरसुतक नाही* आणि सर्वात जास्त रिस्क area त ते काम करत आहेत, उद्या यांच्यापैकी कोणी पाँझिटीव्ह आला तर अख्खी यंत्रणा बिनकामाची होऊन जाईल.
*अपुरी संसाधनं, अपुरं मनुष्यबळ, हातात शस्त्रचं नाही आणि शत्रू दिवसेंदिवस आपला आकार वाढवत आहे, अशी ही लढाई आहे. ही लढाईच वेगळी आहे, इथं शरीराने दूर राहून पण विचाराने आणि मनाने एकत्र येऊन लढलो तरच निभाव लागणार आहे आपला*. एकमेकांवर विश्वास ठेवून, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरून, सामाजिक अंतर पाळून, स्वच्छतेच्या सवयी बाळगून, एकमेकांना सहकार्य करूनच ही लढाई लढावी लागेल.
*नाहीतर शत्रू उंबरठ्यावर उभा असेल आणि आपण हतबल झालेलो असेल*. त्या दिवसाची वाट नको पाहायला 🙏.