07/08/2018
महसूल, पंचायत समिती विभागाचे कामकाज ठप्प
राज्य सरकारी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्य सेवेतील विविध संघटनांनी मंगळवारी राज्यव्यापी संपाची हाक दिली. याला प्रतिसाद देत कराड तालुक्यात विविध संघटना मंगळवारी काम बंद ठेवून रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे महसूल, पंचायत समिती, पाटबंधारे, महाविद्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.
राज्य सरकारी कर्मचार्यांना सातवा, वेतन आयोग लागू करावा, नवीन निवृत्ती वेतन योजना रद्द करून जुनी योजना लागू करावी, महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी, निवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करावे आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे.
मंगळवारी संपाच्या पहिल्या दिवशी कराड पंचायत समितीसमोर विविध संघटनांनी सरकार विरोधी निदर्शने केली. या आंदोलनात पंचायत समितीचा कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, अस्थापना, एकात्मिक बालविकास, आरोग्य, शिक्षण यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक हिनुकले, उपाध्यक्ष भूपाल जाधव, सचिव एस.डी. जाधव, जे.जी. साळुंखे, जयश्री नलवडे, विद्या साळुंखे, केळुसकर, शिक्षक संघटनेचे नांगरे, दीपक कराळे, कृषी विभागाचे भूपाल कांबळे यांच्यासह सर्वच विभागांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
दीपक हिनुकले म्हणाले, भाजप सरकार थपाडे सरकार आहे. गेल्या चार वर्षापासून त्यांनी झुलवत ठेवले आहे. हे सरकार केवळ घोषणा करत आहे त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. सर्वच पातळ्यांवर ते अपयशी ठरले आहेत. आमच्या मागण्यांची पुर्तता होत नाही तो पर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे, हमारी ताकद हमारी युनियन आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यानंतर तहसील कार्यालयावर जाऊन विविध संघटनांनी तहसीलदार राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले.
महसूल संघटनेची कराडात निदर्शने
महसूल विभागाने तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. यामध्ये तलाठी, सर्कल, क्लार्क, शिपाई, चालक सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे, तालुका अध्यक्ष पद्मभूषण जाधव, महसूल कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक श्रीराम गुरव, जिल्हा उपाध्यक्ष शकील मुल्ला यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. तहसील, प्रांत कार्यालयांचे कामकाज संपामुळे ठप्प झाले होते.