26/02/2022
डॉ. नितीन पं. करमरकर
9890468024
सदर कथासंग्रह ऍमेझॉन,बुकगंगा, फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. https://www.amazon.in/dp/B09QHX5T7S?ref=myi_title_dp
सगळ्या वाचकवर्गांना आमंत्रण... पहिल्या साहित्य अपत्याची नव पर्वणी.
*मनोगत* ......
'समर्पण' हि माझा पहिला कथा संग्रह वाचकांना समर्पित करताना मनात अगदी तोच भाव येतोय जस देवपूजेला पहिले फुल अर्पण करताना येतो. प्रांजळपणे सांगायचं झाल्यास आजवर अनेक नावाजलेल्या लेखकांची पुस्तक गेल्या वीस पंचेवीस वर्षांपासून वाचतोय. त्यामुळे माझ्या छोट्याश्या साहित्य सेवेशी मी निदान वाचक म्हणून का होईना समरूप होऊ शकलो.
मनात नेहमी विचार यायचे कि आपण वाचलेल्या साहित्यातून एका तरी साहित्याची निर्मिती व्हावी. मनात मराठी साहित्याचे अंकुर फुटले ते असे. मागे अनेक वर्षांपूर्वी एक भयानक स्वप्नातून खडबडून जागा झालो आणि कथेला काहीतरी आधार मिळावा असे संकेत मिळालेत. त्यातच एका कथेचा जन्म झाला आणि माझ्या लिखाण कामाला सुरुवात झाली. लेखन कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली ती ह्या संदर्भातूनच.
नंतरच्या काळात शिक्षण, संसार आणि मुलांच्या संगोपनाच्या काळात लेखनाकडे प्रचंड दुर्लक्ष झाले खरे पण कथेबाबत असलेली वीण कधीही तुटली नाही. विचारांची बांधाबांध करायची संधी ह्या काळाने मला दिली. त्या काळात आलेल्या अनुभवातून विचार अधिक प्रगल्भतेने मांडण्याची संधी सुद्धा मिळाली. थोडक्यात, वेळ आल्याशिवाय कुठलेही कार्य तडीस जात नाही हे अगदी खरे. त्यामुळे आज दहा-बारा वर्षाने का होईना माझ्या साहित्य सेवेला 'समर्पण' च्या निमित्ताने पहिला कथा संग्रह अर्पण करताना अतिशय आनंद होतोय. आणि एवढ्या वर्षानंतर हा संग्रह पूर्ण करण्याचे समाधानही काही औरच आहे.
'समर्पण' च्या बाबतीत सांगायचं झालं तर कादंबरीच्या प्रत्यक्ष कथेत आणि पात्रात मानवी मनाचा भावनिक दुर्ष्टीने आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मानवी मन हा अतिशय गुंतागुंतीचा विषय. त्यामुळे आपल्या सभोवताली असलेल्या नात्यांचा भावनिक आशय मांडताना अतिशय दमछाक झाली.
मानवी मनाची उकल,तळमळ,अर्थ,आशय आणि त्यांचा उहापोह हे माझ्या विषय निवडण्याचा मागचे मुख्य स्रोत आहेत.
त्यामुळे हा अथांग आणि अवघड विषय हाताळताना मी कितपण यशस्वी झालोय ह्याचा अभिप्राय मी वाचकांवर सोडत आहे.
कादंबरीच्या लिखाणासाठी प्रत्यक्ष प्रोत्साहन मिळाले ते वडिलांकडून. ज्यांची आयुष्यभर कधीही वाचनाची लय सुटली नाही. लहानपणापासून पुस्तकांविषयी जिज्ञासा निर्माण झाली ती अशी.
ज्या दिवशी कथा लिहिण्याविषयी माझे मत स्पष्ट झाले त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी माझ्या टेबलावर एक नवी कोरी वही आणि एक पेन आढळला. दादाने दिलेले ते सगळ्यात मोठे प्रोत्साहन होते.
प्रत्यक्ष लेखनासाठी मला वेळ मिळावा म्हणून माझ्या इतर सगळ्या जबाबदाऱ्या एकहाती उचलून धरल्यामुळे मला माझ्या पत्नीची सौ. मेघाची फार म्हणजे फारच मदत झाली. माझ्या चिमुकल्यांना म्हणजे क्षितिज आणि निहिरा ह्यांना माझ्या लिखाणाबाबत प्रचंड कुतूहल वाटायचे. त्यांचे कुतूहल सुद्धा माझ्या लेखनाला प्रोत्साहन देत गेले आणि त्यांनी माझ्या लेखनाची जिज्ञासा कायम तेवत ठेवली. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यापेक्षा मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणे पसंत करेल.
तसेच ह्या कथा बांधणीच्या माध्यमातून ज्या-ज्या व्यक्तीवरून माझे मन फिरत गेले आणि ह्या उपक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांचे ज्यांचे हात लागले त्या सगळ्यांना ऋण निर्देशित करणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कथेत ठेवलेला प्रत्येक विचार, विस्तार आणि एकुणच बांधणीपासून ते प्रकाशनापर्यंत माझे सर आणि वरिष्ठ लेखक श्रीयुत विवेक घोडमारे सरांचे त्यांच्या कार्यालयीन व्यस्ततेतून पदोपदी मार्गदर्शन लाभले. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सुचना आणि अभिप्रायांचा भविष्यात एक लेखक म्हणुन समृद्ध व्हायला नक्कीच मदत होईल ह्याबाबत शंका नाही. त्यांचे आभार तरी कसे मानावे?
लहान पण पासून शिक्षणात इंग्रजीच्या प्रभावाखाली राहून सुद्धा मराठी भाषेची आवड कधी सुटली नाही हे इथे ठळकपणे नमूद करावंसं वाटतंय.
जेष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी अभिनेता, महाराष्ट्र उत्कृष्ट साहित्य पुरस्कृत लेखक श्रीयुत परागजी घोंगे सर ह्यांच्याशी दुरवर कुठलेही संबंध नसताना त्याच्याशी होणारी आकास्मिक भेट हे मी माझं पूर्वजन्मीचे संचितच मानतो. त्यांच्याशी भेट म्हणजे अनुभवच निराळा. अनेक स्व- लिखित पुस्तकांच्या गाभाऱ्यात वावरणारा अत्यंत संवेदनशील माणुस. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होताच त्यांना मी कादंबरीची संहिता वाचुन दाखविली. त्यांनी कथासंग्रहाला प्रस्तावाना देणे हे मी ‘समर्पणचा’ आणि खुद्द माझाही गौरवच मानतो.
कला ही परमेश्वराचं देणं आणि ज्या हाताला हे वैभव प्राप्त असतं त्यांनी ती कला उपासनेणं दीर्घ चालवायला हवे. त्यांचे हे शब्द मला माझ्या लेखक म्हणुन पुढच्या प्रवासाला एक आशीर्वाद आणि चेतना देणारे असेल ह्यात शंका नाही. सात्विकता आणि सदहृदयतेने हातात घेतलेले कोणतेही कार्य करताना त्यासाठी किती अनामिक हात आपल्यासाठी झगडत असतात! नाही का?
डॉ. नितीन पं. करमरकर