01/01/2024
सोशल मीडियाला सरकार अंकुश का लावत नाही ?
नमस्कार मित्रानो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यावं लागेलच कारण इंग्रजी वर्ष नाही म्हटलं तर आपण व्यवहारात आणलंय आणि त्यामुळे शुभेच्छा द्याव्या लागतील. आपण राज्यात जुने सरकार अनुभवले आणि आता नवीन सरकारचा कार्यकाळ सुद्धा बघतच आहोत. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात लगेच कुठं काय घडामोडी होतात हे लगेच कळतात. त्यामुळेच सोशल मीडिया ही आपल्याला सर्व दाखवत असतेच हवं ते आणि नको ते जबरदस्ती दाखवते. मोबाईल हातात घेतला की आवश्यकता नसताना जबरदस्तीने नको ते विडिओ , रील समोर येतात. स्वयंघोषित सेलिब्रिटी आपलं ज्ञान पाजळतांना दिसतील किंवा एखादी तरुणी नको ते चाळे करतांना दिसतील म्हणजे दिसतील. आपलं वय काय आणि आपण समाजात राहतो ह्याच जराही भान न बाळगता आजचा युवावर्ग मोबाईल चा कॅमेरा ऑन करून जगासमोर आपल्या कला जबरदस्तीने इतरांना पाहायला भाग पाडतो आणि मग त्याची लायकी किंवा ट्रोलिंग कॉमेंट बॉक्स मध्ये होते ; तो भाग वेगळा!
नक्की स्वतः च्या आयुष्याचं काय करायचं ? हे काही माहिती नसतांना किंवा आपल्या आयुष्य हे ह्या आभासी जगा पलीकडे सुद्धा आहे ह्याची जाणीव आजकाल युवकांना काय मोठ्याना सुद्धा नाही आहे. अनेक वेळा भलतेच mms, खाजगी विडिओ लीक होतात आणि मग तक्रार, आत्महत्या असे प्रकार दिसून येतात. म्हणजे काय तर आजच्या पिढीला उचित काय आहे ह्याचं ज्ञान देणारा कुणी नाही. दुसरं म्हणजे प्रशासन/ सरकार ह्यांना अजूनही ह्याच गांभीर्य कळालेले नाही म्हणून सरकार नेमकं काय करतंय आणि काय करायला पाहिजे ? हा प्रश्न निर्माण होतोय.
फक्त इकडचे आमदार तिकडे पळवणे, सत्तेची भूक आणि इतर तत्सम गोष्टी करतांना जनतेसाठी, युवा वर्गासाठी काय द्यावं आणि काय नकॊ? हा विचार करायला त्यांच्याकडे वेळेचा अभाव आहे कारण बाकी गोष्टींमधून वेळ मिळेल तर ना !
सोशल मीडिया नावाच्या राक्षसाला वेळीच प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. काय पोस्ट करावे आणि काय करू नये ह्यावर वचक असला पाहिजे. समाजाला बाधा पोहोचवतील, व्यक्ती अथवा समाज आणि धर्मात द्वेष निर्माण करणारे अकाउंट बंद करणे. खोट्या अफवा पसरवणाऱ्या लोकांना शिक्षा देणे यांसारख्या अनेक बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे. कमाल आहे की कुठलाही समाजसेवक अथवा राजकीय व्यक्ती ह्यावर काही बोलत नाही अथवा ह्यावर विधानसभेत सुद्धा चर्चा झालेली नाही. बहुतेक कुणालाही ह्या गोष्टीचं गांभीर्य कळलं नसेल. निदान हि पोस्ट प्रकाशित होईपर्यंत तरी कुणाला ह्या विषयातील गांभीर्य अथवा ह्यावर ऍक्शन घेण्याची इच्छा नाही. भविष्यात ह्यांवर चर्चा होईल अशी सकारात्मक अशा ठेवूया.
असो, पुन्हा भेटूया! बरं नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा "गुडीपाडव्या" ला देणार.