29/06/2022
मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय, उद्धव ठाकरे यांचा राजीनामा
मुंबई/ प्रतिनिधी : गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने ३९ आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली.
आपल्या सर्वांच्या सहकार्यानं वाटचाल केली. सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्यांना कर्जाच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा बीड पॅटर्न सुरु केला. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, ते औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर केलं. उस्मानाबादचं धाराशीव असं नामांतर केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व चांगलं सुरु असताना काही जणांची नजर लागली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे सोनिया गांधी यांचे आभार मानतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यासोबत विधानपरिषदेचा राजीनामा दिला.
औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मांडला त्यावेळी शिवसेनेचे केवळ आम्ही चार जण होतो, याचा खेद वाटला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मी, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, अनिल परब उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी ठरावाला एका शब्दानं विरोध केला नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.
रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, ज्यांना मोठं केलं, ज्यांना सत्ता दिली, ती लोकं नाराज झाली आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना काही दिलं नाही ते हिमतीने समोर, याला म्हणतात माणुसकी, शिवसेना, शिवसैनिक असं उद्धव ठाकरे म्हणाले.
न्यायदेवतेचा निर्णय आला, उद्या राज्यपालांचा फ्लोअर टेस्टचा आदेश आला आहे. राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखत पत्र मिळताच २४ तासात पत्र दिलं आहे. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी लटकून पडली आहे. राज्यपालांनी तो निर्णय घेतला असेल तर आम्हाला त्यांच्या बद्दल असलेला आदर द्विगुणित होईलस असं उद्धव ठाकरे म्हणाले.