Ahmednagar Diaries

Ahmednagar Diaries आपल्या नगरच्या मातीतील तुमच्या हक्काचं पेज

07/02/2022

समस्त शहर शिवमय !
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ मूर्तीचा लोकार्पण सोहळा.!

02/12/2021

आपल्या नगर मधील आजच वातावरण..
नगर में बस Fogg चल रहा है.. 😉

21/09/2021

महाराष्ट्राची चिंता वाढली, अहमदनगरमधून सुरु होऊ शकते तिसरी लाट?
व्हिडीओ सौजन्य : BBC मराठी

10/09/2021

नगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणेश साडेसातशे वर्षांपूर्वीचा.!
नगरच्या कोके पाटलांकडे सापडले जुने मोडी लिपीतील दस्तावेज.
अहमदनगर शहराचे ग्रामदैवत व अवघ्या नगरकरांचे आराध्यदैवत असलेला माळीवाड्यातील श्री विशाल गणेश चक्क साडेसातशे ते आठशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. बाराव्या शतकातील त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मोडी लिपीत मिळाले असून, नगरमधील उद्योजक व हॉटेल व्यावसायिक विनायक नामदेवराव कोके पाटील यांच्याकडे हे दस्तावेज उपलब्ध आहेत. 1490मध्ये नगर शहराची स्थापना झाल्याचे सांगतात, पण त्याच्या हीआधी सुमारे दोन-अडीचशे वर्षेपासून माळीवाड्यात विशाल गणेश भाविकांना दर्शन देत आहे. त्या काळात मुली सरकार येथे होते व त्यानंतर निजामशाही व कंपनी सरकारची (ब्रिटीश) वाटचाल नगरच्या मातीने अनुभवली. पण विशाल गणेशाचे भव्य रुप तेव्हा पासूनच नगरकरांच्या कित्येक पिढ्यांच्या मनात घर करून आहे.

नगरच्या माळीवाडा परिसरातील कोके पाटील घराण्याचा इतिहास सुमारे 830 वर्षां पासूनचा आहे. 1191पासूनच्या या घराण्याच्या इतिहासाची माहिती त्यांच्या कडे उपलब्ध आहे.मोडी लिपीतील या माहितीचा शोध घेताना विनायक नामदेवराव कोके पाटील यांना घरात आणखी काही जुनी कागद पत्रे सापडली. मोडी लिपीतील या कागदपत्रांचे त्यांनी नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील मोडी लिपी वाचक नारायण आव्हाड यांच्या कडून देवनागरी मध्ये लिप्यंतर करून घेतल्यावर त्यांना ही आश्‍चर्याचा धक्का बसला. श्री विशाल गणेश मंदिर अस्तित्वात असल्याची 1260 साला मधली कागद पत्रे ती होती. त्यात देवाची पूजा अर्चा, देवाची जमीन, खर्च-उत्पन्न अशी माहिती आहे. म्हणजे त्याच्या ही आधी पासूनच विशाल गणेश अस्तित्वात आहे. त्याची स्थापना कोणी केली, त्याचे असे विशाल रुप कसे झाले, वगैरे काहीही माहिती या कागद पत्रांतून नाही. पण या निमित्ताने नगरच्या श्री विशाल गणेशाचा इतिहास तब्बल 761 वर्षे जुना असल्याचे स्पष्ट होत आहे व त्यामुळेच इतिहास व धार्मिक अभ्यासकांनी आता हा इतिहास अधिक खोलात जाऊन शोधण्याची गरज आहे. जुन्या कोणत्या पोथ्या पुराणात नगरच्या विशाल गणेशा चा उल्लेख आहे की नाही, हे ही आता नव्याने पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

*ताळीकेनगर...होते नाव*

विशाल गणेश मंदिरा संदर्भातील कागद पत्रां मध्ये...हजरी बुकातील रोज नंबर 177 ताळीके नगर,मौजे माळीवाडा तर्फ नगर हवेली. सन 1260 फसली सालचे हीसेबास जमीन दाखल आहेती...असा उल्लेख असून, जमीन 10 बीघे (म्हणजे आजच्या हिशेबाने सुमारे 5 एकर) श्री गणपती वहिवाटदार धोडो भवानी याचे पुज्यारी तर्फ जे भगवंत भट बीन मनभट...असे लिहिलेले आहे व ही कैफियत 8 मार्च 1854 रोजी भगवंत कारकुन मामले यांनी लिहिली असून, यात भगवंत भट बापाचे नाव मन भट आज्याचे नाव राघोभट आडनाव पाटक...असे नमूद आहे. मांडवगणकर जात देशस्त ब्राम्हण कसब पुज्यारी पणाचे व भीक्षुकी चे उमर वर्षे अजमासे 30...असे नमूद करून, आमच्या कडे इनाम जमीन गणपती देव बद्दल 10 बिघे चालत आलेली असून, याज बद्दल सरकारास पटी द्यायची नाही, ही जमीन मुली सरकार खालसातून कोणी दिली, कधी दिली काहीही माहिती नाही,जमिनीचा मूळ संपादक कोण माहीत नाही, सदरहू देव याची चाकरी,पूज्या वगैरे दीवाबत्ती, नेवदय, झाडलोट, दागदुजी करून इनामची वहीवाट करीत आहो वती मोजे मार येथील पाटील कुलकर्णी यांचे विचाराने करीत आहो, असे नमूद करताना 1227 फसली साली माजी अमल दूर जाहला तेव्हा सदरहू जमिनीची वहिवाट आमचा बाप मन भट बीन राधो भट करीत होता, तो मूळ संपादकाचा कोणी होता की नाही, याची माहिती नाही, असा ही उल्लेख असल्याने विशाल गणेश मंदिर 794 वर्षां पूर्वीचे असावे, असेही स्पष्ट होते. पण या दृष्टीने पुढे कागद पत्रात काही उल्लेख नाही.

*कंपनी सरकारची जप्ती नाही*

1227 फसली साला पासून कुंपनी (कंपनी नव्हे) सरकारचा अमल सुरू, पण जप्ती वगैरे दिक्कतजाहली नाही, तसेच सदरहू जमिनीची लागवड वजा जाता दरसाल उत्पन्न आजमासे 6 रुपये-सरकारास काही द्यावयाचे नाही, बाकी एन नफा आम्हाकडे राहतो तो सदरी नवे कलमी लिहील्या प्रमाणे देवाकडे खर्च करीतो,आम्हास नफा काही राहात नाही,असे स्पष्ट करून 15 कलमांचा हा दस्तावेज पुरुषोत्तम गोवींद हुजुर कारकून, भगवंत कारकून मामलेदार, तपास रामचंद्र बाबूराव कारकून यांनी 19 माहे मे सन 1854 रोजी लिहून घेतल्याचे म्हटले आहे व यात कैफियत देणारे भगवंत भट यांच्या वंशावळीचा ही उल्लेख आहे.

नगरच्या श्री विशाल गणेशा संदर्भातील जुने मोडी लिपीतील दस्तावेज विनायक कोके पाटीलयांना सापडल्यावर त्यांनी त्यांचे भाषांतर करून घेतले व त्यातून श्री विशाल गणेशाच्या सुमारे 700 ते 800 वर्षां पूर्वी पासूनच्या अस्तित्वाची साक्ष मिळत आहे. नगर शहराची स्थापना अहमद निजामशहा याने 1490 मध्ये केल्याचे सांगतात, पण यानुसार आता पर्यंतच्या सुमारे 530 वर्षांच्या शहर स्थापनेच्या इतिहासाच्या आधी दोनशे ते अडीचशे वर्षे विशाल गणेश नगर मध्ये आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या इतिहासाचे अधिक संशोधन अभ्यासकां कडून होणे आवश्यक आहे. त्यामुळे मोडी लिपीतील मूळ कागदपत्रे व भाषांतरीत कागदपत्रे विनायक कोके पाटील गणेशोत्सव काळात श्री विशाल गणेश मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराजांकडे विधीवत सुपूर्द करणार आहेत. दरम्यान,श्री विशाल गणेश भाविक व इतिहास अभ्यासकांना मोडी लिपीतील ही कागदपत्रे पाहण्यास उपलब्ध असून, इच्छुकांनी वाडियापार्क येथे विनायक कोके पाटील(फोन नंबर-9922663493) व प्रसाद कोके पाटील (फोन नंबर-9922141001)यांच्याशी संपर्क साधावा.

*नाथ पंथीय परंपरा शतक महोत्सवी*

श्री विशाल गणेशाची नाथपंथीय पूजापरंपरा सुमारे 100 वर्षांच्या आधी पासूनची असावी, असे मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी सांगितले. आमचे गुरू (स्व.) गेंडानाथ महाराजांच्या आधीपासून चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, आमच्या नाथ परंपरे नुसार गणपती हा नवनाथांन पैकीच सहावा नाथ आहे. त्या मुळेच नाथपंथीय मंत्रोच्चारानुसार रोज सकाळी व संध्याकाळी श्री विशाल गणरायाची पूजा केली जाते. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनेही पूजा-आरती होते. ओंकार आदिनाथ, उदयनाथ पार्वती,सतनाथ ब्रह्मा, संतोषनाथ विष्णू, अचेले अचंबे नागनाथ, गजभेली गजकंथडनाथ म्हणजे गणपती, ग्यानपारखी सिद्धचंद्रमा चौरंगीनाथ, मायास्वरुपी दादा मच्छिंद्रनाथ वज्योतीस्वरुपी गुरु गोरक्षनाथ असे नऊ नाथ आमच्या नाथ परंपरेत आहेत. यानुसार श्री विशाल गणेशाची आराधना केली जाते. या विशाल गणेश मूर्तीच्या खाली नाथसंप्रदायाची समाधीही आहे. जागृत देवस्थान म्हणून श्री विशाल गणेश प्रसिद्ध आहे व त्याची प्रचिती भाविकांना नेहमी येते, असेही संगमनाथ महाराजांनी सांगितले.

*आत्मलिंगधारण करणारा*

नगरचा श्री विशाल गणेश सव्वा अकरा फूट उंच व सुमारे सात फूट रुंद आहे. मंदिराची कळसा पर्यंतची उंची 75 फूट आहे. पूर्वाभिमुखी, चतुर्भुज तसेच उजव्या सोंडेचा असलेल्या या गणपतीने बेंबीत आत्मलिंग व त्यावर नागफणी धारण केलेली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या डाव्या हातात मोदक असून, उर्वरित तीनही हात आशीर्वाद स्थितीत आहेत. एकाच वेळी तीन हातांनी आशीर्वाद देणारी दुर्मिळ मूर्ती अन्य कोठेही पाहण्यास मिळणे अवघड आहे. श्रींची मूर्ती कणाकणाने वाढत जात होती म्हणून डोक्यावर त्रिशूळ ठोकण्याचे कुणातरी भक्ताच्या स्वप्नात सांगितले गेल्याने या मूर्तीच्या डोक्यावर त्रिशुळ आहे. मंदिरात त्रिकाल कडक पूजा अर्चा होते. रोज रात्री पावणे आठ ते साडेआठ या दरम्यान होणारी नाथ पंथीय आरती व त्यावेळी वाजवल्या जाणार्‍या वाद्यांचा वैशिष्ट्यपूर्ण ताल व सूर उपस्थित भाविकांच्या अंगावर रोमांच उभे करणारा असतो.

आठवण बागडे थिएटरची...! अहमदनगरमधील काही कुटुंबं मागील दोनशे-तीनशे वर्षांपासून इथे स्थायिक झाली आहेत. त्यांच्या नावानेच त...
26/08/2021

आठवण बागडे थिएटरची...!
अहमदनगरमधील काही कुटुंबं मागील दोनशे-तीनशे वर्षांपासून इथे स्थायिक झाली आहेत. त्यांच्या नावानेच तो भाग किंवा ती गल्ली ओळखली जाते. बागडे कुटुंब अशाचपैकी एक आहे. अहमदनगरमधील बागडपट्टी परिसर हा बागडे कुटुंबामुळे ओळखला जातो. सुमारे दोनशे वर्षांपासून बागडे घराण्याचं वास्तव्य इथे आहे. हे कुटुंब मूळचं नगर तालुक्यातील अकोळनेरचं. त्यांचा हातमागाचा मोठा व्यवसाय होता. हातमागावर रेशमी पैठणी विणल्या जात. त्यांना मोठी मागणी असे.

सन 1818 मध्ये बागडे घराण्यातील एकानं आंतरजातीय विवाह करून आपलं घराणं किती पुरोगामी आहे हे सिद्ध केलं. गोपाळजी आणि वेडूबाई यांचा आंतरजातीय विवाह तेव्हा गाजला. त्यांचे नातू सहदेवरावजी बागडे यांनी या घराण्याला वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.
लुगडी विणून त्या उत्पन्नावर जगणारं बागडे कुटुंब नंतर वैभवाच्या शिखरावर पोहोचलं. इंग्रजही त्यांच्याकडून कर्ज घेत असत. अनेकांना सहदेवरावांनी मदत केली. सामाजिक कार्यात मोठा सहभाग घेतला.

बागडे यांचा बागडपट्टीतील वाडा खूप मोठा होता. "बागडे वाडा" म्हणून तो ओळखला जायचा. संत दासगणू महाराजांची कीर्तनं तिथे झाली आहेत. दरवर्षी महिनाभर तरी महाराजांचं वास्तव्य तिथे असे. बागडे घराण्यातील सगळ्यांनी त्यांच्याकडून गुरूमंत्र घेऊन शिष्यत्व पत्करलं. संत तुकडोजी महाराजांचे कीर्तनही बागडे वाड्यामध्ये होत असे. विदर्भातले संत पाचलेगावकर महाराज अनेकदा बागडे वाड्यामध्ये येत. वीर सावरकर या वाड्यामध्ये येऊन गेले आहेत. सावरकरांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह बागडेवाड्यामध्ये भोजन घेतलं होतं. बाबाराव सावरकर येथे येऊन गेले आहेत. लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांचे पाय बागडेवाड्याला लागले आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे नातू येथे यायचे. बागडेवाड्याशेजारच्या वास्तूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय होतं. ही जागा विनामूल्य देण्यात आली होती. नामवंत गायक आणि संगीत दिग्दर्शक सुधीर फडके अनेक वर्ष या कार्यालयामध्ये राहत होते.
आपल्या राहत्या वाड्यासमोरच आणखी एक वाडा बागडे यांनी घेतला होता. तिथे रेशीम रंगवण्याचं काम होत असल्यामुळे "रंगणीचा वाडा" म्हणून तो ओळखला जायचा. सहदेवरावांनी आपले पुत्र गंगाधरराव यांच्यासाठी अहमदनगर शहरातील चितळे रस्त्यावर "गंगाधर बागडे नाट्यगृह" बांधले. त्याची कथा फार मजेशीर आहे. ही हकीगत बागडे कुलवृत्तान्तमध्ये देण्यात आली आहे. तेव्हा गांधी मैदानाजवळ "आनंदनिधान" नावाचं नाट्यगृह होतं. (नंतर त्याच चित्रा टॉकीजमध्ये रूपांतर झाले.) सहदेवराव यांनी आनंदनिधान नाट्यगृह त्याचे मालक दौलतराम हंबीरमल मारवाडी यांना कर्ज देऊन ताबेगहाण म्हणून घेतले होते. सहदेवराव यांनी हे नाट्यगृह सुमारे दहा ते बारा वर्ष स्वतः चालवलं. पुढे दौलतराम यांनी हे नाट्यगृह दुसऱ्या सावकाराकडे गहाण टाकलं. दुसऱ्या सावकाराला त्याचे पैसे परत न मिळाल्यामुळे त्याने नाट्यगृह लिलावात काढलं. लिलावात हे नाट्यगृह करकमकर गुजराथी यांनी घेतलं. त्या वेळी मूळ मालक दौलतराम मारवाडी यांच्याकडून चोवीस हजार रुपये सहदेवरावांना येणं होतं. लिलावाच्या वेळी करकमकर गुजराथी यांनी सहदेवरावांची निर्भत्सना केली. त्याची अपेक्षा होती की, या अपमानामुळे लिलावामध्ये जास्त बोली देऊन सहदेवराव हे थिएटर विकत घेतील. करकमकर गुजराती यांचे शब्द गंगाधररावांना मुळीच रुचले नाहीत. त्यांनी आपली नापसंती वडील सहदेवराव यांच्याकडे व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी ठरवलं की हे जुनंपुराण थिएटर घेण्यापेक्षा गंगाधरसाठी नवीन थिएटर बांधू. अत्यंत शांतपणे आणि पूर्ण व्यावहारिक दृष्टी ठेवून त्यांनी लिलावामध्ये बोली चढवली नाही. त्यामुळे ते थिएटर करकमकर गुजराथी यांच्या गळ्यात पडलं.

सहदेवरावांनी नंतर नाट्यगृहासाठी चितळे रस्त्यावरची मोक्याची जागा निवडली. त्यावेळी तिथं "मुरलीचे पटांगण" नावाची मोकळी जागा होती. आजच्यासारखी तिथे बाजारपेठ निर्माण झालेली नव्हती. या भागात बागडे यांच्या मालकीची सुमारे पंचेचाळीस घरे होती. ती पाडणं आवश्यक होतं. तिथे राहणार्‍या सर्वांना त्यांनी भरपूर मोबदला दिला. एक घर मात्र मिळत नव्हतं. ती महिला हटूनच बसली. मग सहजरावांनी तिला सांगितलं की, तू पाहिजे ती किंमत सांग. "माझ्या घरामध्ये जमिनीवर जेवढे राणी छाप रुपये मावतील तेवढे मला हवेत" असं ती महिला म्हणाली. सहदेवरावांनी ही मागणी तत्काळ मान्य केली. घरी माणसं पाठवून रुपयांच्या थैल्या मागवल्या. जमिनीवर राणीछाप रुपये मांडून हा व्यवहार पूर्ण करत जागेची अडचण दूर केली.
तेव्हा अनेक नामवंत नाटक कंपन्या अहमदनगरमध्ये येत. बालगंधर्व बागडे थिएटरमध्ये येऊन गेले आहेत. दीनानाथ मंगेशकर यांची नाटकही इथे झाली आहेत. लता मंगेशकर परकर पोलक्यात असताना मास्टर विनायक यांच्यासमवेत नगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या, तेव्हा त्यांचेही गाणं बागडे थिएटरमध्ये झालं होतं.
दिल्ली दरवाजाबाहेरचा बागडेमळाही तेव्हा प्रसिद्ध होता. विविध प्रकारची झाडे, पशू-पक्षी तिथे होते. मोरही खूप मोठ्या प्रमाणावर होते. आता तो निसर्गरम्य
बागडेमळा राहिलेला नाही आणि चितळे रस्त्यावरच बागडे थिएटरही. बागडे थिएटरचं नंतर छाया टॉकीजमध्ये रूपांतर झालं. काळाच्या ओघात ते बंद पडलं. आता तिथे नवीन व्यापारी संकुल उभारले जात आहे. चितळे रस्त्याचं वैभव त्यामुळे वाढणार आहे, पण मर्मबंधातली ठेव कायमची पुसली गेली आहे...!

भूषण देशमुख
अहमदनगर
9881337775

(या कुटुंबातील श्रीमती शशिकलाताई बागडे, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांची मुलाखत स्नेहालयच्या "रेडिओ नगर 90.4 FM" वर 26 ऑगस्टला संध्याकाळी चार वाजता आपण ऐकू शकाल.)

Address

Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahmednagar Diaries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ahmednagar Diaries:

Videos

Share