18/06/2024
अशांत ,लढाऊ पँथर..... अर्जुन.
आज १५ जून २०२० , आदरणीय अर्जुन डांगळे ह्यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस. त्यानिमित्त
त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
माणूस आयुष्यात जी काही प्रगती करतो, त्याच्या मुळाशी , बालपणीचे संस्कार असतात. त्याचे जन्मस्थळ, तेथील वातावरण , सामाजिक, राजकीय स्थिती, तेथील एकूणच भोवताल ह्या सर्व गोष्टींचा कळत नकळत त्याच्या जडणघडणीवर आपोआप चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. नंतर उमेदीच्या काळात त्याच्या अंगभूत गुणांसह, ह्याच बालपणीच्या संस्कारररुपी शिदोरीवर , तो यशाची एक एक पायरी चढत जाऊन त्याच्या जोरावर आपल्या स्वतःचे ,आपल्या जन्मभूमि सह समाजाचे , देशाचे नाव जगभर करतो. अशाच एका प्रतिभावंत कवी, साहित्यिकाने समाज परिवर्तनाच्या चळवळीतील अग्निकुंडात प्रत्यक्ष उडी घेऊन तसेच आपल्या लेखणीच्या जोरावर समाजात प्रबोधनाचे स्फुल्लिंग पेटवून, मार्गदर्शकाची भूमिका पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याने जातीयवादाच्या अन्यायी हिटलरी बेड्या तोडण्यासाठी दलीत पँथरच्या चळवळीतून मोठे योगदान दिले. प्रस्थापितांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे राहून त्यासाठी करावा लागणारा त्याग, भोगलेला तुरुंगवास, व पोलिसांचा खाल्लेला मार त्यांच्या ही वाट्याला आला. अशा या दलीत पँथरचे संस्थापक सदस्य, रिपब्लिकन नेता,कवी, लेखक अशी चौफेर मुशाफिरी करणाऱ्या चिरतरुण योध्याचे नाव आहे अर्जुन ठमाजी डांगळे. ते वयाच्या पंच्याहत्तरी मध्ये प्रवेश करीत आहेत त्यानिमित्ताने त्यांचे मी अभिनंदन करतो.
अर्जुन डांगळे ह्यांचा जन्म माटुंगा लेबर कॅम्प मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व जेथे आंबेडकरी चळवळ रुजली ,वाढली, तसेच दलीत साहित्याची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या बाबुराव बागुलांची कर्मभूमी असलेल्या, व संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्यांच्या पोवड्यानी दणाणून सोडली,ज्यांनी चौतीस कादंबऱ्या , अनेक वगनाट्य, चित्रपटांचे लेखन केले, त्या अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीला ज्या भूमीने चालना देऊन लोकाभिमुख केले, त्या भूमीत दिनांक १५/०६/१९४५ रोजी झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार " महारकीची कामे सोडा आणि शहराकडे चला" महार मंडळी साधारणपणे १९३५ ते १९४० दरम्यान लेबर कॅम्प मधील चाळीत वास्तव्यास आली.त्या अगोदर इथे ब्रिटिश सैनिकांच्या बरॅक्स होत्या. नाशिक, सातारा, अहमदनगर, या जिल्ह्यातील बहुसंख्येने महार लोक असलेल्या या विभागात थोडे मुसलमान, थोडे भैय्या लोक, व बऱ्यापैकी मोठी वाल्मिकी समाजाची वस्ती होती. नगरची बहुतेक मंडळी ख्रिश्चन धर्माच्या अधीन राहून शांत्तेतेने जीवन व्यतीत करीत होते. जरी ते आता ख्रिचन झाले असले तरी ते मूळचे महार असल्यामुळे ,त्यांची ही मानसिकता , आर्थिक परिस्थिती आपल्यासारखीच गरिबीची होती.महारकीची कामे सोडून पोटापाण्यासाठी मुंबईत आलेल्या ह्या सर्व मंडळींच्या वृत्ती , प्रवृत्ती मध्ये मात्र काहीही बदल झालेला नव्हता.तीच लाचारी,गरीबी आणि त्यामुळे आलेला घाबरटपणा , इथेही पिच्छा सोडीत नव्हता.. आपण भले आणि आपले काम भले ही वृत्ती.परंतु त्यावेळी आंबेडकरी विचारांनी भारलेल्या लोकांचा कल मात्र मुलांच्या शिक्षणाकडे असल्याचे दिसून येते.जवळच असलेल्या धारावीतील माकडवाले, मद्रासी ह्या लोकांचे दारूचे धंदे, संघटित गुंडगिरी, व्याजाचा व्यवसाय, ह्यामुळे इथे कायम गडबड,गोंधळ,मारमाऱ्यामुळे दहशतीचे वातावरण असे.त्या दहशतीखाली आपला समाज कायम वावरत असे. ह्याचा परिणाम म्हणून एकही टॅक्सीवाला लेबर कँपमध्ये येण्यास तयार नसे.या सर्व परिस्थितीत बदल घडवुन आणण्यासाठी आम्हाला १९७५ पर्यंत संघर्ष करावा लागला. त्यावेळी अर्जुन डांगळे आमच्या बरोबर ठामपणे उभे होते.हे मी अभिमानाने सांगू शकतो.
त्यांच्या आईचे नाव शांताबाई, नावाप्रमाणेच स्वभावाने अतिशय शांत, वडील ठमाजी मात्र कडक स्वभावाचे, ते उभयता जरी अशिक्षित होते तरी मुलांना शिक्षण देण्याची त्यांच्यामध्ये विलक्षण जिद्द होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले. त्यांची पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणना होत असे. इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत ते संपूर्ण माटुंगा लेबर कॅम्प मधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक झाले होते.
त्यांना घरातूनच समाजसेवेचे बाळकडू शंकरबाबाच्या रूपाने मिळाले.(शंकरबाबा , त्यांच्या आईचे मामा ). कॉ.शंकरराव पगारे हे तेव्हाचे म्याट्रिक पास होते. ही त्या काळातील फार मोठी गोष्ट होती. ते कम्युनिस्ट पक्षाचे पुढारी होते. लेबर कॅम्पमध्ये सर्व कामगार वस्ती असल्यामुळे व त्यावेळी बहुतेक सर्व युनियन कम्युनिस्ट पक्षाच्या असल्यामुळे ,इथे आंबेडकरी चळवळी बरोबरच कम्युनिस्ट चळवळदेखील बऱ्यापैकी फोफावली.तो काळच आंबेडकरी चळवळीने असा काही भारलेला होता की, समाजातील मुले लहानपणीच आपोआप चळवळीकडे ओढली जात होती. अपवाद कम्युनिस्ट चळवळ.
ते शाळेत असतानाच त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता जागृत असल्याचे दिसून येते. प्रसंग होता शेडुल्ड कास्ट फेडरेशनचे चोखाजी गांगुर्डे ह्यांचा खून झाला त्यानंतरचा. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ३ जानेवारीला सर्व विद्यार्थी मिळून शाळा बंद ठेऊन लेबर कॅम्प मधून घोषणा देत मिरवणुकीने प्रभात फेरी काढीत असत. त्यात अर्जुन डांगळे ह्यांचा प्रमुख सहभाग असे.
महानगरपालिकेच्या शाळेत असताना एक हुशार विद्यार्थी म्हनुण त्यांचा शाळेत नावलौकिक होता.तेव्हा शाळेत माधवराव जाधव नावाचे शिपाई होते. त्यांना संपूर्ण लेबर कॅम्प आदराने " माधव शिपाई" संबोधायचे. तेव्हा एखादा विद्यार्थी दोन तीन दिवस शाळेला गैरहजर राहिला की, हे माधव शिपाई छोट्या अर्जूनसह तीन चार मुलांना घेऊन त्या गैरहजर मुलाच्या घरी जाऊन , त्याला उचलून शाळेत आणायचे.
तसे पाहिले तर बालपणी आजूबाजूला लेखन, सांस्कृतिक, साहित्यिक वातावरण नसताना , या उलट गोंगाट,मारामाऱ्या ,दारुडे असे सर्व प्रतिकूल वातावरण असताना, त्यांना इयत्ता आठवीत छबिलदास हायस्कूल मध्ये प्रवेश घेतल्यानंतर कविता करण्याचा छंद लागला. शाळेच्या हस्तलिखितमध्ये ते लिहू लागले.आणि वकृत्व स्पर्धा तर त्यांच्याशिवाय पूर्ण होतच नव्हती.त्यांची नंतरच्या काळातील झेप बघता , असे वाटते की, बालपणीची अशी सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना , त्यांना शंकरबाबा, बाबुराव बागुल , अण्णाभाऊ साठे ह्यांच्या रूपाने बालपणीच परिसस्पर्श लाभला म्हणून, ते नंतरच्या काळात प्रतिथयश कवी, लेखक, नेता म्हणून कामगिरी बजावू शकले असे म्हंटले तर ते वावगे ठरू नये.
त्यांचा बालपणी "जय शिवशंकर" नावाचा कब्बडी संघ होता.त्यात सगळेच सवंगडी गरीबाघरचे. मग सामना खेळताना लिंबूसाठी पैसे आणायचे कुठून ? मग त्यावर उपाय काय? त्या काळी हार्बर रेल्वेच्या पुलाखाली बऱ्याच वेळेला उतारे ठेवले जायचे. त्यामध्ये लिंबू हमखास असायचेच. मग ते लिंबू आणून , पाण्याने स्वच्छ करून, तेच कापून ,त्याचे तुकडे करून सगळ्यांना वाटायचे. अशी ती जगावेगळी गम्मत होती. आणि आपण उताऱ्याचे लिंबू खातो ह्याचे सर्वांनाच काही वाटत नसे परंतु घरी समजले तर मार नक्की पडणार ही भीती मात्र असायची.
बालपणीच्या खोड्या नाहीत असा माणूस शोधून सापडणार नाही. बलभीम व्यायाम शाळेसमोर कबड्डीचे मैदान व झाडी होती. आजूबाजूच्या पाण्यातून मासे पकडून , त्या झाडीमध्ये जागा साफसूफ करून , ते भाजून खाण्याचा, तसेच चाळींमध्ये कोंबड्यांची खुराडी असायची . त्यातील अंडी पळवुन, खाण्याचा देखील कार्यक्रम अधूनमधून व्हायचा.
ते तारुण्यात पदार्पण करीत असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळ चरम सीमेवर होती. कळत नकळत ह्या चळवळीचा व त्यांच्या नेत्यांचा मोठा प्रभाव डांगळेवर पडल्याचा दिसून येतो. कॉ.डांगे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, दादासाहेब गायकवाड, ह्यांच्या भाषणांचा प्रभाव त्यांच्यावर पडला.तसे पाहिले तर माटुंगा लेबर कँपच्या वास्तव्यात त्यांच्यावर आंबेडकरवादी व मार्क्सवादी या दोन्ही विचारसरणींचे संस्कार झाले.परंतु पुढे जाऊन त्यांनी आंबेडकरवादाची कास धरल्याचे दिसून येते.त्यांची चळवळ, लेखन त्याच दिशेने गेलेले आहे.
माटुंगा लेबर कॅम्प ही भूमी चळवळ्यांची भूमी आहे. डांगळे तरुण असताना , एस्त्रेल्ला बॅटरीज कंपनीचा संप झाला होता. त्यावेळी बरेचसे कामगार कँपातले होते व कम्युनिस्टांची युनियन होती. संपाच्या वेळी तेथे पोलिसांनी अश्रुधुर सोडला. त्यावेळी अर्जुन व त्यांची मित्रमंडळी संपकऱ्यांना अश्रुधुरापासून वाचवण्यासाठी ओले रुमाल पुरविण्याचे काम कोरीत होते. याचा अर्थ असा की, अन्यायाविरुध्द लढणाऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका त्यांच्यामध्ये लहानपणीच पेरली गेली होती.
ते इतके चांगले नशीब घेऊन आले की, बालपणीच दोन दिग्गज ,महान लेखकांचा सहवास त्यांना लाभला.त्यापैकी एक दलीत साहित्याचे प्रणेता बाबुराव बागुल.ते त्यांच्या शेजारीच राहायला होते. ते त्यांना "मामा"म्हणायचे. दुसरे होते ,ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये उभा महाराष्ट्र आपल्या पोवड्याणी ढवळून काढला,ते अण्णाभाऊ साठे.त्यांचा शंकरबाबा ह्यांच्याकडे कायम वावर असायचा.
तरुणपणी ते चांगले क्रिकेट खेळायचे. ते आणि त्यांचे वडील बंधू विनायक हे ल्युनिक स्पोर्ट्स क्लबचे ओपनिंग फलंदाज होते.राजरोहान सरतापे त्यांचे कप्तान होते. विजय निकम, आनंद निकम, वसंत मोरे,संभा सवणें, धाइंजे, मनोहर पगारे,तसेच इतर त्यांचे संघ सहकारी होते.
ते इतरत्र वास्तव्यास गेले तरी , ते आंबेडकरी चळवळीशी निगडित असल्यामुळे कॅम्पाशी त्यांची नाळ कधीच तुटली नाही. मग ती दलीत पँथरचे चळवळ असो अथवा क्रीडा मंडळ ऐक्य समितीची चळवळ असो , ते कायम लेबर कँपच्या चळवळीशी संलग्न राहिले. समितीच्या अडचणीच्या वेळी ते कायम आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
ते आंबेडकरी विचाधरेने संस्कारित झाल्यामुळे , एका बाजूला कविता, लेखन करीत होते. तर दुसऱ्या बाजूला ते अन्याय ,अत्याचाराच्या विरोधात , समाज परिवर्तनाच्या लढाईत " दलीत पँथर" नावाच्या अग्निकुंडात उडी घेऊन काम करीत होते. त्यांच्यासह नामदेव ढसाळ, भाई संगारें, ज. वी. पवार,राजा ढाले, प्रल्हाद चेंद्वणकर असे लेखक, कवी ह्यांनी एकत्र येऊन अन्याय अत्याचाराच्या विरूद्ध "दलीत पँथर" सारखी जहाल,आक्रमक व लढाऊ संघटना की, जे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आंदोलन करून अत्याचारित लोकांच्या छातीत धडकी भरवन्याचे काम करीत होती, उभी करण्याचा हा देशातील पहिला प्रयोग होता.
सत्तरच्या दशकात रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत दुफळीमुळे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण होऊन समाज हवालदिल झाला होता.दलितांवरील अन्याय, अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती.काँग्रेस सरकार पूर्ण बहुमताने सत्तेत होते. मुंबईत शिव सेनेच्या विरोधात ब्र काढण्याची कुणामध्ये हिम्मत नव्हती. अशा वेळी पँथरचा जन्म झाला.ह्या सर्व विपरीत परिस्थितीला टक्कर देत ह्या बिबळ्या वाघांनी इतिहास घडवला. ह्यात इतरांसह मोलाचे योगदान अर्जुन डांगळे ह्यांचे आहे.
हे सर्व सुरू असताना त्यांचे लेखन देखील सातत्याने सुरू होते. अनियतकालिकाच्या चळवळी, वृत्तपत्रीय लेखन, हे अव्याहतपणे सुरू असताना,मानवमुक्ति, अन्याय अत्याचाराच्या विरोधी इत्तर समविचारी पक्ष, संघटना तसेच विरोधी लोकांबरोबर करावयाच्या लढाया देखील करण्याचे काम सातत्याने केले जात होते.
मधल्या काळात नामांतर चळवळ,रिडल्स प्रकरण, अड्.प्रकाश आंबेडकर ह्यांच्या भा.री. प. चे महाराष्ट्राचे अध्यक्ष, रामदास आठवलेंच्या आर.पी. आय. चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशा विविध जबाबदारीच्या पदांवर ते कार्यरत होते.
नाही! हां , मी समाधानी नाही, आयुष्याच्या म्याराथॉन मध्ये ते नुकतेच पंच्याहत्तरी मध्ये प्रवेश करताहेत, त्यांनी शतकी म्यारा थॉन यशस्वीपणे निरोगीपणात पार करून जिंकावी अशी मी तथागत चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो.
तोपर्यंत त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भावी आयुष्य सुख, शांती, आणि निरोगी जावो ही मनोकामना व्यक्त करतो.!!!
जय भीम.
आपला,
अरुण निकम.
9323249487