23/09/2022
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या विकासाला गती देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या विकासाला आता वेग येणार आहे. बीडमधील अष्टी-अहमदनगर दरम्यानची बहुप्रतिक्षित रेल्वेवाहतूक सुरू होत आहे. येत्या २४ तारखेपासून म्हणजे शनिवारपासून ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे. याचा बीडसह अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनाही फायदा होणार आहे.
बीड : मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. बीडमधील आष्टी ते अहमदनगर या ६६ किमीच्या रेल्वे मार्गावर उद्घाटनानंतर नियमित रेल्वे चालवण्यात येणार आहे. रेल्वेकडून आता यासंदर्भात वेळापत्रकही ( Ahmednagar To Ashti Train Time Table ) जाहीर करण्यात आले आहे
रेल्वेकडून २४ सप्टेंबरपासून चालवल्या जाणाऱ्या रेल्वेसेवेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस नगर-आष्टी आणि आष्टी-नगर या मार्गावर ही रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन नगरहून निघाल्यानंतर नारायणडोह, नवीन लोणी, सोलापूरवाडी, नवीन धानोरा, कडा या स्थानकांवर ट्रेनला थांबा देण्यात आला आहे.
पुढील सूचनेपर्यंत रेल्वेचा वेग हा मर्यादितच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. नगरहून पहिली ट्रेन दररोज सकाळी ७.४५ ला सुटणार आहे. ही ट्रेन आष्टीत १०.३० वाजता पोहोचेल. आष्टीहून स. ११ वाजता ट्रेन सुटेल, तर नगरमध्ये ही ट्रेन दुपारी १.५५ वाजता पोहोचेल, असे रेल्वे वेळापत्रकात म्हटले आहे.
६६ किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाइन २६१ किमी अहमदनगर - बीड- परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाइन प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांचा ५०-५० टक्के खर्चाचा वाटा आहे.
सेवा नवीन आष्टी - अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.
यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक - आर्थिक विकासाला चालना मिळेल.
> डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी ०७.४५ वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि दुपारी १.५५ वाजता अहमदनगर येथे पोहोचेल. ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.