11/09/2023
अरबी समुद्राची राणी - कोचीन!
केरळमधील कोचीनला ‘अरबी समुद्राची राणी’ म्हणतात, असं ऐकले होते. पण आज प्रत्यक्षात त्याचा अनुभव आला. निळासार व निर्मळ समुद्रकिनारे, बॅकवॉटर हे पाहिल्यानंततर केरळमधील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी कोचीनला सर्वात वरचे स्थान देण्याचा मोह (अर्थात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये इतर ठिकाणांना भेट द्यायची आहे, पण सध्याच्या परिस्थितीत) आवरत नाही.
‘गेट वे टू केरळ’ म्हणून ओळख असलेल्या कोचीनचा प्रवास हा आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू झाला. त्यानंतर रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथे माझा केरळचा मित्र अनंथा पिल्लई हा वाट पाहत होताच. येथील विमानतळाबाबत थोडी चौकशी केली असता, केरळमधील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून हे ओळखले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ आहे. या विमानतळाला संयुक्त राष्ट्राचा २०१८ चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाले आहेत. रात्रीच्या वेळी या विमानतळाचे सौंदर्य तर अजूनच निखळले होते. पण कोचीन शहराचा खरा प्रवास सुरू झाला तो आज सकाळी दहा वाजता.
कोचीनच्या पर्यटनाला सुरुवात झाली ती ‘फोर्ट कोची’ शहरापासून. येथील संस्कृतीच्या खुणा येथे पावलोपावली दिसत होत्या. येथील वसाहतीचे सौंदर्य, जपला जात असलेला ऐतिहासिक वारसा, युरोपियन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना, असं बरचं काही येथे पाहण्यास मिळाले. पण केरळला ‘अरबी सम्रुदाची राणी’का म्हणतात, हे कोचीन मधील समुद्रकिनाऱ्यांना भेट दिल्यानंतर नक्कीच समजले. खरतर, केरळच्या बॅकवॉटरचा अनुभव घेतल्याशिवाय केरळची सहल अपूर्ण आहे, असेच म्हणावे लागले. त्यामुळे तब्बल १४ किलोमीटरचा बोटने प्रवास केला. या प्रवासात आयकॉनिक चायनीज फिशिंग नेट, शिकारा बोट, मॅग्रो फॉरेस्ट, बॅकवॉटर फिशिंग, स्पाम शोअर, बॅक वॉटर कॅनल, बॅकवॉटर फिश पाम, क्रुझिंग निअर मॅग्रो फारेस्ट, फिशरमॅन यासह हिरवेगार, लँडस्केप , वैविध्यपूर्ण वन्यजीव, पक्षी हे सर्व पाहताना एक शांत अनुभव मिळतो. निसर्गाचं हे सौंदर्य पाहिल्यानंतर आपले डोळे तृप्त झाल्याशिवाय राहत नाहीत.
खरतर कोची सर्वोत्तम नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. येथील मसालेही खास आहेत. फोर्ट कोची बीच, चेराई बीच देखील भेट देण्यासारखे आहेत. केरळमध्ये कोचीन येथे पर्यटन करताना रिक्षाने फिरावे, असा सल्ला आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलोत, तेथील मालकाने दिला. त्यानुसार आजचा प्रवास हा रिक्षाने केला. रिक्षाचालक नजीब भाई यांनी खूपच चांगली माहिती दिली. तसेच बोटचा प्रवास करताना बोटचालक राहुल सी.एस. यानेही चांगली माहिती दिली. त्याने बोट कशी चालवतात, ते देखील शिकवले, व त्याने एक किलोमीटर बोट चालवण्यास सुद्धा दिली. आजच्या प्रवासात महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या बोट चालक राहुल सी.एस., रिक्षाचालक नदीब भाई यांचे खूप खूप आभार. तसेच सर्वात जास्त आभार मित्रवर्य अनंथा पिल्लई (अर्थात ते मानलेले त्याला आवडणार नाही. पण त्याला अजून मराठी जास्त समजत नाही, त्यामुळे अडचण नाही. ) यांचे!
चला, उद्या केरळमधील दुसऱ्या शहराला भेट द्याची आहे.