19/02/2025
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांतीकरता सामाजिक क्रांती केली. त्यांनी केलेल्या लढाया हे त्यांचे २० टक्के कार्य असून ८० टक्के कार्य सामाजिक, आर्थिक, भौतिक, कृषीविषयक आहे.
१७व्या शतकात स्त्रीला गुलाम म्हणून विकले जात असे. त्यांच्या चारित्र्याला, अब्रूला कोणतीही किंमत नव्हती. तिला स्वातंत्र्य, सुरक्षितता नव्हती. अशा या काळात ‘स्त्रीवादा’ची मांडणी करणारा राजा म्हणून महाराजांना ओळखले जाते. स्त्रीला सन्मान मिळावा, त्यांना मानाचे स्थान मिळावे, प्रतिष्ठा मिळावी व माणूस म्हणून स्त्रीला जगता यावे, महाराजांचे हे विचार त्यांना निष्ठा देऊन गेले. त्यामुळे ते ‘लोककल्याणकारी राजा’ झाले.
महाराजांचे तीन पैलू होते - महाराजांचे चरित्र, महाराजांची विचारसरणी आणि महाराजांचे प्रजाप्रती असलेला व्यवहार किंवा कार्य पद्धती.
महाराजांच्या स्वराज्याचा केंद्रबिंदू बहुजन समाज व शेतकरी समाज हा होता. म्हणून ते कुळवाडीभूषण होते.
त्यांनी अस्पृश्यता, भेदभाव आणि शूद्रता मानली नाही. त्यांच्या सैन्यामध्ये अठरापगड जाती-धर्माचे सैनिक आढळतात. यामुळे त्यांना ‘बहुजन प्रतिपालक’ असे म्हणतात.
महाराज केवळ योद्धे नसून नव-समाजरचनेचे व नव्या कृषीरचनेचे जनक होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये नव्या कृषीरचनेची संस्कृती निर्माण केली. त्याची आपल्याला आजही अनुभूती येते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञापत्रे लिहिली. अशाच एका आज्ञापत्रात - “तुमची पाटीलकी ही रयतेच्या हितासाठी सोपवलेली जबाबदारी आहे, तुम्ही पाटील असून रयतेचे मालक नाहीत. म्हणून तुमच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही तरी चालेल, परंतु माझ्या स्वराज्यात कोणीही उपाशी राहता कामा नये. कोणत्याही शेतकऱ्याला अडवू नये, त्यांना कर्ज द्यावे, स्वराज्यात नव्याने दाखल झालेल्या शेतकऱ्यांना नांगर, बी-बियाणे, आर्थिक मदत करा,” अशा प्रकारचा आदेश पाटलाला केला. यातून महाराजांची रयतेप्रतीची निष्ठा दिसून येते. म्हणून शेतकऱ्यांची लेकरं महाराजांच्या सैन्यामध्ये गेली. ‘आपण मेलो तरी चालेल, पण आपला हा पोशिंदा राजा जगला पाहिजे’ अशी भावना या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची बनली.
जेथे महिलांना प्रतिष्ठा नसेल, सन्मान नसेल तेथे स्वराज्य स्थापन करण्याचा अधिकार मला नाही असे महाराज म्हणत. म्हणजेच बहुजन, स्त्रिया, शेतकरी, शूद्रा-अतिशूद्र, अस्पृश्य या चार घटकांच्या कल्याणासाठी महाराजांनी आपले स्वराज्य व सत्ता वापरली.
१७व्या शतकात देशांमध्ये गुलामगिरीची प्रथा सुरू होती. त्यांनी गोव्याचे डच, पोर्तुगीज यांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, “बादशहाच्या काळात स्त्रिया व पुरुष यांची खरेदी-विक्री होत असे, परंतु माझ्या काळात हे होऊ देणार नाही किंवा माझे सैनिक तुम्हाला खरेदी-विक्री करू देणार नाहीत.” जी प्रथा या सरंजामदारी व वतनदारी व्यवस्थेत सर्रासपणे चालू होती, त्याला प्रतिबंध घालण्याचे काम महाराजांनी केले. यातून त्यांची समाजक्रांतीची व समाज न्यायाची भूमिका स्पष्ट होते.
शेतकरी, स्त्रियांचे शोषण कोणीही करणार नाही, यासाठी फर्मान काढले.
महाराजांच्या या वर्तनामुळे समाजातील स्पृश्य-अस्पृश्य हे अंतर कमी होऊन, जातीयता व अस्पृता महाराजांच्या काळात कमी झाली.’ यातून महाराजांचा लोककल्याणकारी दृष्टीकोन स्पष्ट होतो.
येत्या काळामध्ये महाराजांचे स्मरण करून प्रजाहितदक्ष राजकीय व्यवस्था निर्माण व्हायला हवी. महाराजांविषयी चुकीचे विचार पसरवणाऱ्या लोकांपासून जनतेला दूर ठेवणे गरजेचे आहे. संशोधकांनी महाराजांचा खरा इतिहास समोर जनतेसमोर आणावा.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जयभिम!