15/08/2024
■ प्रार्थनेचा मारेकरी काळ
सुमारे दहा वर्षांपूर्वी ते आले होते
सज्जन संघटनेचे सेवाभावी सदस्य
एकूण सात जण होते
चौकश्या करीत होते
‘तुमच्या घरी काही आहे कि नाही ?”
उशिरानं लक्षात आलं
ते स्वतःच्या संरक्षणासाठी
शस्त्रास्त्र ठेवण्याबाबत सुचवीत होते
त्यांना निराश होऊन परत जावं लागलं
तरीही ते माझ्या मनात जुन्या दिवसातले धावड्याचे दांडे
आणि लहानपणीच्या आवडत्या कुऱ्हाडीची आठवण
जागवून गेले
या वेळेसही ते सातच होते
परंतु त्यांच्यात दोन चांगल्या घरच्या स्त्रियादेखील होत्या
माझ्या बायकोसोबत बोलताना त्या सारख्या
झाशीच्या राणीचा उल्लेख करीत होत्या
आम्ही संस्कृती-रक्षक-संघाचे सदस्य व्हावे
असा त्यांचा आग्रह होता
आणि त्याबद्दल आम्हाला तीन तलवारी
भेट देण्याचे आश्वासन देत होते
‘दोन तुम्हा दोघांकरिता आणि एक जास्तीची’
या वेळेसही ते निराश होऊनच परतले
मात्र या वेळी चिडून धमकावत आक्रमक होत
दहशत पसरवून गेले
आता आमच्या चहूकडे आतंकाचे प्रभामंडल
उपसलेल्या तलवारी
आणि एवढे विध्वंसक प्रसंग आहेत
कि अतिशय जवळचे मित्रदेखील
कानात हळूच कुजबुजू लागले आहेत
खरेच आता येऊन ठेपला आहे “प्रार्थनेचा मारेकरी काळ"
□□
मूळ हिंदी कविता : चंद्रकांत देवताले
मराठी अनुवाद : प्रफुल्ल शिलेदार
(वाघूर - २०१७ मधून साभार)